भारतभूमी हीच लोकशाहीची जननी !

आपल्‍या देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जी-२०’च्‍या (जी २० म्‍हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्‍यवर्ती बँक गव्‍हर्नर यांची संघटना.) राष्‍ट्रप्रमुखांना आणि या परिषदेसाठी आलेल्‍या सर्व मान्‍यवरांना भारत सरकारच्‍या वतीने ‘भारत लोकशाहीची जननी’ ही ५२ पृष्‍ठांची पुस्‍तिका भेट दिली. या पुस्‍तिकेद्वारे आपल्‍या देशाच्‍या राजकीय, सांस्‍कृतिक आणि धार्मिक परंपरा यांचा संक्षिप्‍त इतिहास विश्‍वात पोचवला आहे. आजपर्यंतच्‍या एकाही पंतप्रधानाने अधिकृतपणे आपल्‍या देशाची संस्‍कृती, राजकीय आणि धार्मिक परंपरा यांचा जगाच्‍या व्‍यासपिठावरून परिचय करून दिला नव्‍हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे काम करून संस्‍कृतीनिष्‍ठ देशबांधवांच्‍या मनात आदराचे स्‍थान कायमचे निर्माण केले आहे. त्‍यांनी केलेल्‍या या महान कार्यासाठी त्‍यांचा गौरव करणे भारताचे नागरिक म्‍हणून आपले कर्तव्‍य आहे.

१. भारतीय इतिहास आणि हिंदु संस्‍कृती यांचे श्रेष्‍ठत्‍व दाखवण्‍याचा अभिमानास्‍पद प्रयत्न !

कोणत्‍याही प्रकारची मानसिक, वैचारिक आणि बौद्धिक गुलामगिरी स्‍वतंत्र भारत यापुढे कधीही मनात बाळगणार नाही, याची ग्‍वाही वेळोवेळी पंतप्रधानांनी दिली. आता तर त्‍यांनी सरकारच्‍या वतीने अधिकृतपणे शब्‍दरूपात आपल्‍या देशाची वैशिष्‍ट्यपूर्ण समाजव्‍यवस्‍था, राज्‍यव्‍यवस्‍था यांची कागदपत्रे जगासमोर सादर केली आहेत. सर्व जगाने आपल्‍या देशाच्‍या हिंदु संस्‍कृतीला अपकीर्त करून आपल्‍यावर दास्‍यत्‍व लादले. परकियांची भाषा, त्‍यांची संस्‍कृतीच श्रेष्‍ठ असा अपप्रचार करून भारतीय इतिहास आणि हिंदु संस्‍कृती भ्रष्‍ट केली. परकीय आक्रमकांनी केलेली भ्रष्‍टता नष्‍ट करून त्‍याचे शुद्धतेत, पावित्र्यात रूपांतर करणे आणि सत्‍य जगासमोर शासनकर्ता म्‍हणून मांडण्‍याचे दायित्‍व आजपर्यंतच्‍या एकाही पंतप्रधानाकडून निभावले गेले नाही. मोदींनी हा कलंक नष्‍ट करून आपल्‍या देशाची थोरवी उच्‍चारवाने सार्‍या विश्‍वाला सांगितली, ही निश्‍चितच अभिमानाची गोष्‍ट आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

२. भारताच्‍या लोकशाहीचे वैशिष्‍ट्य

भारताच्‍या लोकशाहीचे वैशिष्‍ट्य इथल्‍या समाजाच्‍या विविधतेत दडले आहे. भारताची भूमी ही विशाल आहे आणि हिंदु संस्‍कृती विश्‍वाला सामावून घेणारी आहे; म्‍हणून भारताची लोकशाहीही सर्वसमावेशक आहे. हे भारताचे वैशिष्‍ट्य आजपर्यंत जगासमोर मांडण्‍यात आले नाही. ‘आपल्‍या देशाला कोट्यवधी वर्षांची परंपरा लाभली आहे’, असे सांगितले, तर जग त्‍यावर विश्‍वास ठेवत नाही, हे दुर्दैव आहे. जगाने विश्‍वास ठेवला नाही म्‍हणून ‘भारताला कोट्यवधी वर्षांची परंपरा आहे’, ही गोष्‍ट असत्‍य ठरत नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.

