१. प्रवास दूरचा असल्यामुळे जुन्या मारुति वाहनाचे इंजिन तापून ते बंद पडण्याची भीती वाटत असल्याने प्रवास सुखरूप होण्यासाठी गुरुचरणी प्रार्थना करणे
‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म गुरु डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा होता. त्या वेळी आम्हाला ब्रह्मोत्सवाला गोव्याला जायचे होते. त्यासाठी आम्ही एका भाड्याच्या ‘कार’चे नियोजन केले होते; परंतु त्या ‘कार’चा अपघात झाला. त्यामुळे आमची २० वर्षे जुनी वापरात असलेली मारुति गाडी घेऊन जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. प्रवास दूरचा होता आणि गाडीचे इंजिन तापून ती बंद पडण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे आम्ही सर्व साधकांनी गुरुमाऊलींच्या चरणी ‘प्रवास सुखरूप होऊ दे’, अशी तळमळीने प्रार्थना केली.
२. ‘गुरुचरणी प्रार्थना केल्यावर गुरु कसे साहाय्य करतात’, हे अनुभवणे
आम्ही प्रवासाला आरंभ करण्यापूर्वी वाहनाची दृष्ट काढली, तसेच उन्हाचा त्रास वाहनाला होऊ नये; म्हणून आम्ही सकाळी सात वाजताच प्रवासाला आरंभ केला. आम्हाला साधारण १७५ किलो मीटर प्रवास करायचा होता. तो प्रवास करतांना आम्हाला पूर्ण प्रवासात सूर्यदर्शनच झाले नाही. वातावरण पूर्ण ढगाळ होते. ‘आम्ही पहाटेचाच प्रवास करत आहोत’, असे आम्ही अनुभवत होतो. त्यामुळे गुरुचरणी तळमळीने प्रार्थना केल्यावर ‘गुरु साहाय्यासाठी कसे धावून येतात’, हे आम्ही अनुभवले.
३. गुरुकृपेमुळे प्रवास सुखकर होणे
या प्रवासाच्या वेळी मला महाभारतातील एका प्रसंगाची आठवण झाली. शिष्य अर्जुन एक ‘पण’ (प्रतिज्ञा) करतो. तेव्हा शिष्य अर्जुनाचा ‘पण’ पूर्ण होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्या सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून टाकतो. त्याप्रमाणे आपल्या साधकांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये; म्हणून गुरुदेवांनी सूर्यनारायणाला ढगांनी आच्छादून टाकले. त्यामुळे आमच्या वाहनाचे इंजिन तापलेच नाही आणि आमचा एवढा मोठा प्रवास गुरुदेवांच्या कृपेमुळे सुखकर झाला.
४. कृतज्ञता
आम्ही सर्व साधक वाहनाने प्रवास करत होतो. तेव्हा ‘गुरुमाऊली साक्षात् भगवान विष्णूचा अवतार आहेत’, याची आम्ही प्रचीती घेतली आणि आम्ही सर्व साधक गुरुचरणी नतमस्तक झालो. मी हे टंकलेखन करत होतो. तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.’
– डॉ. रविकांत नारकर, पडेल, ता. देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (१८.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |