सध्या मराठी माणूस आणि भाषा यांवर होत असलेल्या अन्यायाच्या बातम्या पुष्कळच चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथे मराठी बोलायचा आग्रह केल्याने एका मराठी तरुणाला क्षमा मागायला सांगण्यात आली. पुण्यातही एका आस्थापनाने मराठी कर्मचार्यांना वेतन दिले नाही, तर एका आस्थापनाने मराठी तरुणांना नोकरी नाकारली. मागील वर्षीही मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला घर नाकारल्याच्या बातमीची पुष्कळ चर्चा झाली होती, तर एका आस्थापनाने नोकरीसाठी काढलेल्या विज्ञापनात ‘Marathi people are not welcome here’ (मराठी माणसांचे येथे स्वागत नाही), असे म्हटले होते. अशा बातम्यांची तेवढ्यापुरती चर्चा होते. मतांपुरता त्या बातम्यांचा वापर केला जातो. ‘महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी’, अशी बातमी दिली जाते आणि काही दिवसांनी तीही बंद होते.
स्वभाषेसाठी इस्रायलचा आदर्श हवा !
स्वतःच्या भाषेची लाज मराठी माणसाइतकी कुणालाच वाटत नसेल. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी ८ कोटींपेक्षा अधिक लोक मराठी बोलणारे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असूनही मराठीची मान खाली जात आहे. ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे. केवळ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; म्हणून मराठी जपली जाणार नाही. तर भाषा ही माणसाच्या मनातून आणि ती बोलणार्याच्या अभिमानातून जपली जाते. हिब्रू भाषेसाठी इस्रायल देशाने केलेले प्रयत्न प्रसिद्ध आहेत. एका नष्ट होत चाललेल्या भाषेला केवळ ती भाषा बोलणार्यांच्या प्रेमाने पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले.
– कु. अन्नदा विनायक मराठे
१. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी मराठी माणसाचे प्रयत्न आवश्यक !
असे प्रकार सातत्याने घडत असतांना त्यावर सखोल विचार होतांना दिसत नाही. वरवरची कारणे शोधली जातात आणि त्यामुळे उपायही वरवरचेच होतात. केवळ दमदाटी, मारामार्या करून हे प्रश्न सुटणारे नाहीत. हे प्रकार थांबवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
२. मराठीविषयीचे गैरसमज दूर करायला हवेत !
सगळ्यांत आधी मराठी माणसाची गळचेपी होण्याच्या कारणांचा विचार करावा लागेल. मराठी भाषेविषयी मराठी माणसाच्या मनात असलेला न्यूनगंड हे सगळ्यांत मोठे कारण आहे. ‘आपली भाषा अल्प दर्जाची आहे. महाराष्ट्र सोडला, तर मराठीला कुणीच विचारत नाही. मराठी बोलले, तर मान मिळत नाही किंवा चांगल्या वेतनाची नोकरी मिळत नाही’, असे अनेक गैरसमज आज वर्षानुवर्षे मराठी माणसाच्या मनामध्ये आहेत.
३. इंग्रजी भाषेचे आकर्षण
इंग्रजी भाषेविषयी असेलेले आकर्षण, हेही मराठीच्या गळचेपीमागचे महत्त्वाचे कारण आहे. मराठी माणूस स्वतःच्या मुलांना मराठी शाळेत घालायला सिद्ध होत नाही. ‘इंग्रजी शिकले, तर आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळेल, परदेशात पाठवता येईल, समाजात मान मिळेल’, या आकर्षणामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्राधान्य दिले जाते. मराठी माणूस मुंबईसारख्या ठिकाणी मराठीत बोलतही नाही. त्याच्या बोलण्याचा प्रारंभच हिंदीतून होतो.
४. मराठी बोलण्याची लाज वाटणे
मराठी न स्वीकारण्याची अनेक कारणे दिली जातात. त्यातील वेलांटी, उकार, काना, मात्रा, विरामचिन्हे फारच कटकटीची वाटत असल्याने मराठी लिहिण्यापेक्षा इंग्रजीला प्राधान्य दिले जाते; पण प्रत्येक भाषेची स्वतःची अशी लिखाणाची पद्धत असते. मराठीमध्ये असलेली वर्णमाला, विरामचिन्हे यांवर अनेक वैज्ञानिक प्रयोग झाले आहेत आणि मराठीची देवनागरी लिपी, वर्णमाला ही इंग्रजीपेक्षा पुष्कळ अधिक वैज्ञानिक असल्याचे सिद्ध झाले आहे; पण आज मराठी लिखाणासमवेतच ती बोलण्याचीही लाज वाटत आहे. आपल्याला मराठी नीट लिहिता, वाचता, बोलता येत नाही, याचा लोकांना पुष्कळ अभिमान वाटतो. मुले मराठीत न बोलता इंग्रजीत बोलावीत, यासाठी प्रयत्न केले जातात. इंग्रजी बोलता न येणे न्यूनपणाचे लक्षण मानले जाते. असे असेल, तर मराठीला अभिजात दर्जा मिळून काय उपयोग ? तो केवळ कागदावरच राहील.
टीव्हीवर दिसणार्या कार्यक्रमांमधूनही हिंदी कार्यक्रमांची नक्कल केली जाते. त्यात दाखवले गेलेले ‘नाच’ हे हिंदी गाण्यांवर असतात किंवा हिंदी कलाकारांना त्या ठिकाणी बोलावण्यात येते किंवा असेच मराठी कलाकार बोलावले जातात, जे हिंदीमधून प्रसिद्धीला आले आहेत. एखादा कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत गेला, म्हणजे तो मोठा झाला, हे लोकांच्या मनावर सातत्याने बिंबवले जाते.
५. मराठीचे महत्त्व मुलांवर बिंबवायला हवे !
मराठी भाषा जपण्यासाठी प्रशासकीय स्तरावर काहीच प्रयत्न होतांना दिसत नाहीत. केवळ शाळेत मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करून मराठी भाषा जपली जाणार नाही, तर शाळेतून मराठी भाषेचे महत्त्व आणि अभिमान मुलांच्या मनावर बिंबवला गेला पाहिजे. सगळ्यांत आधी ‘मराठी बोलणे, लिहिणे न्यूनपणाचे नाही’, हे मुलांना समजावून सांगायला हवे.
६. शासकीय व्यवस्थेत पालट हवेत !
शासकीय व्यवस्थेतही पुष्कळ मोठ्या प्रमाणात पालट करणे आवश्यक आहे. प्रत्येक शासकीय कागद हा मराठी भाषेत प्रसिद्ध झाला पाहिजे. थोड्या सोप्या मराठीचा वापर या कागदांमध्ये करायला हवा, जेणेकरून तो समजून घ्यायला त्रास पडणार नाही. शासकीय स्तरावरून ही सक्ती व्हायला हवी. मंत्र्यांपासून जे लोक सरकार आणि शासकीय यंत्रणेमध्ये आहेत, त्यांची मुले ही मराठी माध्यमाच्या शासकीय शाळेतच शिकली पाहिजेत. ज्यामुळे शासकीय शाळांची स्थितीही सुधारली जाईल. शासकीय शाळांमध्ये नाही, तर कॉन्व्हेंट आणि अन्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्येही मराठी भाषा शिकवण्यासह बोलणेही सक्तीचे करायला हवे. सरकारने मराठीला मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात कठोर नियम करून ते नीट राबवले जात आहेत ना ? याकडेही लक्ष दिले पाहिजे. नेहमीप्रमाणे नियम केवळ कागदावरच न रहाता प्रबळ राजकीय इचछाशक्तीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात मराठी बोलणे, लिहिणे सक्तीचे केले पाहिजे.
७. मराठीचा सन्मान आपणच राखायला हवा !
अगदी साध्या साध्या ठिकाणीही आपण आपल्या मराठीला मागे सरकवतो. नवरात्रात आपण ‘भोंडला’ खेळण्याऐवजी ‘गरबा’ खेळतो, वाढदिवसाला औक्षण करण्याऐवजी केक कापतो, कबड्डी, खो-खो यांपेक्षा आपल्याला क्रिकेट आवडते आणि ‘आई-बाबा’ म्हणण्याऐवजी ‘मम्मा अन् पप्पा’ म्हणतो. आपण मराठी संस्कृती विसरत चाललो आहोत. हे आपण जाणूनबुजून करत आहोत. पाश्चात्त्य विकृतीची भुरळ इतकी पडली आहे की, आपण मराठीशी नाळ तोडत आहोत. इंग्रजी भाषा आणि संस्कृती हेच आज आपले जीवन बनत चालले आहे अन् त्याचा दोष मात्र आपण परप्रांतियांना देत आहोत. आपण आपल्या चुका दुसर्यांवर लादत आहोत. खरे तर ‘मराठीला मागे सारणे, ही आपली चूक आहे’, असे आपल्याला वाटतच नाही, तर ती आपण समाजात स्थान मिळवण्यासाठीची आवश्यकता समजत आहोत. जोपर्यंत आपण आपल्या मराठीचा सन्मान राखणार नाही, तोपर्यंत भाषेला आणि व्यक्तीला इतरांकडून असेच अपमान सहन करावे लागतील.
मराठी माणूसच मराठीपासून लांब गेला, तर मराठीही संपत जाईल. आपणच जर आपल्या भाषेला न्यून लेखले, तर अन्य भाषिक आपल्या भाषेला न्यून लेखणारच आहेत. त्यामुळे आधी आपण आपल्या वागण्यात सुधारणा केली पाहिजे. आपण मराठी बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे, मराठी शाळांचे संवर्धन केले पाहिजे; कारण कोणतीही भाषा कितीही श्रेष्ठ असली, तरीही ती व्यवहारात राहिली, तरच जपली जाते.
– कु. अन्नदा विनायक मराठे, दापोली, जिल्हा रत्नागिरी. (८.१.२०२५)
संपादकीय भूमिका :स्वभाषा जपण्यासाठी इस्रायलने केलेल्या प्रयत्नांप्रमाणे भारतियांनी संस्कृत आणि मातृभाषा जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! |