३. देशातील विविधता हे भारताचे वैशिष्‍ट्य

भारताच्‍या भूमीत पावला पावलावर आपल्‍याला विविधता आढळते. या देशात विविध प्रकारच्‍या जाती, उपजाती आहेत. अनेक पंथ आणि उपपंथही आपल्‍या देशात आढळतात. या जाती, उपजाती आणि विविध पंथ असले, तरीसुद्धा पूर्वी यात कोणत्‍याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्‍हता. याचे कारण असे की, ‘भारताची समाजरचना ही कोणताही माणूस दुसर्‍या माणसापेक्षा श्रेष्‍ठ नाही’, या सिद्धांतावर उभी आहे. हा सिद्धांत भारतातील लोकशाहीचे आधारभूत तत्त्व आहे. भारतात विविध प्रकारच्‍या चालीरिती ठळकपणे आढळून येतात. भारतातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीला देण्‍यात आलेले स्‍वातंत्र्य समान आहे. भारत सोडून जगातील अनेक भागांमध्‍ये गुलामगिरी अस्‍तित्‍वात होती. भारतात मात्र गुलामगिरीचे मूळ रुजू शकले नाही. भारताचे हे वैशिष्‍ट्य भारतीय लोकांनाही कधी सांगण्‍यात आले नाही. आपल्‍या देशात विविध प्रकारची जीवनशैली, विविध भाषा आणि बोलीभाषा यांनी भारतीय समाजजीवन फुलले आहे. विविध प्रकारच्‍या स्‍वयंपाकाच्‍या पद्धती हेही भारताचे वैशिष्‍ट्य आहे. दुर्दैवाने भारतातील या विविधतेला विषमता म्‍हणून जगासमोर सादर करण्‍यात आले.

४. भारतियांनी देशाची उज्‍ज्‍वल परंपरा आणि गुणवैशिष्‍ट्ये यांचा परिचय करून घेणे आवश्‍यक !

जातीपातीत वैमनस्‍य नसतांनाही परकीय आक्रमकांनी जाणीवपूर्वक एकसंध असलेला भारतीय समाज विभाजित करण्‍याचा यशस्‍वी प्रयत्न केला. त्‍याचे दुष्‍परिणाम आपण आजही भोगत आहोत. भारतीय समाजाने जर ठरवले तर जाती, उपजाती, पंथ, उपपंथ अशी विविधता कायम ठेवून संपूर्ण भारतीय समाज एकसंध होऊ शकतो. त्‍यासाठी प्रत्‍येक नागरिकाने आपल्‍या देशाची उज्‍ज्‍वल परंपरा आणि गुणवैशिष्‍ट्ये यांचा परिचय करून घेतला पाहिजे, तरच आपल्‍याला आपली खरी ओळख कळेल अन् आपल्‍या चुका आपल्‍याला सुधारता येतील. याच हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत लोकशाहीची जननी’ ही ५२ पृष्‍ठांची पुस्‍तिका जागतिक राजकारणाच्‍या व्‍यासपिठावर मांडली आहे. शत्रूने लिहिलेला भारताचा इतिहास पिढ्यान् पिढ्या शिकवला गेला. त्‍यामुळे भारताच्‍या समाजरचनेतील गुणवैशिष्‍ट्ये भारतियांनाच ज्ञात होऊ शकली नाहीत.

५. भारतीय समाजव्‍यवस्‍था आणि लोकशाही पद्धत यांची वैशिष्‍ट्ये

भारतीय समाजव्‍यवस्‍था आणि लोकशाही पद्धत यांची वैशिष्‍ट्ये ठळकपणे यात मांडण्‍यात आली आहेत. ती अशी…

अ. वैदिक काळात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा सहभाग होता.

आ. राजाची निवड सर्वसामान्‍य जनता करत होती.

इ. भारतातील लोकशाहीला धर्माचा मोठा आधार होता. भारतीय लोकशाहीचा अर्थ ‘लोककल्‍याणाचा विचार करून राज्‍यकारभार करणे’, असा आहे. या ठिकाणी राजधर्म याचा अर्थ शासनकर्त्‍याची कर्तव्‍ये. प्रजेच्‍या हितातच राजाचे हित सामावले आहे. राजाला स्‍वहिताचा विचार करून राज्‍यकारभार करण्‍याची मुभा देण्‍यात आली नव्‍हती.

ई. समाजातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीला सामाजिक नियम पाळावेच लागत होते.

उ. राजा हा देशाचा मालक नाही, तर देशातील ‘जनतेचा सेवक’ म्‍हणून ओळखला जात होता.

ऊ. भारतीय समाजातील कोणतीही व्‍यक्‍ती अन्‍य दुसर्‍या कुणाहीपेक्षा श्रेष्‍ठ मानली जात नव्‍हती. याचा अर्थ देशातील प्रत्‍येक नागरिक हा सारखा होता. त्‍यांच्‍यात कोणत्‍याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्‍हता.

ए. भारतीय समाजव्‍यवस्‍था अनेकत्‍ववाद, सहिष्‍णुता, अनुकंपा आणि समानता या श्रेष्‍ठ तत्त्वांवर आधारित होती.

ऐ. जनकल्‍याणालाच प्राधान्‍य देणारे शासनकर्ते होते आणि भारतातील लोकशाही ही सेवाप्रधान होती.

ओ. भारतातील जनतेला सत्ताधीश निवडण्‍याचा आणि सत्ताधीश पालटण्‍याचा अधिकार होता.

औ. लोककल्‍याणाचे उद्दिष्‍ट समोर ठेवून व्‍यापारी संघ आणि प्रशासकीय कारभार याचा सुंदर मेळ, हेच भारतीय लोकशाहीचे वैशिष्‍ट्य होय.

अं. समानता हा भारतीय लोकशाहीचा आत्‍मा आहे. हेच भारतीय समाजाचे आध्‍यात्‍मिक आणि सामाजिक वैशिष्‍ट्य आहे.

