(म्हणे) ‘हिंदु धर्मात शूद्र म्हणजे वेश्येचा मुलगा !’ – प्राध्यापक के.एस्. भगवान 

प्राध्यापक के.एस्. भगवान यांचे विद्वेषी विधान !

के.एस्. भगवान

मैसुरू (कर्नाटक) – येथे ‘महिषा दसरा नियोजन समिती’ला जाहीर कार्यक्रम घेण्याची अनुमती न देता केवळ समुदाय भवनाच्या आतील भागात कार्यक्रम करण्यास अनुमती देण्यात आली होती. ‘महिषा उत्सव’ या नावाखाली झालेल्या या कार्यक्रमात हिंदु धर्माविषयी अवमानकारक टीका करण्यात आली. यात अग्रभागी प्रा. के.एस्. भगवान होते. ‘हिंदु धर्मात शूद्र म्हणजे वेश्येचा पुत्र’, असे विद्वेषी विधान प्रा. भगवान यांनी केले.

प्रा. भगवान कार्यक्रमात म्हणाले की,

१. ‘देवांनी शुद्रांची निर्मिती केली ती ब्राह्मणांची सेवा करण्यासाठी’, असे ब्राह्मणांना वाटते. ‘सर्व शूद्र हे ब्राह्मणांचे गुलाम’, असे समजले जात आहे. असा धर्म आम्हाला नको. (एकाच वर्णाचा आणखी किती वर्षे प्रा. भगवान यांच्यासारखे लोक द्वेष करत रहाणार आहेत ? – संपादक)

२. गौतम बुद्धांनी अग्नीपूजेवर प्रश्‍न उपस्थित केला होता. ‘अग्नीपूजेचा काही उपयोग नाही’, असे ते म्हणाले होते. त्यामुळे राजा-महाराजांनी अग्नीपूजा थांबवली. यामुळेच बुद्धाला पहाताच ब्राह्मणांना राग येतो. आजही तोच द्वेष ते पुढे नेत आहेत. ब्राह्मण होम करतांना अग्नीमध्ये वडाच्या झाडाच्या समिधा घालतात; कारण बुद्धाला वटवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. (अशा ‘शोधा’साठी भगवान यांना अजूनपर्यंत कुणी पारितोषिक का दिले नाही, याचेच नवल वाटते ! – संपादक)

३. ब्राह्मणांचे संप्रदाय हे अर्थहीन आहेत. त्यांना काहीच अर्थ नाही. बुद्धांनी ज्ञान दिले. वेदिक लोक समाजाला अज्ञान देत आहेत. (कोण अज्ञान देत आहे, हे समाजाला लक्षात येत आहे ! – संपादक)

४. जानव्यावरून जात ओळखतात. हिंदु धर्म आमचा धर्म नाही. ब्राह्मण आणि वेदिक वेगळ्या देशांतून आलेे. (हे कुठेही सिद्ध झालेले नसतांना प्रा. भगवान यांच्यासारखे लोक अनेक वर्षे ‘खोटे बोला; पण रेटून बोला’ अशा पद्धतीने बोलत आहेत ! – संपादक)

५. देवाने कोरोना का थांबवला नाही ? देवस्थानात होणार्‍या चोर्‍या देव का थांबवत नाही ? देवच चोर झाला आहे का ? (असे प्रश्‍न प्रा. भगवान याला उत्तरदायी असणार्‍या शासनकर्त्यांना का विचारत नाहीत ? – संपादक)

६. सर्वजण रामराज्याविषयी सांगतात. ते ११ सहस्र वर्षे होते, असे सांगितले जाते. खरेतर ते ११ वर्षेच होते. रामाने गरोदर सीतेला अरण्यात सोडले. तिचे काय झाले, हे रामाने विचारले नाही. अश्‍वमेध यज्ञाच्या वेळी त्याला पत्नी आणि मुले यांच्याविषयी समजले. १५ वर्षे पत्नी आणि मुले यांना न विचारणारा हा कसला राम ? रामराज्य म्हणजे शुद्रांंची हत्या करणारे राज्य ! (भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी स्पष्ट करण्यात आलेली आहे. रामायणातही त्याविषयी सांगितले आहे. तरीही अशा प्रकारचे जाणीवपूर्वक प्रश्‍न निर्माण करून श्रीरामांविषयी विद्वेष पसरवणार्‍या भगवान यांच्या विरोधात धर्माभिमान्यांनी धार्मिक भावना दुखावल्यावरून तक्रार करून त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • तोंड आहे म्हणून काहीही बोलणारे असे प्राध्यापक अन्य धर्मियांविषयी असे बोलण्याचे धाडस करत नाहीत; कारण त्याचा परिणाम त्यांना ठाऊक असतो !
  • अशा प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले असेल, याची कल्पनाच करता येत नाही ! शिक्षक नीतीमत्तेचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतो; मात्र येथे असे प्राध्यापक समाजात द्वेष पसरवत आहेत !