पोलिसांच्या कारवाईचे स्थानिकांकडून स्वागत !
डिचोली, १० ऑक्टोबर (वार्ता.) : डिचोली येथे चालू असलेल्या अमली पदार्थ व्यवहाराच्या विरोधात स्थानिकांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. (नागरिकांनी तक्रार करेपर्यंत कारवाई करण्यासाठी थांबण्यापेक्षा पोलिसांनी आधीच कृती करणे अपेक्षित आहे ! – संपादक) अमली पदार्थ व्यवहाराला अनुसरून एकूण १० संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे डिचोलीवासियांकडून स्वागत करण्यात येत आहे.
पोलिसांच्या या कारवाईविषयी स्थानिक अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले, ‘‘अमली पदार्थ व्यवहारात गुंतलेल्यांना पोलिसांच्या कारवाईची भीती असायला पाहिजे, तसेच अशा प्रकारच्या कारवाईमध्ये राजकारणी, प्रशासकीय अधिकारी अथवा अन्य कुणीही हस्तक्षेप करू नये.’’ मयेचे भाजपचे आमदार प्रेमेंद्र शेट म्हणाले, ‘‘अमली पदार्थ गावांमध्ये कोण पुरवतो ? याचा शोध घेतला पाहिजे, तसेच अमली पदार्थ व्यवसायाविषयी सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक रहायला पाहिजे. अमली पदार्थ व्यवसायासंबंधी काही माहिती मिळाल्यास ती त्वरित पोलिसांना दिली पाहिजे.’’ ‘अशी कारवाई काही काळापुरती मर्यादित न रहाता ती कायमस्वरूपी व्हावी आणि अमली पदार्थांचे केवळ डिचोलीतूनच नव्हे, तर संपूर्ण गोव्यातून उच्चाटन करावे’, अशा प्रतिक्रिया जागरूक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.