‘एप्रिल १९९७ मध्ये ‘नामजपाच्या ४ वाणींविषयी अभ्यासवर्ग घ्यावा’, असा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले यांचा निरोप मला मिळाला. तेव्हा वाटले की, मला नामजपाच्या वाणीचे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा हे ४ प्रकार ठाऊक आहेत. याखेरीज मला अन्य माहिती नाही आणि एवढी माहिती अभ्यासवर्ग घेण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे प्रारंभी मी अभ्यासवर्ग घेण्यास नकार दिला. तेव्हा गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मला परत निरोप आला, ‘हा अभ्यासवर्ग तुम्हाला घ्यायचाच आहे.’ त्यामुळे त्यांची इच्छा हीच आज्ञा समजून मी अभ्यासवर्ग घेण्याचे ठरवले. त्याकाळी मी एका जिल्ह्यात एका रुग्णालयामध्ये रुग्ण पहाण्यासाठी बसत असे. माझ्या ‘कन्सलटेशन’ (समुपदेशनाच्या) खोलीमध्ये प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र लावलेले होते. तेथे बसलो असतांना मी त्यांच्याशी संवाद साधला. मी तक्रारीच्या सुरात त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही नामजपाविषयी केवळ ४ शब्द सांगितले आहेत. एवढ्या माहितीवर अभ्यासवर्ग कसा घेणार ?’’ त्या काळात मी डॉक्टर असल्याचा मला अधिकच अहंकार होता. त्यामुळे ‘नामजपाच्या वाणी आणि त्यांचे महत्त्व हे विज्ञान अन् वैद्यकीयशास्त्र यांनुसार सर्वांना समजवून सांगता यायला जमले, तरच ते सर्वांना कळेल’, असे मला वाटले होते.
१५ ऑक्टोबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वेदांप्रमाणे कुणीतरी अपौरुषेय ज्ञान सांगितल्याप्रमाणे ज्ञान लाभणे; धर्मपालन, धर्माचरण आणि साधना हे मार्ग दाखवणार्या धर्ममार्तंडांविषयी कृतज्ञता ठेवा अन् अध्यात्मशास्त्रानुसार मनुष्याचे देह आणि त्यांच्या नामजपाच्या वाणी’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/728495.html
५. अध्यात्मशास्त्रानुसार मनुष्याचे देह आणि त्यांच्या नामजपाच्या वाणी
५ इ. कारणदेह
५ इ १. कार्य : कारणदेह, म्हणजे बुद्धी. कारणदेह व्यक्तीचे मन आणि स्थूलदेह यांना व्यापून असतो. तसेच तो विश्वबुद्धीशीही अनुसंधानित असतो.
१. यालाच विज्ञानवादी ‘विवेकबुद्धी’ म्हणतात. हेही प्रत्येक जण स्वतःचा देह अनुभवू शकतात. इतरांची बुद्धी पहाता येत नाही, तसेच ती इतरांना दाखवताही येत नाही.
२. योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म आदी विश्लेषणात्मक कार्य बुद्धीचे असते. व्यक्तीची निर्णय प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कृती यांतून अप्रत्यक्षपणे बुद्धीला अनुभवता येते.
३. एकाच विश्वबुद्धीतून सर्व प्राणीमात्रांना ज्ञान लाभते. विहित योनींना विहित ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता असते. मनुष्य ज्या जिज्ञासेने ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यानुसार त्याला विश्वमनाकडून, म्हणजे ईश्वराकडून ज्ञान लाभते.
४. मनुष्याकडे सत्त्वगुणी जिज्ञासा असेल, तर सत्त्वगुणी ज्ञान आणि तमोगुणी जिज्ञासा असेल, तर तमोगुणी ज्ञान लाभते.
५ इ २. जपाची वाणी : कारणदेहातून होणार्या नामजपाची वाणी पश्यंती असते. पश्यंतीचा अर्थ जे इंद्रिये, मन, बुद्धी यांनाही दृश्य नाही, तेही पाहू शकते, अशी वाणी, म्हणजेच जी काळाच्या पुढे पाहू शकते, अशी वाणी.
