ग्रामस्थांनी कुत्र्याला ठार केले !
करमाळा (जिल्हा सोलापूर) – तालुक्यातील बाळेवाडी येथे पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने गावातील आबालवृद्धांसह १५ जणांचा चावा घेऊन घायाळ केले आहे. त्यातील काही जणांवर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात, तर काही जणांवर सोलापूर येथे उपचार चालू आहेत. संतप्त ग्रामस्थांनी कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार केले आहे. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यावर उपचारासाठी ‘अँटिरेबिज लस’ उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.
निर्बिजीकरणाची मोहीम शासनाने राबवावी ! – फारूक जमादार, सामाजिक कार्यकर्ते, करमाळा
करमाळा शहर आणि तालुका येथे मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वेळा मोकाट कुत्रे वाहनासमोर आडवे आल्याने अपघात होतात. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम शासनाने राबवावी.
कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा ! – आदिनाथ नलावडे, ग्रामस्थ, बाळेवाडी
बाळेवाडी येथे सर्वत्र मोकाट कुत्र्यांनी उच्छाद घातला आहे. यातूनच पिसाळलेल्या कुत्र्याने गावात अनेकांना घायाळ केले आहे. या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा.