हमासने ओलिसांची सुटका करावी ! – संयुक्त राष्ट्रांचे आवाहन

११ लाख गाझावासियांचे स्थलांतर अशक्य गोष्ट असल्याचे केले विधान !

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटनियो गुटरेस

न्यूयॉर्क (अमेरिका) – इस्रायलने गाझा पट्टीत सैन्य घुसवण्यास चालू केले आहे. येथे ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी इस्रायल प्रयत्न करत आहे. तत्पूर्वी त्याने येथील उत्तर भागातील नागरिकांना २४ घंट्यांत दक्षिण गाझामध्ये जाण्याची सूचना केली होती. येथे जवळपास ११ लाख लोक आहेत.

याविषयी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटनियो गुटरेस यांनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘‘२४ घंट्यांत हे शक्य नाही. शेवटी युद्धाचेही काही नियम असतात. या नागरिकांना रहाण्याची, जेवण, पाणी आदीची सिद्धता नाही. हे धोकादायक आणि अशक्य आहे.’’ गुटरेस यांनी हमासला आवाहन केले आहे की, त्याने ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका करावी.