मंदिरांच्या प्रांगणात रा.स्व. संघासह अन्य संघटनांच्या कार्यक्रमांवर बंदी !

केरळच्या साम्यवादी आघाडी सरकारचा हिंदुद्वेषी आदेश

प्रतिकात्मक छायाचित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने चिरायंकीळू मंदिराच्या आवारात शस्त्रास्त्र प्रशिक्षण देण्यात येऊ नये, यासाठी पोलिसांना निर्देश दिले होते. या निर्णयाचा आधार घेत राज्यातील मंदिरांच्या प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आदेश केरळ सरकारच्या नेतृत्वाखालील देवस्वम् मंडळाने दिला आहे. शबरीमला मंदिरासह केरळ राज्यातील १ सहस्र २०० प्रमुख मंदिरे राज्यशासनाच्या नियंत्रणात आहेत. चिरायंकीळू मंदिराच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून लोकांना शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्या संदर्भात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्या वेळी न्यायालयाने पोलिसांना वरील निर्देश दिले होते.

१.  २० ऑक्टोबरला देवस्वम् आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, मंदिरांच्या प्रांगणात, तसेच मंदिरांच्या अखत्यारीतील मालमत्तेत आंदोलनांना निर्बंध घालण्यात आला आहे. देवस्वम् मंडळाची अनुमती नसल्यास रा.स्व. संघ आणि इतर संघटनांच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहेे. या संघटनांनी मंदिरांच्या प्रांगणात शाखा चालवल्या असल्यास त्यावर मंडळाच्या देवस्वम् सुरक्षा यंत्रणांनी अचानक धाडी टाकाव्या, असे निर्देश देण्यात आले आहेत.

२. देवस्वम् मंडळाने म्हटले की, संघ आणि अन्य संघटना मंदिरांच्या प्रांगणात अतिक्रमण करून मंदिरांचे पावित्र्य, तसेच भक्तांच्या हिताच्या विरुद्ध कार्य करत आहेत, अशा तक्रारी असल्याचा अहवाल आहे. (शबरीमला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याची मागणी करून तेथे तसे होऊ दिले. त्यामुळे हिंदुविरोधी निर्णय घेणार्‍या साम्यवादी सरकारच्या देवस्वम् बोर्डाला मंदिराच्या पावित्र्याविषयी बोलण्याचा अधिकार आहे का ? – संपादक) रात्रीच्या वेळी या संस्था शस्त्रास्त्र प्रशिक्षण, सामूहिक व्यायाम आणि संचलन करतात.

संपादकीय भूमिका

  • मंदिरांच्या प्रांगणात मुसलमानांना नमाजपठण करण्याची अनुमती देणारा आदेश उद्या साम्यवादी सरकारने काढला, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • मंदिरे सरकारच्या नियंत्रणात असल्यावर काय होते, याचे हे एक मोठे उदाहरण ! केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी कायदा आणावा, असेच हिंदूंना वाटते !