अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी कोणत्याही छापील वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करणे आरोग्याला धोकादायक !

‘बरेच जण अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्राच्या छापील कागदाचा वापर करतात. न धुता ते अन्नपदार्थ खाल्ले जातात, त्यामुळे अन्नपदार्थ खाणार्‍याच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ ठेवल्याचे प्रतिकात्मक छायाचित्र

१. धोकादायक कारणे

अ. वर्तमानपत्रातील शाईमध्ये शिसे आणि इतर विषारी पदार्थांसह विविध रसायने असतात. अन्न शाईच्या संपर्कात आल्यावर ही रसायने अन्नामध्ये प्रवेश करू शकतात. ती पोटात गेल्यास ‘स्लो पॉयझनिंग’ म्हणजे हळूहळू विषबाधा होण्याची शक्यता असते.

आ. वृत्तपत्रे छपाई आणि वितरण प्रक्रिया या कालावधीत जीवाणू अन् बुरशी यांसारख्या हानीकारक सूक्ष्मजिवांनी दूषित होऊ शकतात. हे सूक्ष्मजीव अन्नामध्ये स्थानांतरित होऊ शकतात. त्यामुळे अनेक अन्नजन्य आजारांना ही वृत्तपत्रे कारणीभूत ठरू शकतात.

इ. वर्तमानपत्रे वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे हाताळली जातात. काही ठिकाणी ती अत्यंत अस्वच्छ पद्धतीने साठवली जातात. अशा कशाही पद्धतीने वापरलेल्या वर्तमानपत्रांमध्ये अन्नपदार्थ गुंडाळल्यास त्यामुळे निश्चितच धोका निर्माण होऊ शकतो आणि आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात.

२. काही गृहिणी घरी पुरी, भजी, वडे आदी तळलेल्या पदार्थांतील तेल निथळण्यासाठी ते वर्तमानपत्रांवर ठेवतात. त्याचा परिणामही वरीलप्रमाणेच होऊन तो आरोग्याला घातक आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

३. भारतीय सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडिया) केलेली आवाहनात्मक सूचना

‘अन्नपदार्थांचा संपर्क (संसर्ग) वर्तमानपत्राच्या छपाईच्या शाईशी वारंवार किंवा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे पुढील गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात, उदा. मज्जासंस्थेला हानीकारक, हृदय आणि रक्तवाहिन्या यांच्या संबंधीचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, विविध प्रकारचे कर्करोग, यकृत निकामी होणे आणि फुप्फुसाची हानी होऊन हाडे दुर्बल (कमकुवत) होतात.’

आरोग्याला असलेला गंभीर धोका लक्षात घेऊन शिजवलेले किंवा तयार खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर कटाक्षाने टाळावा. त्याऐवजी कोरे कागद किंवा बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांचा वापर करावा.