‘एप्रिल १९९७ मध्ये ‘नामजपाच्या ४ वाणींविषयी अभ्यासवर्ग घ्यावा’, असा सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. जयंत आठवले यांचा मला निरोप मिळाला. तेव्हा वाटले की, मला नामजपाच्या वाणीचे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा हे ४ प्रकार ठाऊक आहेत. याखेरीज मला अन्य माहिती नाही आणि एवढी माहिती अभ्यासवर्ग घेण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे प्रारंभी मी अभ्यासवर्ग घेण्यास नकार दिला. तेव्हा गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मला परत निरोप आला, ‘हा अभ्यासवर्ग तुम्हाला घ्यायचाच आहे.’ त्यामुळे त्यांची इच्छा हीच आज्ञा समजून मी अभ्यासवर्ग घेण्याचे ठरवले.
त्याकाळी मी एका जिल्ह्यात एका रुग्णालयामध्ये रुग्ण पहाण्यासाठी बसत असे. माझ्या ‘कन्सलटेशन’ (समुपदेशनाच्या) खोलीमध्ये प.पू. भक्तराज महाराजांचे छायाचित्र लावलेले होते. तेथे बसलो असतांना मी त्यांच्याशी संवाद साधला. मी तक्रारीच्या सुरात त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही नामजपाविषयी केवळ ४ शब्द सांगितले आहेत. एवढ्या माहितीवर अभ्यासवर्ग कसा घेणार ?’’ त्या काळात मी डॉक्टर असल्याचा मला अधिकच अहंकार होता. त्यामुळे नामजपाच्या वाणी आणि त्यांचे महत्त्व हे विज्ञान अन् वैद्यकीयशास्त्र यांनुसार सर्वांना समजवून सांगता यायला जमले, तरच ते सर्वांना कळेल, असे मला वाटले होते.
१. वेदांप्रमाणे कुणीतरी अपौरूषेय ज्ञान सांगितल्याप्रमाणे ज्ञान लाभणे
वेद अपौरूषेय असून ते कुणीही लिहिले नाहीत. ऋषींनी ते ऐकले आणि लिहिले. त्यामुळे त्यांना ‘श्रुति’ म्हणतात. त्या दिवशी मी अगदी वेदोनारायणाची अनुभूती देणारा प्रसंग अनुभवला. दुपारी १ वाजता शेवटचा रुग्ण आणि स्वागतकक्षावर बसणारी महिला गेली. मी दार ओढून ‘कन्सलटेशन’ खोलीमध्ये डोळे मिटून चिंतन करत बसलो होतो. त्या वेळी माझ्या बंद डोळ्यांसमोर दिसले की, दोन काळे ढग विरुद्ध दिशेने येऊन एकमेकांवर आदळले आहेत आणि त्यामुळे वीज कडाडून ढगांचा गडगडाट ऐकू येत आहे. तेव्हा डोळ्यांसमोर काही रूपेरी रंगांची अक्षरे आली. त्यात लिहिले होते, ‘‘तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे यात आहेत, ती लिहून घ्या.’’ काहीतरी वेगळे घडत असल्याचे वाटले आणि मी वही-पेन घेऊन लिहायला लागलो.
आधी अक्षरे दिसली होती; पण आता कुणीतरी (साक्षात् वेदोनारायणच) बोलत असल्याचे जाणवले. त्यांनी सांगितले की, जेव्हा कुठल्याही २ वस्तूंचे (वस्तू, व्यक्ती आणि पदार्थ यांचे) घर्षण होते, तेव्हा तेथे सगुण किंवा व्यक्त ऊर्जा निर्माण होते. (सिद्धांत : जेथे घर्षण तेथे ऊर्जानिर्मिती (सुप्त ऊर्जा व्यक्त) होते. घर्षण नसेल, तर ऊर्जा अव्यक्त रहाते.)
२. वीज चमकणे आणि ढगांचा गडगडाट यांमधील शास्त्र
वेदोनारायण यांनी पुढे सांगितले की, ढग एकमेकांवर आदळल्यानंतर प्रारंभी वीज चमकलेली दिसते आणि नंतर ढगांचा गडगडाट ऐकायला येतो. याचे कारण प्रकाशाचा वेग अधिक असल्यामुळे आपल्याला तत्क्षणीच वीज चमकलेली दिसते; मात्र ध्वनीची गती त्याहून अल्प असल्याने गडगडाट उशिरा ऐकायला येतो. हे लिहून घेतल्यावर मी त्यांना म्हटले, ‘‘आता तुम्ही जे काही सांगत होता, हे तर आम्हाला ८ वी – ९ वीला शिकवले आहे.’’ ते मला म्हणाले, ‘‘गडबड कशाला करतोस ? मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे.’’
