‘३० ऑक्टोबरपासून ‘प्रिमिअर पद्मिनी’ आस्थापनाची टॅक्सी मुंबईतील रस्त्यांवरून धावणार नाही’, असे घोषित झाले. शहरातील टॅक्सीची वयोमर्यादा २० वर्षे आहे. मुंबईच्या ताडदेव येथील परिवहन विभागाच्या (आर्.टी.ओ.च्या) कार्यालयात २९ ऑक्टोबर २००३ या दिवशी शेवटच्या टॅक्सीची नोंदणी झाली होती. ‘काळी-पिवळी’ या नावाने प्रसिद्ध असलेली ही टॅक्सी ६० वर्षे मुंबईच्या रस्त्यांवर धावत होती.
मुंबईकरांचे जीवन धावपळीचे असते. काही मार्गांवर वाहतूककोंडी असते, तर काही ठिकाणी ती समस्या कधी उद़्भवेल ?, हे सांगणे अनिश्चित असते. मुंबईकरांना प्रतिदिन अशी कसरत करणे, हा त्यांच्या जीवनाचा अनिवार्य भाग झाला आहे. लोकलगाडी टाळणारे किंवा त्यातून उतरल्यावरही कित्येक चाकरमानी सार्वजनिक वाहतूक सेवेची प्रतीक्षा न करता कामावर वेळेत पोचण्यासाठी टॅक्सीचा आधार घेतात आणि पूर्वीही घेत असत. मुंबईतील रस्त्यांवर सध्या हुंडाई आस्थापनाची निर्मिती असलेल्या ‘सॅन्ट्रो’ या प्रकारच्या गाड्यांच्या टॅक्सी धावू लागल्या आहेत; पण त्या ‘प्रिमिअर पद्मिनी’ आस्थापनाच्या टॅक्सीप्रमाणे ऐसपैस नाहीत. या दोन्ही टॅक्सीतून प्रवासाचा अनुभव असणारे प्रवासी हा भेद लगेच ओळखू शकतील. हुंडाईच्या या टॅक्सीत बसल्यावर मागील तिघांना अंग आखडून बसावे लागते, तसेच पायही खाली नीट सोडता येत नाहीत. ही टॅक्सी आकाराने लहान आहे. त्यामुळे मुंबईकर कित्येक दिवस जुन्या टॅक्सीच्या आठवणी काढत रहातील, हे निश्चित ! मुंबईतील वाहतूककोंडी, अरुंद रस्ते यांवर हा पर्याय आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडी गैरसोय मात्र सहन करावी लागणार आहे. कित्येक चालकांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे निश्चित साधन झालेल्या प्रिमिअर पद्मिनी टॅक्सीने मुंबईत विशेषतः बाहेरच्या राज्यांतून येणार्या अनेकांना रोजगार दिला. मुंबईत नवीनच आल्यावर भाड्याने रहाणे परवडणारे नसते. त्यामुळे अशा कित्येक टॅक्सीचालकांचे ‘टॅक्सी’ हेच घर बनले होते. तेवढेच भाड्याचे वाचलेले चार पैसे घरी पाठवता येत होते. असे दिवस काढलेली चालकमंडळी ‘आता ही टॅक्सी मुंबईतील रस्त्यांवरून धावणार नाही’, या वृत्ताने नक्कीच भावनिक झाली असतील. ‘ओला’, ‘उबेर’ ही आस्थापने अॅपच्या साहाय्याने प्रवाशांना ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतात. काळानुरूप होणारे हे पालट प्रवाशांच्या पसंतीस उतरले आहेत. असे असले तरी वयस्कर मुंबईकरांच्या मनात प्रिमिअर पद्मिनीच्या टॅक्सीचे स्थान अढळ राहील; कारण मुंबई कात टाकत असली, तरी जुन्या स्मृती कित्येकदा आनंद देऊन जातात !
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.