१. साधनेत नसतांना नामांकित आस्थापनांच्या वस्तू वापरण्याची सवय असणे आणि साधनेत आल्यावर ‘पैसे वाया घालवले’, याचे वाईट वाटणे
‘आमच्या कुटुंबात गिरीश एकुलता एक असल्याने आणि घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने त्याला नामांकित आस्थापनांचे (‘कंपन्यां’चे) कपडे, ‘बूट’ आणि घड्याळ वापरण्याची सवय होती. तो ‘बूट’ आणि घड्याळ घ्यायचा. त्या वेळी आम्ही त्याला सांगत होतो, ‘‘एक ते दोन जोड ठीक आहेत.’’ तो साधनेत आल्यावर त्याला याचे वाईट वाटते. ‘आपण उगीचच या सर्वांमध्ये पैसे वाया घालवले’, असे त्याला आता वाटते. साधनेमुळे त्याला आता प्रत्येक गोष्टीचे मूल्य समजत आहे. गुरुदेव, आम्ही कितीही प्रयत्न केले असते, तरी त्याच्यामध्ये हा पालट करू शकलो नसतो. तो पालट तुम्ही करून घेतलात.
२. ‘साधनेत येण्यापूर्वी पैसे खर्च करणे; मात्र स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्यानंतर पैसे काळजीपूर्वक योग्य तेथे खर्च करणे
‘साधनेत येण्यापूर्वी आपल्या बाबांचे पैसे आपलेच आहेत’, असे त्याला वाटायचे. त्यामुळे तो पैसे खर्च करतांना विचारायचा; पण ‘मी बाबांचे पैसे कसेही खर्च करू शकतो’, असे त्याला वाटायचे. त्याने रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यानंतर त्याच्या लक्षात आले, ‘हे पैसे बाबांनी भ्रष्ट मार्गाने मिळवलेले नाहीत, तर हे त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत. मी पैसे कमवत नाही, तर मी त्यांच्या पैशांवर हक्क कसा दाखवणार ?’ आता त्याला काहीही अडचण आली किंवा काही घ्यायचे झाले, तर तो ‘घेऊ का ?’, असे आम्हाला विचारूनच पैसे घेतो. ‘आपण आपले पैसे काळजीपूर्वक योग्य त्या ठिकाणी खर्च केले पाहिजेत’, असे तो म्हणतो.
३. ‘आई-वडिलांनी आपल्याला किती दिले आहे !’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त करणे
तो रामनाथीला जायचे; म्हणून सर्व सात्त्विक कपडे घेऊन आला होता. आश्रमात सर्व स्तरांतील साधक आहेत. एकदा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचा आम्हाला भ्रमणभाष आला. तो आम्हाला म्हणाला, ‘‘इकडे काही जणांकडे अल्प प्रमाणात कपडे आहेत. मी कधी विचारच केला नाही की, ‘तुम्ही मला किती दिले आहे !’’ त्याचे ते बोलणे ऐकून आम्हाला कृतज्ञतेने रडू आले.
४. ‘देव आपल्या प्रारब्धात जेवढे आहे, तेवढे देतोच’, याची जाणीव होणे
तो साधनेत आल्यावर ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करत असतांना त्याचा मला भ्रमणभाष आला. तो मला म्हणाला, ‘‘आई, देव आपल्या प्रारब्धात जेवढे आहे, तेवढे आपल्याला देतोच. बाबांनी अधिक पैसे कमवले नाहीत, ते बरे झाले. नाहीतर मी त्या पैशांच्या मायेत अडकलो असतो. मला आश्रमात येतांना संघर्ष करावा लागला असता. हे मला आता कळत आहे.’’
