पुणे येथील अमली पदार्थाचे प्रकरण
पुणे – अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याच्या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक सविता भागवत यांच्यावर कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. साहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा आदेश काढला.
सविता भागवत यांचे ३० सप्टेंबर या दिवशी ‘विभाग १६’ वर लक्ष ठेवण्याचे दायित्व होते. त्या दिवशी त्यांनी कर्तव्यावर पूर्णवेळ उपस्थित रहाणे अपेक्षित होते; परंतु त्या केवळ अर्धा घंटा उपस्थित होत्या. त्यांच्या अनुपस्थितीमुळे ललितला एक अज्ञात व्यक्ती भेटली आणि त्यानंतर तो पसार झाला. त्यामुळे कामातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि दायित्वशून्यता, यांमुळे आरोपी ललित पाटील याला पळून जाण्याची संधी मिळाली, असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
रुग्णालयाचे अधिष्ठाताच ललितवर उपचार करत असल्याचे सिद्ध !
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे स्वतः ललितवर उपचार करत असल्याचे सिद्ध झाले आहे. ससूनमधे उपचारांसाठी आलेल्या आरोपींच्या ‘रजिस्टर’मध्ये उपचार घेणार्या आरोपी रुग्णाचे नाव, त्याच्यावर कोणत्या आजारांवर उपचार चालू आहेत, त्या आजाराचे नाव आणि उपचार करणार्या आधुनिक वैद्यांच्या नावाची आरंभीची अक्षरे लिहिण्यात आली आहेत. या ‘रजिस्टर’मध्ये ठाकूर यांच्या नावाचा उल्लेख आहे, तसेच हर्निया या आजारावर ललित पाटील याच्यावर उपचार चालू असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याच शिफारसीवरून ललित पाटील ससूनमधे तळ ठोकून होता, हे सिद्ध झाले आहे.
या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांनी अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. संजीव ठाकूर यांच्या पाठिंब्यामुळे ललित पाटील ९ मास ससूनमध्ये राहिला. या माध्यमातून ठाकूर यांनी मोठे धन कमावले आहे. संजीव ठाकूर यांनी बोगस पद्धतीने ललित पाटील याच्यावर उपचार केले. ‘डीन’ (अधिष्ठाता) स्वत: कधीच उपचार करत नाहीत; परंतु या प्रकरणात असे घडल्यामुळे संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|