नवरात्रीमध्ये ९ दिवस देवीची, म्हणजेच ‘शक्ती’ची उपासना केली जाते. या शक्तीमुळेच या संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली. त्रिदेवांची उत्पत्तीही याच चैतन्यमय शक्तीमुळे झाली. आपल्याला जन्म देणारी, तसेच आपले पालन-पोषण करणारी शक्तीच आहे. शक्तीविना आपण काहीच नाही. शक्तीविना आपण ‘शव’ आहोत. जेव्हा जेव्हा या सृष्टीवर असुर माजले, त्या त्या वेळी या आदिशक्ती भगवतीने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी शस्त्र हातात घेतले आणि अधर्मी दैत्यांचा नाश केला. संकटाच्या वेळेला देवीला शरण जाण्यावाचून आपल्याकडे काहीच पर्याय उरत नाही. या सृष्टीच्या चराचरात वास करणार्या ‘शक्ती’ला आपण शरण गेले पाहिजे आणि तिच्यापासून आपल्याला दूर करणार्या स्वतःतील दोषांविरुद्ध लढण्याची ‘शक्ती’ आपण देवीला मागायला पाहिजे.
नवरात्रीमध्ये ९ दिवस उपासकाचा देह, मन, बुद्धी यांवर चैतन्याचा प्रभाव पडतो. पहिल्या दिवशी ‘शैलपुत्रीदेवी’ची उपासना केली जाते आणि साधनेच्या टप्प्यातील देहातील पहिले सूक्ष्म चक्र म्हणजे ‘मूलाधार’ त्यावर लक्ष केंद्रित केले जाते. दुसर्या दिवशी ‘ब्रह्मचारिणी’देवीची पूजा केली म्हणजेच ‘स्वाधिष्ठान’ चक्रावर लक्ष केंद्रित केले जाते. तिसर्या दिवशी आपली साधना ‘मणिपूर’चक्राकडे प्रवाहित होते आणि त्या दिवशी ‘चंद्रघंटा’देवीची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी ‘कुष्मांडा’देवीची पूजा केली जाते. नंतर उपासकाची ऊर्जा ‘अनाहत’चक्राकडे प्रवाहित होते. पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ची उपासना केली जाते आणि मनाची ऊर्जा ‘विशुद्ध’चक्राकडे प्रवाहित होते. सहाव्या दिवशी ‘कात्यायिनी’देवीची उपासना केली जाते. उपासकाची ऊर्जा ‘आज्ञा’चक्राकडे येते. सप्तमीला ‘कालरात्री’देवीची उपासना आणि मनाची ऊर्जा ‘सहस्रार’चक्राकडे येते. आठव्या दिवशी ‘महागौरी’देवीची उपासना केली जाते. देवी त्याच्या उपासकाची संपूर्ण अंतर्बाह्य शुद्धी करून घेते. नवव्या दिवशी ‘सिद्धिदात्री’देवीची उपासना करतात. देवी भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करून, त्याच्या मनातील शंका नष्ट करून त्याला साधना करण्यासाठी बळ देते. उपासकाने ९ दिवस केलेल्या भावपूर्ण साधनेमुळे प्रसन्न होऊन, देवी भक्ताला ‘शक्ती’ देते. उपासना किंवा साधना करणार्यांसाठी दोष आणि अहं यांवर मात करण्याची प्रेरणा देणारा विजयादशमी हा सण अंतिमतः येतो. नवरात्रीचे हे आध्यात्मिक महत्त्व ठाऊक करून घेतल्यास देवीप्रतीचा भाव वाढून आपण तिची अधिक श्रद्धापूर्ण उपासना करू शकतो.
– श्री. जयेश बोरसे, पुणे