दसरा-दिवाळी जवळ आली की, वाहिन्या, वृत्तपत्रे आदींवरून नवीन गाड्यांची विज्ञापने झळकू लागतात. ‘आपल्याही दारात आपली स्वतःची गाडी असावी’, असे प्रत्येक व्यावहारिक माणसाचे स्वप्न असते. आता विजेवर (बॅटरीवर) चालणार्या गाड्या अधिक पसंतीस उतरत आहेत. वाढती वाहनसंख्या ही मोठी डोकेदुखी झाली आहे. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येचा भार लोकलगाड्या, बसगाड्या, टॅक्सी आणि रिक्शा यांवर पडून आता मोनो अन् मेट्रो रेल्वेही न्यून पडू लागल्या आहेत. ‘ओला’, ‘उबेर’ यांचीही त्यात भर पडली आहे. मुंबईकरांचे रहाणीमान नेहमीच उंचावत असल्याने आणि गर्दी टाळण्यासाठी मुंबईकरही आता स्वतःचे वाहन घेण्यावर भर देऊ लागला आहे. या सर्व वाढत जाणार्या वाहनांच्या तुलनेत मुंबईतील रस्त्यांची संख्या आणि आकारमान मात्र अपेक्षित वाढत नाही. मुंबईतील इंच इंच जागेला सोन्याचा दर असल्याने गाड्या उभ्या करण्यासाठी जागाही न्यून पडतात. रस्त्यांवर उभ्या असणार्या गाड्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण करतात.
प्रतिवर्षी मुंबईत २ ते ३ लाख वाहनांची भर पडते. पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांच्या दरवाढीचा त्यावर परिणाम होत नाही. मुंबईत ४५ लाखांहून अधिक वाहने आहेत. राज्यातील एकूण वाहनांपैकी १० टक्क्यांहून अधिक वाहने एकट्या मुंबईत आहेत. मुंबईतील रस्त्यांची एकूण लांबी सुमारे १ सहस्र ९०० किलोमीटर आहे. एकूण वाहनांची संख्या पहाता प्रतिकिलोमीटरमागे मुंबईत २ सहस्र ३६८ वाहने आहेत. ‘मुंबईतील सर्व वाहने एकाच दिवशी रस्त्यावर आली, तर रस्त्यावरून चालायला जागाच रहाणार नाही’, असे वाहतूकतज्ञ म्हणतात. या आकडेवारीतून ‘भविष्यात मुंबईचे काय होणार ?’, याचा अंदाज येतो. मुंबईतील वाढती वाहनसंख्या प्रदूषणात भर घालते. परिणामी नागरिकांना श्वसनाचे विकार होतात. मुंबईतील मेट्रो प्रकल्प, तसेच विविध कामांसाठी रस्त्यांत होणारे खोदकाम यांमुळे वाहतुकीची गती न्यून होते. सिग्नल यंत्रणेवर मोठा ताण येतो. यांवर पर्याय म्हणून गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी करण्यात आली; मात्र त्याचाही विशेष लाभ झाला नाही. मुंबईत येणार्या वाहनांची संख्या आणखी वाढली आहे. सम-विषम वाहनसंख्येचा पर्याय केल्याने त्याचा भार सार्वजनिक वाहतूक यंत्रणेवर पडला. नवी मुंबई, ठाणे, पुणे या शहरांतही अशीच परिस्थिती आहे. वाहनसंख्येची समस्या रौद्र रूप धारण करत आहे. ती रोखण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर उपाय शोधले पाहिजेत.
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.
संपादकीय भूमिका‘हिंदूंच्या सणांमुळे प्रदूषण होते’, असे म्हणणारे कथित पर्यावरणवादी मुंबईसह देशात वाढत्या प्रदूषणावर काही उपाययोजना सांगणार का ? |