ओडिशा येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात १ जानेवारी २०२४ पासून वस्त्रसंहित लागू होणार !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

पुरी (ओडिशा) – येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात १ जानेवारी २०२४ पासून वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे. वस्त्रसंहिता लागू झाल्यानंतर लोकांना हाफ पँट, फाटलेली जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस (अर्धी बाही उघडे असलेले) कपडे घालून जगन्नाथ मंदिरात जाता येणार नाही. मंदिराच्या धोरण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला; मात्र मंदिरात कोणते कपडे घालण्यास अनुमती द्यायची ?, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

जगन्नाथ मंदिर व्यवस्थापनाचे प्रमुख रंजन कुमार दास यांनी सांगितले की, काही लोक हाफ पँट आणि स्लीव्हलेस कपडे घालून येतात, जणू ते समुद्रकिनारी किंवा उद्यानात फिरायला आले आहेत. मंदिरात देव रहतो. हे मनोरंजनाचे ठिकाण नाही. यामुळे इतर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. मंदिराची प्रतिष्ठा आणि पावित्र्य राखणे, हे आपले दायित्व आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२४ पासून वस्त्रसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाईल. मंदिराच्या सिंहद्वारावर (मुख्य प्रवेशद्वारावर) तैनात सुरक्षादल आणि मंदिरातील सेवक त्यावर लक्ष ठेवतील.

संपादकीय भूमिका 

देशातील एकेका मंदिरात अशा प्रकारचे पालट आता करावे लागत आहेत. हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर देशातील सर्वच मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर नियम असतील !