पुराणकाळात भारतात विमाने आणि अन्य वाहने आकाशत उडत असल्याची पुस्तिकेत माहिती !

‘चंद्रयान-३’ मोहिमेचे यश विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने प्रकाशित केली पुस्तिका !

नवी देहली – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एन्.सी.ई.आर्.टी.ने) नुकतीच एक पुस्तिका प्रकाशित करून ‘चंद्रयान-३’ मोहिमेला मिळालेले यश विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तिकेत हिंदु धर्मातील पुराणांचा संदर्भ देण्यात आला आहे. यात ‘पुराणकाळात विमाने आणि अन्य वाहने उडत होती’, असे म्हटले आहे.

चंद्रयान मोहिमेचे यश शाळा आणि महाविद्यालये यांतून साजरे करण्याची सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्यानंतर ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यामध्ये ‘पुराणकाळापासून भारतात विमान आणि हवेत उडणारी वाहने यांवर संशोधन करण्यात आले होते. याचे संदर्भ ‘विमानशास्त्र’ या ग्रंथात आढळतात. वेद भारतातील सर्वांत प्राचीन ग्रंथ आहेत. त्यात देवता रथ वापरत होते आणि ते रथ उडू शकत होते. रथांचा वापर देव पृथ्वी, स्वर्ग, अंतराळात फिरण्यासाठी करत असत. रावणाच्या पुष्पक विमानाचा रामायणात उल्लेख आहे. विश्‍वकर्माने पुष्पक विमान सूर्याच्या धुळीकणांपासून निर्माण केले होते’, अशा आशयाचे लिखाण या पुस्तिकेत आहे.

संपादकीय भूमिका

केंद्र सरकारच्या शैक्षणिक परिषदेकडून अशा प्रकारची पुस्तिका प्रकाशित होणे अभिनंदनीय आहे ! आता या शैक्षणिक परिषदेने भारताचा योग्य इतिहास आणि ज्ञान विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तिच्या पुस्तकांमध्ये पालटही करणे आवश्यक आहे !