१. आदिशक्ति ही जगत्जननी असून तिला ऋषिमुनी आणि देवता यांनी ‘विश्वरूपिणी अन् ब्रह्मांडनायकी’, असेही संबोधणे
‘आदिशक्ति ही जगत्जननी आहे. ‘जननी’ हे शब्द तिला स्मरूनच लिहिले असावे. ऋषिमुनी आणि देवता यांनी तिला ‘विश्वरूपिणी आणि ब्रह्मांडनायकी’, असेही संबोधिले आहे. दया, करुणा, प्रीती, क्षमा आणि कारुण्याचे साक्षात् रूप असलेली ‘आदिशक्ति’ ही मनोवांछित फल देणारी आहे.
२. भक्ताची मनोकामना निरनिराळी असली, तरी जगत्जननी आदिशक्तीने सर्वांच्या इच्छा पूर्ण करणे
भक्त हा बालक, म्हणजेच याचक आहे. आई स्वरूपातील आदिशक्ति ही दात्री आहे. याचक भक्त त्याच्या मनातील संस्कारांप्रमाणे याचना करतो. जगत्जननी आदिशक्ति सर्वांची इच्छा पूर्ण करते. भक्ताची मनोकामना निरनिराळी असू शकते. कुणी धन-धान्य, समृद्धी मागतो, तर कुणी उत्तम आरोग्याची कामना करतो. कुणी मातेकडे पुत्रभाग्य, कुटुंबाचे कल्याण, विवाह, नोकरी आणि शिक्षण आदींसाठी याचना करतात, तर कुणी क्लेश, भांडण, खटले, दुःख आणि मानसिक छळ दूर होण्यासाठी प्रार्थना करतात. देवी सर्वांचे ऐकते आणि सर्वांना त्यांचे मनोवांछित फल देते.
३. खर्या साधकाने किंवा उत्तम शिष्याने देवीकडे कोणत्या गोष्टीची याचना करावी ?
‘व्यष्टी साधना चांगली होण्यासाठी अखंड भक्ती करता यावी’, आणि ‘समष्टी साधना चांगली होऊन धर्मसंस्थापना करता यावी’, यासाठी याचना करावी.
४. प्रत्येक युगात देवी भक्तांनी, म्हणजे ऋषिमुनी, देवता आणि मनुष्य यांनी आर्ततेने केलेल्या हाकेला धावून आली आहे. त्या सर्वांनी देवीला प्रार्थना केलेली आहे.
‘हे आदिशक्ति, हे जगत्जननी, ही सत्चित्स्वरूपिणी, हे ललितांबिका, हे जगत्माते, ‘आम्हा भक्तांची गुरुभक्ती दृढ कर. माते, धर्मसंस्थापनेसाठी धावून ये. माते धावून ये. हे जगंदबे, तू असुर संहारिणी आहेस. तू दुष्टांचे हनन करणारी आहेस. धर्म आणि भक्त यांच्यासाठी प्रकट हो’, अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१०.२०२३) (नवरात्रीचा दुसरा दिवस)