काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशमध्ये दोन, तर महाराष्ट्रात एक अशा महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना एका महाविद्यालयामध्ये घडली. गाझियाबादमधील (उत्तरप्रदेश) ‘ए.बी.ई.एस्. इंजिनीयरिंग कॉलेज’मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या; म्हणून मंचावर असलेल्या मुलानेही तीच घोषणा दिली; पण त्यावरून त्या मुलाला एका शिक्षिकेकडून अपमानित केले गेले आणि निघून जाण्यास सांगण्यात आले. या प्रकरणी त्या महिला प्राध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे.
त्या पाठोपाठ दुसरी घटना घडली. अलाहाबाद विद्यापिठाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. विक्रम हरिजन यांनी एक वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, ‘‘आज प्रभु श्रीराम असते, तर ऋषि शंभुक यांची हत्या केल्यासाठी भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत त्यांना कारागृहात टाकण्यात आले असते. श्रीकृष्ण असते, तर महिलांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी त्यांनाही कारागृहात टाकले असते.’’ या प्रकरणी डॉ. विक्रम हरिजन यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी ते स्वतःच्या विधानावर ठाम आहेत. या दोन्ही घटनांवर कारवाई चालू आहे.
तशीच आणखीही एक घटना महाराष्ट्रात घडली. ती म्हणजे रावणदहनावर झालेली टीका ! गेली काही वर्षे ‘रावण हा आदिवासींचा राजा होता, तो शिवभक्त होता. त्यामुळे त्याचे दहन करू नये’, अशी मागणी होत आहे; मात्र या प्रकरणाची कुठलीही चौकशी अथवा कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. उलट महाराष्ट्र राज्य सरकारचे समर्थकच याला पाठिंबा देतांना दिसतात. या सर्व घटना अगदी १५ दिवसांच्या अंतराने घडलेल्या आहेत. या सर्वांमध्ये एक सामायिक सूत्र दिसून येते, ते म्हणजे प्रभु श्रीरामाविषयी असलेला द्वेष, तसेच हिंदु संस्कृतीविषयी असलेला राग आणि चीड !
१. भारतविरोधी घोषणांवर निधर्मी वा हिंदुद्वेष्टे यांचे मौन का ?
गाझियाबादमधील घटना असो किंवा अलाहाबादमधील घटना असो, या प्राध्यापकांना केवळ श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांच्याविषयी मनामध्ये चीड आहे; मात्र जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) पाकिस्तानच्या समर्थनार्थ वाचल्या गेलेल्या ‘गझल’, त्यानंतर तिथे झालेली मारहाणीची घटना, ‘भारत तेरे तुकडे होंगे’; ‘हर घर से अफजल निकलेगा’, ‘अफजल हम शरमिंदा है तेरे कातिल जिंदा है’, या घोषणांविषयी कोणतीही चीड कुणाच्याही मनात कशी निर्माण होत नाही ? ठराविक गोष्टींवर या निधर्मी वा हिंदुद्वेष्टे यांनी मौन धारण केलेले असते. सगळ्यात महत्त्वाचे, म्हणजे ‘जय श्रीराम’ची घोषणा भारतात नाही द्यायची, तर मग कुठे द्यायची ? हा श्रीरामाचा देश आहे आणि उत्तरप्रदेश तर त्याचे जन्मठिकाण आहे. किमान तिथे तरी अशी गोष्ट घडू नये.
२. रावणाचे उदात्तीकरण आणि त्याच्या अत्याचारांना पाठिंबा कशासाठी ?
सध्या होत असलेले रावणाचे उदात्तीकरण हाही अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यातील सगळ्यात महत्त्वाचे सूत्रे असे की, ‘रावण हा आदिवासी होता’, असे अनेक जण सांगतात. याविषयी ते कुठलाही पुरावा देत नाहीत. वाल्मीकि रामायणानुसार रावण हा विश्रवा ऋषि आणि राक्षसकन्या कैकसी यांचा पुत्र, तर तो पुलस्त्य मुनींचा नातू होता. आपल्या धर्मात वडिलांचे कुळ तेच मुलाचे कुळ मानले जाते. त्यामुळे रावण हा ब्राह्मण आहे. तो एका ऋषींचा मुलगा होता. आजही बर्याचशा ठिकाणी वडिलांची जात हीच मुलाची जात मानली जाते.
अजून एक गोष्ट सांगितली जाते ती, म्हणजे त्याने (रावणाने) सीतेला जरी पळवून नेले असले, तरी त्याने मर्यादांचे पालन करून तिची विटंबना केली नाही. ‘सीता जिवंत मिळाली, ही प्रभु रामांची शक्ती होती; पण सीता पवित्र मिळाली, ही रावणाची मर्यादा होती’, असे म्हटले जाते. असे जरी म्हटले जात असले, तरी यामागे रावणाला मिळालेला स्वर्गातील अप्सरा रंभा हिचा शाप कारणीभूत आहे. रावणाने त्याचा भाऊ कुबेर याची सून रंभा हिच्याशी (रंभा कुबेराचा पुत्र नल कुबेराची पत्नी होती.) गैरवर्तन केले. ती रावणाची सून आहे, हे त्याला ठाऊक असूनही तो असे वागला. या गैरवर्तनामुळे रंभा हिने शाप दिला, ‘कोणत्याही परस्त्रीला जर तू तिच्या इच्छेविरुद्ध हात लावलास, तर तुझ्या मस्तकाचे सहस्रो तुकडे होतील.’ म्हणूनच रावण सीतेला स्पर्श करू शकला नाही. रावणाचे असे अत्याचारी कृत्य असूनही ही गोष्ट कुणी न सांगता ‘केवळ रावण कसा महान होता’, हेच सांगितले जाते.