३. स्वरूपस्थित मनुष्याची प्रकाशभाषा, तर अशुद्धचित्त देहबुद्धीस्थित मनुष्यांची नादभाषा असणे
नंतर त्यांनी मला प्रश्न विचारला, ‘‘मनुष्याची नादभाषा कि प्रकाशभाषा ?’’ मी त्यांना म्हटले, ‘‘देवांची प्रकाशभाषा, तर मनुष्याची नादभाषा.’’ त्यावर ते म्हणाले की, लौकीक दृष्टीने ते योग्य असले, तरी सर्व प्राणी जर परमात्म्याची अभिव्यक्ती आहे, तर सर्वांची भाषा ही प्रकाशभाषाच असायला पाहिजे. अर्थात् शास्त्राने सांगितल्यानुसार मनुष्याची (जो मायेत बद्ध, म्हणजे अशुद्ध चित्त असलेल्या आणि देहबुद्धीत अडकलेला असतो तो) नादभाषा असते. नामासह शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, तसेच त्याची शक्ती निगडित असते. मायेत बद्ध मनुष्य शब्दाचा केवळ शब्दार्थ समजू शकतो. अशुद्ध चित्तामुळे त्याची प्रकाशभाषा ग्रहण करण्याची आणि समजण्याची क्षमता नसते; म्हणून कलियुगात सामान्यतः मनुष्याची नादभाषा असते, असे म्हटले जाते.
साधना वाढल्यानंतर व्यक्ती पुढील पुढील अनुभूती घेत असते. आध्यात्मिक उन्नती ७० टक्के झाल्यानंतर उन्नतांना एखादा व्यक्ती न बोलताही त्याच्या मनातील विचार समजू शकतात. ते विश्वमनातील ईश्वरी विचार सतत ग्रहण करत असतात. त्यानुसार ते साधकांना, तसेच समाजाला कालानुरूप दिशा देत असतात. अशा शुद्धचित्त आणि स्वरूपस्थित उन्नतांची भाषा आता नादभाषेसह प्रकाशभाषा असते. अशा उन्नतांमध्ये एकाच वेळी मनुष्यत्व आणि देवत्व कार्यरत असते. साधना, म्हणजे एका अर्थाने मनुष्याने त्याच्या नादभाषेच्या क्षमतेचे प्रकाशभाषेच्या क्षमतेत रूपांतरित करत स्वस्वरूपाशी एकरूपता अनुभवण्याची क्रिया होय.
४. धर्मपालन, धर्माचरण आणि साधना हे मार्ग दाखवणार्या धर्ममार्तंडांविषयी कृतज्ञता ठेवा !
अध्यात्माचा विज्ञानाशी संबंध जोडून पहायचा असेल, तर जसे ढग एकमेकांवर आदळल्यानंतर ध्वनी आणि प्रकाश निर्माण होतो, अगदी तसेच बोलतांना असो किंवा नामजप करतांना ध्वनी अन् प्रकाश ऊर्जा निर्माण होत असते. काय बोलले जाते आणि कोणत्या उद्देशाने बोलले जाते, त्यानुसार ध्वनी अन् प्रकाश ऊर्जा निर्माण होते. त्यांचा व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वावर परिणाम होत असतो. या ऊर्जेद्वारे त्या व्यक्तीचे आभामंडल (ऑरा) निर्माण होते. या ऊर्जेद्वारे ती चांगली, अनिष्ट किंवा मिश्र शक्ती यांचा स्रोत बनते. यांद्वारे एकतर ती समाजाला पूरक, धोकादायक किंवा पूरक-धोकादायक बनत असते. ज्यांचे आभामंडल नकारात्मक असते, ते समाजाला अप्रत्यक्ष धोकादायक असतात; ज्यांचे आभामंडल सकारात्मक असते, ते पूरक असतात आणि दोन्ही असल्यास मिश्र असतात; परंतु यामुळे कुणी घाबरून जाण्याचे कारण नाही. ज्यांचे आभामंडल नकारात्मक आहे, त्यांना साधनेने यात परिवर्तन करून समाजाला पूरक होणे सहज शक्य आहे. हा सूक्ष्म विचार धर्मपरंपरेने धर्ममार्तंडांनी केला असून त्यांनी धर्मपालन, धर्माचरण आणि साधना यांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला समष्टीला पूरक होण्याची संधी अन् मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. याविषयी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच आहे, हे लक्षात असावे.
५. अध्यात्मशास्त्रानुसार मनुष्याचे देह आणि त्यांच्या नामजपाच्या वाणी
आधुनिक विज्ञान अनभिज्ञ असले, तरी अध्यात्मशास्त्राने मनुष्याचे ४ देह सांगितले आहेत. या ४ देहांच्या वैखरी, मध्यमा, परा आणि पश्यंती अशा ४ वाणी चढत्या क्रमाने उच्च कोटीच्या होत जातात. प्रत्येक वाणीचे महत्त्व काय ?
कोणत्या वाणीमध्ये नामजप केल्यास कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते ? त्याचे प्रमाण काय ? त्याची टक्केवारी
काय ? साधना, देहशुद्धी किंवा ईश्वरप्राप्ती यांच्यासाठी उपयोगिता काय ? अशी अनेक माहिती दिली असून त्याचा सुंदर तक्ता करायला सांगितला.
५ अ. स्थूलदेह
५ अ १. कार्य : स्थूलदेह, म्हणजे जे बाहेरून सर्व एकमेकांना पाहू शकतात तो देह. स्थूलदेह हे शाश्वत स्वरूप, मन आणि बुद्धी यांच्या कार्याचे प्रकटीकरणाचे माध्यम असते.
५ अ २. जपाची वाणी : देहातून होणार्या नामजपाला वैखरी वाणीतील नामजप म्हणतात.
५ अ ३. घर्षण कसले ? : स्थूलदेहाच्या जिव्हा, टाळू आणि ओठ यांच्या घर्षणाने जेव्हा तुम्ही नामजप करता, तेव्हा ती वैखरी वाणी असते.
५ अ ४. ऊर्जानिर्मिती : वैखरी वाणीतील नामजपामुळे होणारी ऊर्जानिर्मिती ही अधिकांश स्थूल (ध्वनी), तर अत्यल्प सूक्ष्म (प्रकाश) स्तराची असते.
५ अ ५. ध्वनी आणि प्रकाश यांच्या ऊर्जेचे प्रमाण : प्रकाशाच्या तुलनेत ध्वनीऊर्जा ही स्थूल असते. या वाणीतील नामजपात ९८ टक्के ध्वनी आणि २ टक्के प्रकाश ऊर्जा यांची निर्मिती होते.
५ अ ६. कोण ऐकू शकतो ? : ध्वनीऊर्जा अधिकाधिक असल्याने नामजप करणारा मनुष्य आणि जवळपासच्या व्यक्ती यांना ऐकू येते. २ टक्के प्रकाश ऊर्जा ही अत्यल्प असल्याने नामधारकाचे ईश्वर किंवा परमात्म्याशी अनुसंधान निर्माण होत नाही. उदा. जसे वर्गामध्ये एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात १०० पैकी २ गुण मिळवतो, तेव्हा शिक्षक जसे अशा विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष न देता एखाद्या ३० गुण मिळवणार्या विद्यार्थ्याला ३५ वर आणून कसे उत्तीर्ण करू शकतो, असा विचार करतो किंवा हुशार विद्यार्थ्याला अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो, अगदी तसेच ईश्वरही वैखरीत नाम घेणारा कुणीतरी जीव प्रयत्न करत आहे, हे एवढे जाणतो; मात्र त्याची तळमळ आणि प्रयत्न वाढेपर्यंत त्याकडे तो विशेष लक्ष देत नाही.
५ आ. सूक्ष्मदेह
५ आ १. कार्य : सूक्ष्मदेह, म्हणजे मन. मन स्थूलदेहाला अंर्तबाह्य व्यापून असते.
१. मनुष्य एकमेकांचे मन प्रत्यक्ष पाहू शकत नाहीत; मात्र ते त्यांच्या स्वत:च्या मनात काय चालले आहे, हे अनुभवू शकतो.
२. एखाद्या व्यक्तीच्या विचारांचे प्रतिबिंब त्याच्या आचरणातून प्रकट होत असते. किंबहुना व्यक्तीचे व्यक्तीमत्व आणि आचरण हे त्याचे विचार अन् संस्कार यांचे प्रतिनिधीत्व करते.