१. सतत मनाने कळत-नकळत घेतलेल्या नामजपामुळे चित्तामध्ये नामजपाचा संस्कार होतो. त्याचे अनुसंधान आत्म्याच्या आनंद स्वरूपाशी होते. परिणामी नामधारकाला आनंदाची अनुभूती येते. हे म्हणजे नामधारकाचे पश्यंती वाणीतील नाम होय.
२. नामजपाची ही वाणी सूक्ष्मतर वाणी होय.
३. या वाणीत नामधारक इतरांच्या अंर्तमनातील संस्कारांच्या ध्वनी स्पंदनांना प्रकाशात रूपांतरित करून समजून घेत असतो. या कारणास्तव संत किंवा गुरु हे साधक किंवा शिष्य यांना मार्गदर्शन करतांना चित्त शुद्ध होण्यासाठी (अंतर्मनातील संस्कार नष्ट होण्यासाठी) सहज मार्गदर्शन करू शकतात.
५ इ ३. घर्षण रहित नाम : घर्षण (संघर्ष) रहित अवस्थेतील नाम, म्हणजे पश्यंती वाणीतील नाम. कारणदेहात कोणतेही अवयव नसतात. ना कर्मेंद्रिये ना ज्ञानेंद्रिये.
१. कारणदेह, म्हणजे एका गाठोड्यासारखे असते. ज्यात मागील अनेक जन्मांच्या कर्माचे हिशोब (प्रारब्ध आणि संचित यांच्या नोंदी) असतात, तसेच अनेक जन्मांच्या चांगल्या-वाईट व्यावहारिक किंवा आध्यात्मिक अनुभवांची शिदोरी असते. तसेच या जन्मांत मिळणार्या व्यावहारिक किंवा आध्यात्मिक ज्ञानाचा संचय असतो.
२. या वाणीत नामधारकाचा व्यष्टी जीवनातील अंतर्बाह्य संघर्षाचा अंत झालेला असतो; मात्र कार्यानुमेय किंवा समष्टी प्रारब्धानुसार त्यांचा संघर्ष अविरत चालू असतो.
३. नामधारक जेव्हा कारणदेहाद्वारे पश्यंती वाणीत नामजप करत असतो, तेव्हा त्याची ही एक उन्नत संत किंवा गुरु यांसारखी अवस्था असते. या अवस्थेत मन आणि चित्त यांची मोठ्या प्रमाणात शुद्धी झालेली असते. येथे चित्त आत्म्याशी तादात्म्य साधत असल्याने या अवस्थेत होणारे नाम, हे आनंदाच्या अनुभूती स्वरूपाचे असते. उदा. जसे साखर खाल्ल्यानंतर ती तोंडातून संपते; मात्र जीभेवर गोडवा असतो, तसे कर्म किंवा कोणतेही बाह्य प्रयत्न नसतांनाही जे नाम आत अनुभूती स्वरूपात सतत चालू असते, ती म्हणजे पश्यंती वाणी. चित्तशुद्धीमुळे आत्म्यावरील आवरण नष्ट झाल्याने नामधारकाचे आतून आत्म्याशी तादात्म्य होऊन आनंद स्वरूपातील नामजप चालू होतो.
५ इ ४. ऊर्जानिर्मिती : पश्यंती वाणीतील नामजपातून अधिकतम सूक्ष्म, म्हणजे प्रकाश ऊर्जेची निर्मिती, तर अल्प प्रमाणात स्थूल, म्हणजे ध्वनी ऊर्जेची निर्मिती होते.
५ इ ५. ध्वनी आणि प्रकाश ऊर्जेचे प्रमाण : पश्यंती वाणीत ७० टक्के प्रकाश ऊर्जा, तर ३० टक्के ध्वनी ऊर्जेची निर्मिती होते.
५ इ ६. कोण ऐकू शकतो ? : या वाणीत ३० टक्के ध्वनी असल्याने हा नामजप करणार्याला, तसेच इतरांनाही ऐकू येत नाही. प्रकाश ऊर्जा ७० टक्के झाल्याने आत्म्याच्या सत्-चित-आनंद स्वरूपातील आनंदरूपाशी तादात्म्य पावून अनुभूती स्वरूपात नामजप अनुभवत असतो.
१. ७० टक्के प्रकाश ऊर्जा, म्हणजे ७० टक्के वेळी ईश्वराशी अखंड अनुसंधान निर्माण होते. स्वरूपाशी आणि ईश्वराशी अधिकाधिक अनुसंधान असल्यामुळे अशा नामधारकाला कार्यानुमेय ‘संत’ किंवा ‘गुरु’ संबोधतात. असे उन्नत ईश्वराचे विचार सतत ग्रहण करत असतात. त्यामुळे ते ईश्वरेच्छेने जगतात आणि जगाला दिशा देतात.
२. ७० टक्के प्रकाश ऊर्जा असल्याने या नामधारकांचा प्रकाश भाषेत संवाद चालू असतो. हा संवाद शब्दरूपात अन्य कुणी ऐकू शकत नाही. शुद्ध चित्त असल्याने प्रकाश भाषेत होणारा संवाद अन्य संत किंवा गुरु आवश्यकतेनुसार मौनातून जाणू शकतात. अशा उन्नतांना प्रकाशभाषेचे ध्वनीमध्ये आणि ध्वनीचे प्रकाशभाषेत रूपांतर करणे शक्य असते. त्यामुळे त्यांना हे शक्य होते.
एक प्रकारे ही श्री गणेशाच्या अवस्थेशी एकरूपतेचे प्रतीक आहे. श्री गणेशाप्रमाणे श्री गुरु किंवा संत भक्तांच्या प्रार्थना ईश्वरापर्यंत पोचवतात आणि कृपा करतात.
या स्तरानंतर मोक्षगुरूंनी मौनात शिकवणे आणि संत किंवा गुरु पदावरील मोक्षगुरूंच्या शिष्यांनी मौनात शिकणे, ही शिष्याची अत्युच्च अवस्था असून गुरु-शिष्य परंपरेचे हे अत्युच्च मानक आहे.
५ ई. महाकारणदेह
५ ई १. कार्य : महाकारणदेह (आत्मा आणि ब्रह्म). आत्मा सर्वव्यापी असून सर्वांचा आत्मा एकच असतो.
या आत्म्यामध्ये अनेक सजीव-निर्जीव योनीतील जीव मायेच्या आवरणामुळे ते निर्माण झाल्याचे भासत असतात. जसे समुद्रात लाटा निर्माण होऊन त्या समुद्रापेक्षा वेगळ्या भासत असतात, अगदी तसे असते.
१. अध्यात्माच्या दृष्टीने हा एकच देह सजीव-निर्जीव प्राणीमात्र सर्वांचे शाश्वत स्वरूप असते. हेच आध्यात्मिक एकत्व, म्हणजे समत्व होय.
२. स्थूल देह प्रत्येकाचा वेगळा असतो, म्हणजे स्थूल देह स्तरावर विश्वात अनेकता म्हणजे विषमता असते.
३. चार्वाकाला मनुष्याविषयी केवळ स्थूल स्तराचे ज्ञान असल्याने त्याने ‘खा, प्या आणि मजा करा, हा एकच जन्म लाभतो’, अशा आशयाचे दर्शन मांडले आहे. हा ‘मायावाद’ होय.
४. सूक्ष्मदेह (मन) आणि कारणदेह (बुद्धी) ही विश्वमन अन् विश्वबुद्धी यांचा अंश असतात. या देहांना पूर्णत्व नसते. येथे द्वैत असते, म्हणजे या वाणीतून नामजप चालू झाल्यानंतर अनेकतेकडून द्वैताकडे, म्हणजे दोघांकडे प्रवास होतो. अनेक दर्शने या स्तरावरील द्वैतवादी दर्शन मांडतात. हा माया आणि ब्रह्म वाद होय.