एकच सत्‍य ज्ञानी लोक विविध प्रकारांनी सांगतात. अशी उपजत समज असलेला मानवी समाज बौद्धिक, वैचारिक आणि मानसिक दृष्‍ट्या अत्‍यंत परिपक्‍व होता. त्‍यामुळे सामाजिक आणि राजकीय जीवनात, संस्‍कृती, धार्मिक अन् शैक्षणिक क्षेत्रांतही सहभाग घेऊन मानवी समाजाचे अधिकाधिक हित करण्‍याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला जात होता.

६. देशाची सद्यःस्‍थिती आणि सुजाण नागरिकांचे कर्तव्‍य !

भारताची उज्‍ज्‍वल परंपरा टिकवणे, हे आपले कर्तव्‍य आहे. देशातील प्रत्‍येक व्‍यक्‍ती सुजाण, सुविद्य आणि सुसंस्‍कृत नागरिक व्‍हावी, याला प्राधान्‍य देणारी राज्‍यव्‍यवस्‍था अस्‍तित्‍वात होती. आजच्‍या काळात नागरिकांना सुविद्य, सुसंस्‍कृत आणि तसे करण्‍याचा प्रयत्न करणारे लोकनेते आढळत नाहीत. भारतातील जनता शतप्रतिशत साक्षर आहे, हे दाखवण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना अनुत्तीर्ण न करण्‍याचा निर्णय आपल्‍या लोकशाहीतील आजच्‍या धुरिणांनी घेतला आहे. ‘आपला मतदार जेवढा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असेल, तेवढी सत्ता स्‍वतःच्‍या हातात ठेवण्‍यास अनुकूल परिस्‍थिती आहे’, असा राष्‍ट्रघातक सिद्धांत आज प्रचलित झाला आहे. असत्‍य, भ्रष्‍टाचार, कटकारस्‍थान, अपप्रचार, समाजात दुफळी माजवणे, अशा समाज आणि राष्‍ट्र विघातक गोष्‍टी बळावल्‍या आहेत. तसेच अमर्याद वाढलेली सत्तालोलुपता नष्‍ट करण्‍याच्‍या शुद्ध हेतूने पंतप्रधान मोदी यांनी ही पुस्‍तिका लोकार्पण करून देशातील नागरिकांना प्रामाणिकपणे राष्‍ट्रीय कार्यात सहभाग घेण्‍यास प्रवृत्त करण्‍याचा प्रयत्न केला आहे. तसेच या पुस्‍तिकेद्वारे ‘लोकशाहीत सुविद्य, सुसंस्‍कृत, सत्‍य, न्‍याय-नीतीची चाड असणारे सुजाण नागरिकच सत्ताधीश असतात’, हे जनमानसावर ठसवण्‍याचा पंतप्रधानांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

७. देशातील लोकशाही राज्‍यपद्धतीची उज्‍ज्‍वल परंपरा अबाधित रहाण्‍यासाठी…

मंत्री, सरकारी अधिकारी हे सारेच राष्‍ट्राचे सेवक आहेत. राष्‍ट्राचे खरे सत्ताधीश त्‍या राष्‍ट्रातील नागरिक असतात. नागरिकांच्‍या हातात राजकीय सत्ता असते. या सर्वांवर नागरिकांचा वचक असला पाहिजे, तरच देशातील लोकशाही टिकून राहील. ‘मंत्री आणि सरकारी अधिकारी यांचे अधिकार ‘सेवक’ म्‍हणून देण्‍यात आले आहेत, याचा विसर त्‍यांनी पडू द्यायचा नाही. यासह देशातील लोकशाही राज्‍यपद्धतीची उज्‍ज्‍वल परंपरा अबाधित करावी’, असा प्रामाणिक आणि स्‍वच्‍छ हेतू मनात ठेवून या पुस्‍तिकेचे लोकार्पण केले आहे. जगाच्‍या राजकीय व्‍यासपिठावर ही पुस्‍तिका मांडून पंतप्रधानांनी आपल्‍या देशाचे श्रेष्‍ठत्‍व सिद्ध केले. तसेच ‘लोकशाही ही पाश्‍चात्त्य राजकीय विचारवंतांनी जगाला दिलेली देणगी नसून ती राज्‍यपद्धत अस्‍तित्‍वात आणणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. भारतभूमी हीच लोकशाहीची जननी आहे’, हे यातून पंतप्रधानांनी जगाला ठणकावून सांगितले आहे. त्‍याचा यथार्थ अभिमान भारताचे नागरिक म्‍हणून आपल्‍याला वाटला पाहिजे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (१७.९.२०२३)

‘भारत लोकशाहीची जननी’ या इंग्रजी पुस्‍तकाचे मुखपृष्‍ठ

संपादकीय भूमिका

सरकारने भारताचा खरा इतिहास समाजासमोर आणून तो पाठ्यपुस्‍तके आणि अन्‍य माध्‍यमांद्वारे सांगावा, हीच राष्‍ट्रप्रेमींची अपेक्षा !