देशाचा संसार चांगला होण्यासाठी आम्ही श्री दुर्गामातेकडे आशीर्वाद मागायला आलो आहोत ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीच्या प्रारंभी पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव (हातात झेंडा घेतलेले) शेजारी हणमंतराव पवार, तसेच अन्य

सांगली, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री दुर्गादेवी कायमच आपल्या हृदयात आहे. श्री दुर्गामातेकडे आपण व्यक्तीगत काही मागण्यासाठी आलेलो नाही, तर भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त होण्यासाठी आपण देवीकडे मागणे मागूया ! मागणे मागितल्यावर श्री दुर्गादेवी शिवछत्रपतींचे कार्य करण्यासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती आपल्याला देईल, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री दुर्गामाता दौडीच्या पहिल्या दिवशी माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गामाता मंदिरासमोर धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपाशी विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, डॉ. राजेंद्र भागवत, जिल्हा सरकारी अधिवक्ता प्रमोद भोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दौडीचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी धारकरी सर्वश्री हणमंत पवार, राजू पुजारी, अविनाश सावंत, मिलिंद तानवडे, राहुल बोळाज, मंगेश तांदळे, प्रताप बानकर, शिवाजीराव शिंदे, सूरज कोळी यांसह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा

उंचगाव येथे सरपंच मधुकर चव्हाण ध्वजपूजन करतांना

उंचगाव येथील मंगेश्वर मंदिरापासून दौडीस प्रारंभ झाला. गावातील विविध मार्गांवरून जाऊन मंगेश्वर मंदिरापाशी दौडीची समाप्ती झाली. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री विजय गुळवे, अजित पाटील, शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सरपंच मधुकर चव्हाण यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. या प्रसंगी ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हम सब इस्रायलके साथ’, अशा घोषणा देण्यात आल्या.

श्री दुर्गामाता दौडीचा उद्देश ! 

नवरात्र कालावधीत हिंदु ज्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर नवरात्र पाळतो, त्याप्रमाणे देश, धर्म आणि देव यांच्या रक्षणासाठी सामाजिक नवरात्र पाळली पाहिजे, ते म्हणजे ‘श्री दुर्गामाता दौड’ होय. या दौडीत अग्रभागी भगवा ध्वज असतो. शिवतीर्थापासून प्रथम धारकरी माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरापर्यंत धावत जातात. येथे श्री दुर्गामातेची आरती होते. यानंतर श्री दुर्गामातेचा आशीर्वाद घेऊन प्रतिदिन वेगवेगळ्या मार्गांवरून धारकरी विविध स्फूर्तीगीते म्हणत जातात.