५. महाकारण देहाच्या स्तरावर एकत्व, म्हणजे अद्वैत असते. ही आध्यात्मिक स्तरावरील समता होय. ही ‘ब्रह्म’ किंवा अद्वैत अवस्था होय. या स्तरावरील अद्वैत दर्शन हे जीवनाची परिपूर्णता प्रदान करणारे असते. उदा. जसे घरी एकच वीज सर्व उपकरणांतून फिरत असतांना एक उपकरण बल्बद्वारे प्रकाश, एक उपकरण शीतकपाटाद्वारे थंड करते, तर हिटरद्वारे गरम करता येते, तर वाद्यांना ते ध्वनी उत्पन्न करण्यास साहाय्यता करते. अगदी तसेच एकच परमसत्यरूपी ब्रह्म सृष्टीतील सजीव-निर्जिवांतून कार्यरत असून आपापल्या योनी, गुण, कौशल्य आणि भोग यांच्या माध्यमांतून कार्यरत होते. हेच अंतिम शाश्वत सत्य ज्याचा शोध अध्यात्ममार्गी साधनेच्या आंतरिक प्रवासाने अंतरंगात, तर विज्ञानवादी प्रयोगांद्वारे बाह्य विश्वात शोधत असतात.
६. काही दर्शने मायावाद, माया-ब्रह्मवाद आणि अद्वैतवाद या ३ प्रकारच्या दर्शनांच्या संमिश्र दर्शनांचे प्रतिनिधीत्व करतात.
५ ई २. जपाची वाणी : महाकारणदेहातून होणार्या नामजपाची वाणी परावाणी असते. परा अर्थात् पूर्ण प्रकाश वाणी, परमेश्वराची वाणी, म्हणजेच येथे नाम, नामी आणि नामाची अनुभूती एकच झालेली असते. येथे ‘मी’पणाच नसतो. त्यामुळे नाम घेत आहे, याची अनुभूतीही नसते. येथे नाम घेणारा नामस्वरूपात स्थिर झालेला असतो.
५ ई ३. घर्षण कसले ? : घर्षणरहित (संघर्षरहित) अवस्था असते. ‘सर्वेषाम् अविरोधेण’, जेथे घर्षणही नाही अन् संघर्षही नाही, अशी अवस्था असते.
५ ई ४. ऊर्जानिर्मिती : या वाणीमध्ये १०० टक्के प्रकाश ऊर्जा असते, म्हणजे प्रकाशस्वरूप अवस्था असते. जेव्हा विद्युत् चुंबकीय लहरी स्वरूप प्रकाशरूपी ऊर्जाच असते, तेव्हा ही मनुष्याची सत्-चित्-आनंद स्वरूप अवस्था असते.
१. नामजपाची ही वाणी सूक्ष्मतम वाणी होय.
२. या वाणीत नामधारक इतरांच्या अंतर्मनातील संस्कारांच्या ध्वनीस्पंदनांना प्रकाशात रूपांतरित करून समजून घेत असतो, असे होत नाही. येथे मनुष्य ज्ञानस्वरूप झाल्याने त्याला आवश्यक तेव्हा ज्ञानाद्वारे सर्वकाही कळते.
५ ई ५. ध्वनी आणि प्रकाश यांच्या ऊर्जेचे प्रमाण : परावाणीत १०० टक्के प्रकाश ऊर्जा, तर ० टक्के ध्वनीऊर्जेची निर्मिती होते.
५ ई ६. कोण ऐकू शकतो ? : परावाणी कुणीच ऐकू शकत नाही. नामधारक हा ज्ञानस्वरूप झाल्याने येथे अज्ञान स्वरूपात स्थित होतो. सर्वत्र साक्षीभाव असल्याने ‘ना क्रिया ना प्रतिक्रिया’, अशी अवस्था असते. आवश्यकतेनुसार ज्ञानाने तो सर्वकाही जाणू शकतो.
१. १०० टक्के प्रकाश ऊर्जा, म्हणजे १०० टक्के वेळी ईश्वराशी अखंड अनुसंधान असते, म्हणजेच स्वरूपानुभूती असते. परमात्म्याशी एकरूपता.
२. या स्तरानंतर मोक्षगुरु मौनातून आणि आवश्यकतेनुसार शब्दांतून शिकवत असतात.
(क्रमश: पुढच्या रविवारी)
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (३०.८.२०२३)