राज्यात हिंसाचाराला थारा नाही !
मुंबई – मराठा आरक्षणाच्या आंदोलनात होणारी दगडफेक आणि जाळपोळ यांविषयी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी घर आणि वाहने यांची जाळपोळ करणार्या आंदोलकांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ अंतर्गत गुन्हे नोंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंसेला थारा दिला जाणार नाही, तसेच आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,
१. राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात सांगितले आहे; पण काही लोक आंदोलनाचा लाभ घेत हिंसक होत आहेत.
२. काही विशिष्ट समाजाच्या लोकांना लक्ष्य करण्यात आले. उपाहारगृहे, दवाखाने आणि प्रतिष्ठान यांचीही जाळपोळ करण्यात आली. हे अत्यंत चुकीचे असून राज्य सरकारने त्याची गंभीर नोंद घेतली आहे.
३. जाळपोळ आणि हिंसक आंदोलन करणार्या लोकांवर पोलीस अन् गृह विभाग कडक कारवाई करणार आहे. विशेषतः घरात लोक असतांना घरे जाळण्याचा प्रयत्न झाला आहे, त्यातील ५० ते ५५ जणांची ओळख पटलेली आहे. उर्वरित लोकांची ओळख पटवली जात आहे. या सर्वांवर ३०७ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात येईल. शांततापूर्ण आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांचे म्हणणे सरकार ऐकून घेत आहे; पण जिथे हिंसक भूमिका घेतली जात आहे, तिथे पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत.
४. या घटना घडत असतांना काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते तेथे होते. चौकशी झाल्यानंतर त्यांची माहिती देण्यात येईल. हिंसाचार वाढू नये; म्हणून अधिकची पोलीस कुमक मागवण्यात आली आहे.
५. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांना राज्य सरकार सुरक्षा पुरवणार आहे. राज्यातील ओबीसी नेते आणि मंत्री यांचा यामध्ये समावेश आहे. गृह खात्याकडून दक्षतेचा उपाय म्हणून गुप्त शाखेच्या साहाय्याने आक्रमणे रोखण्यावरही प्रयत्न होणार आहेत.
६. बीड जिल्ह्यातील घटनेचे समर्थन करता येणार नाही. काही लोकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. हे खपवून घेतले जाणार नाही.