अनेक जण रावणाची आणखी एक महानता सांगतात ती, म्हणजे रावणाने सीतेला पळवले, ते त्याची बहीण शूर्पणखा हिच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी; पण जर रावणाला अन्यायाचा सूड घ्यायचा होता, तर त्यासाठी सीतेला पळवण्याची आवश्यकताच होती ? त्यासाठी रावणाने प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांच्याशी युद्ध केले असते, तरी चालले असते. ज्या बहिणीचा उल्लेख केला जातो, त्या शूर्पणखेच्या पतीला, म्हणजे विदुतजिव्हा याला रावणाने मारले होते. त्या वेळी शूर्पणखेने मनातून असा निश्चय केला होता की, ती रावणाच्या मृत्यूचे कारण बनेल.
रावणाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ‘रावण हा श्रेष्ठ शिवभक्त होता’, ‘त्याने शिवतांडव स्तोत्राची रचना केली आहे’, ‘त्याने सोन्याच्या लंकेची निर्मिती केली’, ‘त्याला मारण्यासाठी प्रत्यक्ष श्रीविष्णूला जन्म घ्यावा लागला’, असे सांगून रावणाचे उदात्तीकरण केले जाते. रावण हा महान शिवभक्त आणि विद्वान होता, हे जरी खरे असले, तरीही त्याने कुणावरही अन्याय करणे योग्य नाही. त्याची सोन्याची लंका ही त्याची नव्हे, तर त्याचा भाऊ कुबेराची होती आणि त्याने ती त्याच्याकडून बळाने हिसकावून घेतली होती. तसेच प्रभु श्रीरामाने केवळ रावणाला मारण्यासाठी नव्हे, तर अनेकांचा उद्धार करण्यासाठी आणि ‘सर्व मर्यादा पाळून उत्तम राजा कसा असतो ?’, हे दाखवून देण्यासाठी अवतार धारण केला. रावणाला मारणे, हे त्याने केलेल्या अनेक दैवी कार्यांपैकी एक कार्य आहे.
३. रावणदहन करण्यामागील कारणमीमांसा
रावण हा काही जमातींमध्ये पूजनीय असेलही; पण त्यामुळे त्याच्या दहनावर बंदी घालणे किंवा त्यामुळे गुन्हे नोंदवणे हे कधी योग्य नाही. रावणदहन, म्हणजे रावणाच्या वाईट प्रवृत्तींचे दहन, असत्याचे दहन, असत्यावर सत्याने आणि अधर्मावर धर्माने मिळवलेला विजय ! रावणदहन हे श्रीरामाच्या पराक्रमाची आठवण काढण्यासाठी करायचे असते. स्त्रीवर अन्याय झाला, तर त्याची शिक्षा काय असते ? हे जाणून घेण्यासाठी रावण दहन करायचे असते. अधर्माने वागल्यावर काय परिणाम होतात ? हे पहाण्यासाठी रावणदहन करायचे असते. रावणदहन हे कुणाचे उदात्तीकरण किंवा कुणावर केलेला अन्याय नाही, तर ते धर्माचे एक प्रतिक आहे. सगळ्यात महत्त्वाचे, म्हणजे आदिवासी हे हिंदु संस्कृतीचाच एक भाग आहेत, ते कुणी वेगळे नाहीत. श्रीराम वनवासात असतांना त्यांनी आदिवासींची भेट घेतलेली आहे. आदिवासी प्रभु श्रीरामांना पूजनीय मानतात. त्यामुळे रावणदहनामुळे आदिवासी कसे काय दुखावले जाऊ शकतात ?
४. रावण नव्हे, तर प्रभु श्रीरामच पूजनीय !
रावणाचे होणारे उदात्तीकरण किंवा ‘जय श्रीराम’ घोषणेला होणारा विरोध हा महान हिंदु संस्कृतीवरचा आघात आहे. रावणाचे उदात्तीकरण, म्हणजे श्रीरामाला न्यून लेखणे. जगात आज भारताची ओळख प्रभु श्रीरामामुळे होत आहे. अशा वेळी आपल्या देशात होत असणार्या घटना या समाजातील एका महत्त्वाच्या घटकाला हिंदु संस्कृतीपासून दूर नेत आहेत. हिंदु संस्कृतीचा मूळ आधारस्तंभ असलेल्या प्रभु श्रीरामापासून आपल्याला दूर नेत त्याविषयी मनात शंका निर्माण करत आहेत; कारण एखादी संस्कृती नष्ट करायची असेल, तर आधी ती जिच्यावर उभी आहे तो आधार आधी नष्ट करावा लागतो. या गोष्टीवर आपण वेळेत विचार करून उपाय शोधला पाहिजे. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे आणि त्याचा आपण योग्य तो वापर केला पाहिजे.
आणखी एक विचार आपण करायला हवा तो, म्हणजे ज्या प्रभु श्रीरामांची आपण पूजा करतो आणि त्यांनी ज्याला मारले, तो रावण महान असूच शकत नाही. प्रत्यक्ष जगन्माता असलेल्या सीतामातेचा ज्याने अवमान केला, तो रावण पूजनीय कसा असेल ? एवढा विचार जरी आपण केला, तरी कुठल्याही चुकीच्या विचाराला आपण फसणार नाही.
– कु. अन्नदा विनायक मराठे, चिपळूण, रत्नागिरी. (२८.१०.२०२३)