५. चुलत काकांच्या मुलाच्या लग्नासाठी ‘झगमगीत कपडे कशाला घ्यायचे ?’, असा विचार करून स्वतःकडे असलेलेच कपडे घालायचे ठरवणे
डिसेंबर मासात त्याच्या चुलत काकांच्या मुलाचे लग्न होते. त्यांनी सर्व मुलांना कपड्यांसाठी पैसे दिले होते. सर्व मुलांनी त्यांच्या आवडीचे चांगले कपडे घेतले. आम्ही गिरीशलाही म्हटले, ‘‘तुलाही पैसे दिले आहेत. तू तुला आवडेल, ते घे.’’ तेव्हा गिरीश आम्हाला म्हणाला, ‘‘माझ्याकडे इतके ‘झब्बे (कुर्ते) आहेत, तर झगमगीत कपडे कशाला घ्यायचे ?’’ यावर तो ठाम राहिला आणि त्याने नवीन कपडे घेतले नाहीत. आधीचा गिरीश असता, तर त्याने नामांकित आस्थापनांचे कपडे घेतले असते.
६. रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी गेल्यानंतर दळणवळण बंदी चालू होणे आणि मनाचा पुष्कळ संघर्ष होऊनही कधी त्याविषयी न सांगणे
तो ४.२.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी गेला. मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे दळणवळण बंदी चालू झाली. तेव्हा तो नऊ मास घरी येऊ शकला नाही. त्याने कधी स्वतःचे कपडे धुतले नव्हते. ‘कोणासह कसे रहायचे ?’, हेही त्याला ठाऊक नव्हते. त्याने रामनाथीला गेल्यानंतर एकदाही ‘मला इथे जमणार नाही. मी घरी परत येतो’, असे आम्हाला बोलून दाखवले नाही. त्याच्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला; पण त्याने कधीही आम्हाला सांगितले नाही.
७. सर्व प्रक्रिया आनंदाने केल्यानंतर आवश्यकता न्यून होणे
त्याला केवळ नामजप, प्रार्थना करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे, एवढेच ठाऊक होते. तोे रामनाथी आश्रमात आल्यानंतर नामजपादी उपाय करणे आणि मनाचा आढावा घेणे इत्यादी सर्व प्रक्रिया आनंदाने शिकला. त्याच्या आवश्यकता न्यून झाल्या. त्याला झोपायला गादी लागायची; पण आता तो कशावरही झोपू शकतो. तो मोजके आणि आवश्यक तेवढेच बोलतो. माझ्यामध्ये ‘अनावश्यक बोलणे’ हा स्वभावदोष आहे. तो माझ्याशी बोलत असतांना मध्येच ‘‘तू तुझा आणि माझा वेळ वाया घालवत आहेस’’, असे मला सांगतो.
८. कुटुंबियांपेक्षा आश्रमात सण साजरा करण्याचा निश्चय करणे
मी त्याच्यामध्ये पुष्कळ अडकलेले होते. तो इतके दिवस आमच्यापासून कधीच दूर राहिला नव्हता. त्याने ‘सणासाठी घरी यावे’, असे मला वाटत होते. तो मला म्हणाला, ‘‘मी तुमच्या दोघांच्या समवेत सण साजरा करणे योग्य आहे कि रामनाथी आश्रमात गुरुदेवांच्या समवेत सण साजरा करणे योग्य आहे ?’, ते मला सांग.’’ त्याने असे म्हटल्यावर ‘तो किती व्यापक विचार करतो !’, हे माझ्या लक्षात आले.
९. साधनेत येण्यापूर्वीचे जीवन आणि साधनेत आल्यावर झालेले पालट
१०. रामनाथी आश्रमात गेल्यानंतर साधकांनी गिरीशचे त्याच्या आईसमोर कौतुक करणे
मी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर वास्तूविशारद सौ. शौर्या मेहता (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांनी मला सांगितले, ‘‘गिरीशची सेवा चांगली चालू आहे. तो आता अधिक आनंदी वाटतो.’’ साधकांनीही त्याच्या सेवेचे कौतुक केले. ‘तो मनापासून सेवा करतो’, असे त्यांनी मला सांगितले.
‘गुरुदेव, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेमुळे गिरीशमध्ये झालेला पालट मी जवळून अनुभवला. ‘तुम्हाला अपेक्षित अशी सेवा आणि साधना तुम्हीच आमच्याकडून करवून घेऊन आम्हाला तुमच्या चरणांशी घ्या’, ही तुमच्या चरणी आमची शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. उज्ज्वला पंडित पाटील, खांदा कॉलनी, पनवेल, रायगड. (२५.८.२०२१)