‘रेडिमेड’ दिवाळी !

प्रतिकात्मक छायाचित्र

पूर्वी शहरांतही दसरा सरला की, दिवाळीच्या स्वागताची सिद्धता चालू होई. अख्खे घर झाडून रंगरंगोटी केली जाई. मुलांपासून वयोवृद्धही यात उत्साहाने सहभागी होत. नंतर घराघरांतून दिवाळीच्या फराळाचे सुगंध येऊ लागत. यातही घरातील सर्व जण सहभागी होत. घरातील कर्त्या पुरुषाचा ‘बोनस’ झालेला असायचा, मग नवीन कपडे शिवण्यासाठी माप दिले जाई. कंदिलासाठी काठ्या गोळा करून, त्या तासून त्यापासून आकाशकंदील बनवला जाई किंवा माळ्यावर ठेवलेला कंदिलाचा जुना सांगाडा काढून त्याला नवीन कागद लावला जाई. शुभेच्छापत्रे घरी बनवून त्यांवर आपुलकीचा संदेश लिहून ती पोस्टाने आप्तेष्टांना पाठवली जात. ठिपक्यांच्या रांगोळीसाठी कागदावर मापात रेषा आखून अगरबत्तीच्या साहाय्याने त्यावर छिद्रे पाडली जात. गेल्या वर्षीचे शिल्लक रंग आणि रांगोळी यांचा अंदाज घेतला जाई. ४ दिवसांत दारात कोणत्या रांगोळ्या काढायच्या ?, ते ठरवले जात असे. मुले मातीचे किल्ले बनवण्याची सिद्धता करत. घरी बनवलेल्या फराळाची शेजारी देवाण-घेवाण होई. दिवाळीच्या गुलाबी थंडीत पहाटे लवकर उठून अंगाला सुगंधी तेल आणि उटणे लावून आंघोळ करण्यात वेगळीच मौज असे. घरोघरी जाऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जात.

आता मात्र चित्र पालटले आहे. शहरात पती-पत्नी दोघेही प्रतिदिन घराबाहेर पडत असल्याने दिवाळीसारखे सण साजरा करण्यावर ऑनलाईनचा आणि ‘रेडिमेड’चा प्रभाव पडला आहे. अनेक घरांत आस्थापनांची माणसे बोलावून घराची स्वच्छता आणि रंगरंगोटी केली जाते. रांगोळीचे छाप वापरले जातात. कंदीलही ‘रेडिमेड’ मिळतो. मातीच्या पणत्यांची जागा आता विजेच्या तोरणांनी घेतली आहे. फराळही ‘रेडिमेड’ आणला जातो. तो बेताचाच असल्याने आणि तो शेजारीपाजारी देण्याचा प्रश्नच येत नाही. किल्ले, शुभेच्छापत्र हेही ‘रेडिमेड’ मिळते. भाऊबीजेच्या भेटवस्तू ऑनलाईन घेतल्या जातात. हल्ली मुलांना सुट्टी पडली, तरी खासगी शिकवण्यांमुळे त्यांना सुट्टीचा आनंद नसतोच. उरलेला वेळ भ्रमणभाषवर जातो. त्यामुळे किल्ले, रांगोळ्या, शुभेच्छापत्र आदींसाठी मुले आणि पालक यांच्याकडे वेळच नसतो. शुभेच्छांची देवाण-घेवाणही भ्रमणभाषवर ‘काही न बोलता’ बरेचदा कृत्रिमपणे होते. करियरच्या नादात धर्माचरणाच्या आनंदाला मात्र आपण पारखे व्हायला नको ! ‘रेडिमेड’च्या नादात दीपावलीचा खरा आनंद आपण गमावत आहोत का ?, हा विचार करण्याची वेळ आली आहे, हे मात्र नक्की !

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.