३. संत किंवा आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती हे आवश्यकतेनुसार अन्य व्यक्तीच्या मनातील विचारांना जाणू शकतात.
४. जरी प्रत्यक्ष दाखवू किंवा पाहू शकत नसले, तरीही आधुनिक विज्ञान मनाचे अस्तित्व मान्य करते; कारण प्रत्येकासाठी स्वतःचे मन हे त्याला अनुभवजन्य असते.
विज्ञानाच्या दृष्टीने मनाचा अनुभव हा व्यक्तीगत (सब्जेक्टिव) असतो आणि समष्टी म्हणजे (ऑब्जेक्टिव्ह) नसतो. सध्या विज्ञानवाद्यांचा आग्रह समष्टी (ऑब्जेक्टिव्ह) स्तराच्या अनुभवासाठी असतो. त्यालाच ते विज्ञान म्हणून मान्यता देतात. सर्व व्यक्तींचे एक सामायिक मन (विश्वमन) असते, ज्यांशी ते सर्व एकत्वात बांधलेले असतात. व्यक्तीचे मन स्वतःचे अनुभव आणि संस्कार यांसह विश्वमानातून विचारांची देवाण-घेवाण करत असते.
५. सूक्ष्मदेह हा अशुद्ध अवस्थेत चित्तावरील विविध जन्मांच्या त्रिगुणात्मक संस्कारानुरूप कार्यरत असतो, तर शुद्धावस्थेत तो ईश्वरी इच्छेनुरूप कार्यरत होतो. अशुद्ध अथवा शुद्ध कारणदेहाच्या स्थितीनुसार मनावर प्रभाव पडत असतो.
५ आ २. जपाची वाणी : मनाद्वारे होणार्या नामजपाला ‘मध्यमा वाणीतील नामजप’ म्हणतात. तो मनातल्या मनात सतत व्हायला लागला, मन स्थिर होत गेले, असे अनुभवतो, तेव्हा ती ‘मध्यमा’ वाणी असते.
५ आ ३. घर्षण कसले ? : स्थूलदेहाप्रमाणे सूक्ष्मदेह असतो. सूक्ष्मदेहाच्या सूक्ष्म जिव्हा, सूक्ष्म टाळू आणि सूक्ष्म ओठ यांच्या घर्षणाने जेव्हा नामजप होतो, तेव्हा तो मध्यमा वाणीतील नामजप असतो. प्रारंभी मनातल्या मनात नामजप करण्याचा प्रयत्न करतांना मनातील या सूक्ष्म घर्षणाची अनुभूती येऊ शकते. ज्यांचा पूर्वजन्मीच्या साधनेत आपोआप मध्यमेतील नामजप चालू होतो, त्यांना या घर्षणाची अनुभूती आली, तरीही ती स्मरण रहाणे शक्य नसते.
५ आ ४. ऊर्जानिर्मिती : मध्यमा वाणीतील नामजपातून अधिकतम स्थूल (ध्वनी), तर अधिक सूक्ष्म (प्रकाश) स्तराची ऊर्जा निर्माण होते.
५ आ ५. ध्वनी आणि प्रकाश ऊर्जेचे प्रमाण : मध्यमा वाणीतील नामजपामध्ये ७० टक्के ध्वनी आणि ३० टक्के प्रकाश ऊर्जा यांची निर्मिती होते.
५ आ ६. कोण ऐकू शकतो ? : स्थूल ध्वनी न्यून झाला की, त्यामुळे इतरांना ऐकू येत नाही; परंतु ध्वनीऊर्जा अद्याप अधिक असल्याने नामजप करणार्याला मनातल्या मनात तो ऐकू येतो. ईश्वराच्या दृष्टीने या नामधारकाची नोंद होते. ३० टक्के प्रकाश ऊर्जा निर्माण होत असल्याने आता बर्यापैकी साधकाचे ईश्वराशी अधूनमधून अनुसंधान निर्माण होते. ईश्वराचे लक्ष अशा साधकांकडे जाते. जसे एखाद्या विषयात ३० टक्के गुण प्राप्त करणार्याला आधी ३५ वर आणून उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि नंतर त्याची क्षमता वाढवण्याचा शिक्षक विचार करतात, अगदी तसेच ईश्वरही कुणीतरी तळमळीने साधनेला प्रारंभ केला आहे, हे जाणून त्याच्यावर कृपा करण्यास प्रारंभ करतो.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती (ऑगस्ट २०२३)