कचरा उचलण्यासाठी ७० कोटी रुपये व्यय करूनही रस्त्यांची अवस्था दयनीय !

पुणे महापालिकेचा कारभार !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – महापालिकेने मोठा गाजावाजा करून मशीनद्वारे (स्वीपर) रस्ते स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ केला; मात्र त्यातून कचरा उचलण्यापेक्षा प्रचंड धूळ उडत आहे. असे असतांनाही ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ‘स्वच्छ भारत मोहिमे’त अव्वल क्रमांक येण्यासाठी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनात अनेक पालट केले. वर्ष २०१७ पासून महापालिकेच्या पाचपैकी चार परिमंडळातील प्रमुख १२ रस्ते ‘स्वीपर’ने स्वच्छ केले जातात. यासाठी ७० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक गाड्या वापरण्यात येतात; पण त्याची कार्यवाही योग्य पद्धतीने होत नसल्याने शहरातील या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

यंदापासून १५ व्या वित्त आयोगातून १० कोटी रुपये खर्च करून आणखी तीन ‘स्वीपर’चा वापर चालू केला आहे. स्वीपरच्या कामाच्या निविदेत पादचारी मार्गावरील कचरा कामगारांनी झाडून तो रस्त्यावर आणणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मार्गावर काही कर्मचारी आणि एक घंटागाडी दिली आहे. पादचारी मार्गावरून रस्त्यावर टाकलेला कचरा स्वीपरद्वारे व्यवस्थित उचलला जात नाही, तसेच कामगार घंटागाडीतून कचरा घेऊन जात नाहीत. त्यामुळे पादचारी मार्गाची बाजू अस्वच्छ रहाते, तसेच स्वीपरद्वारे रस्ता झाडतांना दुभाजक आणि पादचारी मार्ग या दोन्ही बाजूंनी पाणी मारून रस्ता झाडल्यास धूळ उडत नाही; परंतु पाण्याचा योग्य वापर न केल्याने धूळ उडते आणि रस्तेही अस्वच्छ रहातात. याविषयी घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम म्हणाले की, स्वीपरद्वारे रस्ते स्वच्छ होत नसल्याने सप्टेंबरमध्ये ३ ठेकेदारांना प्रत्येकी ६० सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यापुढेही सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करू.

संपादकीय भूमिका :

  • जनतेच्या पैशांची धूळधाण करणार्‍या अशा असंवेदनशील ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात येईल तो सुदिन !
  • कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्त्यांची अवस्था दयनीय ठेवणारे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?