‘पू. सुमनमावशी (सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक, वय ७४ वर्षे) प्रत्येक रविवारी काही साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. पू. मावशी आढाव्यामध्ये साधकांना ‘प्रतिदिन किती वेळा कृतज्ञता व्यक्त होते ? बसून नामजप किती घंटे होतो ? स्वतःतील गंभीर स्वभावदोष कोणते ?’ इत्यादी प्रश्न विचारतात. १८.१२.२०२२ या दिवशी पू. मावशींनी ७ साधकांचा आढावा घेतला. त्या वेळी साधकांनी सांगितलेल्या चुका आणि त्यांवर पू. मावशींनी केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.
१. ‘मी साधकांना सेवा देतेे’, असे वाटणे’, हे अहंचे लक्षण आहे !
एक साधिका म्हणाली, ‘‘एक साधक मी भ्रमणभाष केल्यावर प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे ‘त्यांना सेवा देऊ नये’, असे मला वाटते, तसेच ‘त्यांना सेवा दिली नाही, तर त्यांची आध्यात्मिक प्रगती कशी होणार ?’, असाही विचार माझ्या मनात येतो.’’ त्यावर पू. मावशी म्हणाल्या, ‘‘मी त्यांना सेवा देते’, असे वाटणे’, हे अहंचे लक्षण आहे.’’
२. कर्तेपणा स्वतःकडे न घेता गुरुदेवांना प्रार्थना करून साधकांना सेवा द्यावी !
पू. मावशींनी साधिकेला सांगितले, ‘‘मला त्यांना सेवा द्यायची आहे’, असे वाटणे, म्हणजेे कर्तेपणा स्वतःकडे घेणे.’ त्यामुळे आपल्या साधनेची हानी होते. सेवा देणारी तू कोण ? आपल्याला ईश्वर सेवा देतो. ज्याची जशी क्षमता आहे, तशी सेवा त्याला द्यावी. साधकांना सेवा देतांना पुढील प्रार्थना करावी, ‘गुरुदेवा, सेवा देण्याची सेवा मला माझे स्वभावदोष घालवण्यासाठी मिळाली आहे. ही सेवा या साधकांच्या माध्यमातून तुम्हीच करून घ्या आणि ती करण्यासाठी तुम्हीच त्यांना बुद्धी अन् बळ द्या. त्यांची आध्यात्मिक प्रगतीही तुम्हीच करून घ्या.’
३. साधकांना भ्रमणभाष केल्यावर ते प्रतिसाद देत नसतील, तर आधी गुरुदेवांना ‘साधकाला भ्रमणभाषवर बोलण्यासाठी बुद्धी द्या’, अशी प्रार्थना करावी आणि नंतर त्यांना भ्रमणभाष करावा.’’
४. ‘आपल्या बोलण्यामुळे साधक दुखावला जाऊ नये’, यासाठी आपल्याला प्रत्येक साधकाप्रती प्रेमच वाटायला हवे आणि साधकांना त्यांच्या चुका प्रेमाने सांगणे आवश्यक !
एका साधिकेने ‘तिच्यामध्ये नम्रतेचा अभाव असल्याने तिच्या बोलण्यामुळे साधक दुखावतात’, याविषयीचा एक प्रसंग सांगितला. तिने ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूवर स्वयंसूचना दिल्या; पण ८ दिवसांनंतर तो अहंचा पैलू पुन्हा उफाळून येतो’, असे सांगितले. तेव्हा पू. मावशी म्हणाल्या, ‘‘प.पू. गुरुदेवांनी सहस्रो साधक घडवले आहेत. प.पू. गुरुदेव स्वतः तर रामनाथी आश्रमातच आहेत. त्यांनी आपली वाणी आणि लिखाण यांतून सर्व साधकांना आपलेसे केलेे आहे. प्रत्येक साधक हे गुरुदेवांचे रूप आहे. ‘स्वभावदोष का उफाळून येतो ?’, याचे चिंतन करावे. आपल्याला प्रत्येक साधकाविषयी प्रेमच वाटायला हवे. साधकांना त्यांच्या चुका प्रेमाने सांगता यायला हव्यात. त्यासाठी गुरुदेवांना पूर्णपणे शरण जाऊन ‘अशी चूक माझ्याकडून परत होऊ नये’, यासाठी प्रार्थना करा.’’
५. ‘माझी सेवा भावपूर्ण झाली’, असे न सांगता ‘गुरुदेवांनीच सेवा दिली, त्यांनीच ती करवून घेतली अन् आनंद दिला’, असा भाव निर्माण होणे आवश्यक आहे !
एका साधकाने सांगितले, ‘‘या ८ दिवसांत माझी सेवा चांगली झाल्याने मला पुष्कळ आनंद मिळाला. मला थकवा आला नाही. मी सर्व सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला.’’ तेव्हा पू. मावशी म्हणाल्या, ‘‘माझी सेवा भावपूर्ण झाली’, असे म्हणू नका. ‘माझी सेवा’, असे म्हणण्यापेक्षा ‘ईश्वराने मला सेवा दिली आणि त्यानेच ती करून घेतली’, असे म्हणावे. ईश्वराने आपल्याला स्वभावदोष आणि अहं घालवण्यासाठी अन् आपले प्रारब्ध जाळण्यासाठी सेवा दिली आहे. त्यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी. सेवा करतांना थकवा येत नाही; कारण परात्पर गुरु डॉक्टरच आपल्याकडून सेवा करवून घेत आहेत आणि त्यामुळे आपल्याला आनंद मिळत आहे. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।’, असा भाव आपल्यात निर्माण व्हायला हवा.’’
६. घराचे दार आपले रक्षण करते; म्हणून त्याला ईश्वर मानून प्रतिदिन प्रार्थना करा !
शेवटी पू. मावशींनी साधकांना विचारले, ‘‘सकाळी घराचे दार उघडल्यावर कुणाकडून प्रार्थना होते ?’’ ‘कुणीही प्रार्थना करत नाही’, हे समजल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘घराचे दार बंद असतेे; म्हणून रात्री आपले रक्षण होत असते. मग आपल्याकडून त्याला प्रार्थना का होत नाही ? आपण उठल्यावर गुरुदेवांना प्रार्थना करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो, तसेच घराचे दार रात्रभर आपले रक्षण करते; म्हणून प्रार्थना करायला हवी. दाराला ईश्वर मानून प्रतिदिन ते उघडतांना आणि बंद करतांना त्याला प्रार्थना करावी.’’
पू. मावशींचा हा सत्संग दोन ते अडीच घंटे असतो. ‘तो कधीच संपू नये’, असे आम्हाला वाटते. ‘पू. मावशींच्याच कृपेने वरील लिखाण करता आले’, याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. रमेश दत्ता फडते, फोंडा, गोवा. (१८.१२.२०२२)
|