पुणे, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘सावित्री सन्मान फाऊंडेशन’च्या वतीने ‘दिवाळी उत्सव २०२३’ या ‘प्रदर्शन अन् विक्री’ मेळाव्याचे आयोजन सिंहगड रस्ता, पुणे येथील ‘कोद्रे फार्म’ येथे करण्यात आले आहे. ३ आणि ४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या या मेळाव्याचे ३ नोव्हेंबर या दिवशी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी मेळाव्याचे संयोजक ‘सावित्री सन्मान फाऊंडेशन’च्या सोनल कोद्रे, भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊत, माजी आमदार सौ. कमलनानी ढोले पाटील आदी उपस्थित होते.
घरगुती व्यावसायिक आणि महिलांनी सिद्ध केलेल्या वस्तूंची थेट विक्री ग्राहकांपर्यंत व्हावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या स्थळी आयोजकांनी सनातन संस्थेचा ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन कक्ष उभारणीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले. या कक्षाला सौ. रूपाली चाकणकर यांनी भेट दिली आणि ‘सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. आम्ही संस्थेची उत्पादने वापरत असतो’, असे सांगितले. या वेळी सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव यांनी ‘कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?’ हा सनातन-निर्मित ग्रंथ सौ. रूपाली चाकणकर यांना भेट दिला. ग्रंथप्रदर्शनास भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही भेट दिली.