‘वर्ष २०२१ पर्यंत कॅनडामध्ये शीख समाजातील जवळजवळ ८ लाख लोक स्थायिक झाले. यामुळे कॅनडाच्या लोकसंख्येत त्यांची टक्केवारी २.१ इतकी झाली. हे शीख लोक मुख्यतः ओंतारिओ, ब्रिटीश कोलंबिया आणि आल्बर्टा या भागांत अधिक प्रमाणात आहेत. कॅनडामध्ये स्थलांतरित होणार्यांमध्ये शीख समाज हा ‘धार्मिक गट’ या दृष्टीने चौथ्या क्रमांकावर आहे. खलिस्तानी आतंकवादी हा कॅनडातील शीख समाजापैकी एक छोटासा हिस्सा असून त्याची टक्केवारी २ टक्क्यांहून अल्प आहे; परंतु हे गट पुष्कळ प्रमाणात लहरी असून त्यांना काही विरोध झाल्यास ते हिंसाचार करतात. यापूर्वी भारतात झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ नंतर भारतातील कायद्यापासून पळून जाऊन कॅनडामध्ये गेलेल्या खलिस्तानी गुन्हेगारांना तेथे चांगले आदरातिथ्य करणारे वातावरण मिळाले. त्यानंतर अधिक वेळ न घालवता त्यांनी त्यांचे जाळे सिद्ध करून त्यांच्यासाठी नवीन असलेल्या कॅनडाच्या भूमीमध्ये आतंकवादी कारवाया चालू केल्या.
वर्ष १९८५ मध्ये खलिस्तानवाद्यांनी ‘एअर इंडिया’चे विमान पाडले आणि त्यामध्ये ३२९ प्रवासी ठार झाले. खलिस्तानवाद्यांनी मिळवलेले हे यश कॅनडाच्या इतिहासातील ‘सर्वांत वाईट सामूहिक हत्या’ ठरली. दुःखाचे म्हणजे या गुन्ह्यासाठी कारवाई करावी, असे कॅनडा सरकारला वाटले नाही. कॅनडाचे माजी आरोग्यमंत्री आणि खासदार उज्ज्वल दोसांज यांनी वर्ष १९८० मध्ये धैर्याने शीख आतंकवादाच्या विरोधात घोषणा केली. त्यांच्या या घोषणेला धमक्या देण्यात येऊन शीख आतंकवाद्यांना आव्हान देणार्यांच्या विरोधात भीतीदायक वातावरण निर्माण केले गेले. १८ नोव्हेंबर १९९८ मध्ये दुसर्या एका घटनेत कॅनडास्थित शीख पत्रकार तारासिंह हायर याची खलिस्तानी आतंकवाद्यांनी क्रौर्यतेने हत्या केली. हा पत्रकार ‘इंडो कॅनेडियन टाइम्स’ या वृत्तपत्राचा प्रकाशक होता आणि तो खलिस्तानच्या शस्त्रास्त्र लढ्याविषयी लिहीत होता. ‘एअर इंडिया’चे विमान पाडण्यात आल्याविषयी त्याने टीका केल्याने त्याची क्रूर हत्या करण्यात आली.
अशाच प्रकारची घटना ब्रिटनच्या पंजाबी भाषेतील ‘देस परदेस’ या साप्ताहिकाचे संपादक तरसेम सिंह पुरेवाल यांच्याविषयी घडली. २१ जानेवारी १९९५ या दिवशी साऊथ हॉलमधील पुरेवाल हे त्यांचे कार्यालय बंद करत असतांना त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमागे शीख आतंकवाद्यांचा हात असल्याचा संशय होता. टेरी मिलेवस्की यांनी वर्ष २००७ मध्ये ‘कॅनेडियन ब्रॉडकास्ट कॉर्पाेरेशन’साठी केलेल्या माहितीपटामध्ये कॅनडातील शीख समाजापैकी आतंकवादी अल्पसंख्यांकांविषयीचे सत्य उघड केले. राजकीय प्रभाव मिळवण्यासाठी जाहीररित्या आतंकवादाची घोषणा करून ‘स्वतंत्र शीख राज्याची मागणी करणे’, हे त्यांनी चालू ठेवले. त्याचप्रमाणे कॅनडामधील महिला पत्रकार किम बोलान यांनी शीख आतंकवादाविषयी विपुल लिखाण केले आहे. वर्ष १९८५ मध्ये ‘एअर इंडिया’च्या विमानावरील बाँब आक्रमणाविषयी लिहिल्यानंतर तिला ठार करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. कॅनडामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची अशी स्थिती असतांना तेथे राज्य करणार्या सत्ताधारी लिबरल पक्षाचे नेते आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे वेगळ्याच पद्धतीने वागत आहेत. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा दिवस सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा करणे आणि याला कॅनडाच्या अधिकार्यांनी कोणताही आक्षेप न घेणे, यावरून ते शीख आतंकवाद्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत, हे दिसून येते. यामुळे कॅनडामधील हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.’ (९.१०.२०२३)
(साभार : ‘हिंदुद्वेष डॉट ओ आर् जी’चे संकेतस्थळ)