२.७.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘ज्वाला नृसिंहयाग’ करण्यात आला. ‘ज्वाला नृसिंहयाग’ हिंदु राष्ट्राची स्थापना होणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा महामृत्यूयोग टळणे आणि साधकांचे रक्षण होणे’, यांसाठी करण्यात आला. त्या वेळी रामनाथी आश्रमातील कु. रजनीगंधा कुर्हे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आणि नृसिंह देवतेच्या चरणी आर्ततेने प्रार्थना होणे : ‘ज्वाला नृसिंहयाग’ चालू झाल्यावर माझ्याकडून प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) चरणी कळकळीची प्रार्थना झाली, ‘प.पू. डॉक्टर, तुमच्यासाठी काही करण्याची माझी क्षमता नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी, तसेच माझ्या रक्षणार्थ तुम्हाला तुमची शक्ती व्यय करावी लागते. प.पू. डॉक्टर तुम्हाला ती शक्ती व्यय करावी लागू नये, यासाठी माझी श्री नृसिंहदेवाच्या चरणी प्रार्थना आहे, ‘हे नृसिंहदेवा, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील खारूताईचा वाटा; म्हणून मला लवकरात लवकर संत बनव. जेणेकरून या शिवधनुष्याला ज्या गुरुमाऊलींनी पेलले आहे, जो गोवर्धन त्यांनी उचलून धरला आहे, त्याला काठी लावण्याचे भाग्य मला लाभेल.’
२. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संत होण्याचे ध्येय घेणे : प्रार्थना झाल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संत व्हायचे असेल, तर माझी साधना त्या तुलनेत नगण्य आहे.’ माझ्या मनात अनेक वर्षांपासून एक विचार होता आणि आहे, ‘गुरुमाऊली या पृथ्वीवर जोपर्यंत स्थुलातून आहेत, तोपर्यंतच संत होऊन त्यांना आनंद द्यायचा !’ गुरुमाऊली, आपला आशीर्वाद असल्यास अशक्य असे काहीच नाही.
३. स्वतःच्या देहातील कुकर्मे आणि कुसंस्कार यज्ञकुंडात पडत असल्याचे जाणवणे : श्री नृसिंहाला प्रार्थना केल्यानंतर ‘माझ्या सर्व देहामध्ये जी कुकर्मे आणि कुसंस्कार यांची अशुद्धी होती, ती काळसर अशा वलयांच्या स्वरूपात यज्ञकुंडात पडत आहे’, असे मला दिसले. तेव्हा माझ्यावर अधिकतम आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत होते.
४. ध्यानस्थ श्री कालीमातेचे दर्शन होणे आणि प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मातून काहीतरी सांगितल्यावर मन निर्विचार स्थितीत जाणे : काही वेळाने माझ्यावर होणारे उपाय थांबले. त्यानंतर मला ध्यानस्थ श्री कालीमातेचे दर्शन झाले. तिने नेत्र उघडले आणि शिवपिंडीला अभिषेक केला. तेव्हा देवीचे रूप उग्र नसून सौम्य होते. त्या वेळी मला प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून काहीतरी सांगत होते. त्यानंतर माझे मन संपूर्ण निर्विचार स्थितीत गेले.
५. पूर्णाहुतीच्या वेळी श्रीमहाविष्णूच्या सर्व रूपांतील अवतारांचे दर्शन होणे आणि ते विराट रूप प.पू. डॉक्टरांचे असल्याचे दिसणे : पूर्णाहुतीच्या वेळी यज्ञकुंडात मला चतुर्भुज श्रीमहाविष्णु दिसले. यज्ञस्थळी मला प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून बसलेले दिसले. पूर्णाहुती चालू असतांना श्रीमहाविष्णूने मला त्याच्या सर्व रूपांतील अवतारांचे दर्शन दिले. बघता बघता मला श्रीमहाविष्णूचे विराट रूपात दर्शन झाले. ते विराट रूप प.पू. डॉक्टरांचे होते. मला प.पू. डॉक्टरच श्रीविष्णु आणि सर्व देवतांच्या विराट रूपात दिसले.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०२३)
|