तेल अवीव (इस्रायल) – जिहादी आतंकवादी संघटना हमासने केलेल्या आक्रमणाला इस्रायलकडून गेल्या ४ दिवसांपासून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इस्रायलच्या सैन्याकडून पॅलेस्टाईनचा भाग असणार्या गाझा पट्टीवर सातत्याने केलेल्या जाणार्या बाँबफेकीमुळे तेथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. इस्रायली सैन्याने हमासची ४७५ रॉकेट सिस्टिम आणि ७३ कमांड सेंटर उद्ध्वस्त केले आहेत. हमासच्या आतंकवाद्यांकडून वापरण्यात येणार्या २३ इमारतींवरही इस्रायलने आक्रमणे केली. हमासच्या २२ तळघरांमध्ये असणार्या तळानांही उद्ध्वस्त करण्यात आले आहे, तसेच इस्रायलच्या सीमेत घुसलेल्या हमासच्या १ सहस्र ५०० आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले आहेत. त्यांचे मृतदेह इतरत्र पडले आहेत, असा दावा इस्रायलमधील स्थानिक माध्यमांनी केला आहे.
पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गाझामध्ये इस्रायलच्या आक्रमणात ७०४ पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले आहेत. त्यांत १४३ मुले आणि १०५ महिला यांचा समावेश आहे, तसेच ४ सहस्रांहून अधिक लोक घायाळ झाले आहेत.