इस्रायल-हमास युद्ध !

पॅलेस्‍टाईनमधील आतंकवादी संघटना ‘हमास’ने ७ ऑक्‍टोबरला इस्रायलची राजधानी तेल अविव, सडेरोट अश्‍कलोन आणि अन्‍य अशा ७ शहरांवर केवळ २० मिनिटांमध्‍ये ५ सहस्र रॉकेट डागले. इस्रायलमध्‍ये सण आणि सुटीच्‍या दिवशी झालेले हे आक्रमण ५० वर्षांतील सर्वांत मोठे आक्रमण आहे. इस्रायलमध्‍ये अद्यापपर्यंत ६०० नागरिकांचा मृत्‍यू, तर २ सहस्र जण घायाळ झाले आहेत. इस्रायलमधील मुले, वृद्ध नागरिक आणि तरुणी यांना बंदी बनवले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्‍यान्‍याहू यांनी ‘या आक्रमणाला एक युद्ध म्‍हणूनच प्रत्‍युत्तर देऊ’, असे सांगत ‘ऑपरेशन आर्यन स्‍वोर्ड’ची घोषणा केली आहे. यात महत्त्वाचे म्‍हणजे लेबेनॉननेही इस्रायलवर रॉकेट डागून आक्रमण केले आहे. संयुक्‍त राष्‍ट्रांत इस्रायलने ‘हे आमच्‍यावरील ९/११ प्रमाणे (११ सप्‍टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेतील ‘वर्ल्‍ड ट्रेड सेंटर’वर झालेल्‍या आक्रमणाप्रमाणे) झालेले आक्रमण आहे’, असे सांगितले आहे.

भारताकडून पहिल्‍यांदाच नरेंद्र मोदी यांनी तात्‍काळ ‘या आतंकवादी आक्रमणाच्‍या विरोधात आम्‍ही इस्रायलच्‍या पाठीशी आहोत’, असे सांगितले. भारताकडून इस्रायलच्‍या समर्थनार्थ पहिल्‍यांदाच अशी स्‍पष्‍ट भूमिका घेतली गेली आहे. आतापर्यंतच्‍या काँग्रेसी शासनकर्त्‍यांनी मात्र पॅलेस्‍टाईनवरील आक्रमणाविषयी दु:ख व्‍यक्‍त करण्‍याचा आणि त्‍याचे समर्थन करण्‍याचा भाग केला आहे. इस्रायलच्‍या ध्‍यानीमनीही त्‍यांच्‍यावर एवढे मोठे आतंकवादी आक्रमण होईल, असे त्‍यांना वाटले नसेल. मुख्‍य म्‍हणजे हमासचे आतंकवादी इस्रायली नागरिकांचे अपहरण करून त्‍यांना पळवून नेत असतांना तेथे आसपास कुणीही इस्रायली सैनिक दिसत नव्‍हते. इस्रायलचे नागरिक सण साजरा करतांना एकत्र आले असतांना ही आक्रमणे झाल्‍याने आर्थिकसह जीवित हानी अधिक झाली आहे. इस्रायलच्‍या ‘मोसाद’ या गुप्‍तचर यंत्रणेला एवढ्या मोठ्या कटाचा काहीच सुगावा कसा लागला नाही ? आतंकवादी देशाच्‍या आत घुसून घरोघरी नागरिकांना बंदी बनवत असतांना समजले कसे नाही ? असे प्रश्‍नही निर्माण होतात; कारण या वेळी आतंकवाद्यांनी इस्रायलची सीमा पार केली असल्‍यामुळे त्‍यांच्‍याशी लढणे तेवढे सोपे नाही.

मुसलमानांचे समर्थन

इराण, जॉर्डन हे मुसलमानबहुल देश, इस्‍तंबूल या मुसलमानबहुल प्रांताने इस्रायलवरील आक्रमणांचे समर्थन केले आहे, तसेच भारतातील काही धर्मांध मुसलमानांनीही या आक्रमणांचे समर्थन केले आहे. इस्रायलला अमेरिका, ब्रिटन, फ्रान्‍स, जर्मनी यांनी पाठिंबा दिला आहे. आतंकवादी महिला, मुले यांना बंदी बनवतांना, तसेच इस्रायली महिला सैनिकाची नग्‍न धिंड काढत असतांना ‘अल्लाहू अकबर’(‘अल्ला महान आहे’)च्‍या घोषणा देत होते. यातून एक भाग स्‍पष्‍ट आहे की, इस्रायलच्‍या कह्यातून गाझा पट्टीचा ताबा घेण्‍यासाठी आणि जेरुसलेममधील इस्रायलच्‍या कह्यात असलेल्‍या मशिदीच्‍या ठिकाणी झालेला वाद अशा दृष्‍टीने हमासने हे आक्रमण केले, असे म्‍हटले जात आहे. असे असले, तरी वास्‍तवात हे आक्रमण ‘जिहादी आतंकवादी संघटना’ म्‍हणून आणि अन्‍य धर्मियांना (ज्‍यूंना) संपवण्‍यासाठीच केलेले आहे. जेथे इस्‍लाम नाही ती भूमी, म्‍हणजे ‘दार उल हरब’ला ‘दार उल इस्‍लाम’मध्‍ये, म्‍हणजे इस्‍लामच्‍या भूमीत रूपांतर करण्‍यासाठी जिहाद्यांना ती धर्माज्ञा आहे. या दृष्‍टीने या आक्रमणाकडे पाहिले पाहिजे. त्‍यामुळे इस्रायलवरील या मोठ्या आक्रमणाला इस्‍लामी देशांचे त्‍वरित समर्थन मिळाले आहे.

गाझा पट्टीचा प्रश्‍न निकाली निघणार ?

इस्रायलची युद्धसज्‍जता ही वादातीत गोष्‍ट आहे. इस्रायलने तात्‍काळ त्‍यांच्‍यावरील आक्रमणांचा प्रतिशोध घेणे चालू केले आहे. त्‍यांनी पॅलेस्‍टाईन, गाझा पट्टी येथील हमासच्‍या आतंकवादी ठिकाणांवर बाँबचा मारा चालू केला आहे. इस्रायल ज्‍या त्‍वेषाने आक्रमण करत आहे, त्‍यावरून असे दिसते की, गाझा पट्टीचा अनेक वर्षांचा वाद तो या वेळी संपवूनच थांबणार आहे. त्‍यामुळे हमासचे जे वेस्‍ट बँकपासून किनारपट्टी भागात अखंड पॅलेस्‍टाईनचे स्‍वप्‍न आहे, ते इस्रायल कायमस्‍वरूपी धुळीस मिळवेल, असे दिसत आहे.

सौदीसमवेतच्‍या शस्‍त्रसंधीवर परिणाम ?

यामध्‍ये आणखी एक महत्त्वाचे म्‍हणजे इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्‍यात झालेल्‍या ‘शांती करारा’चे कारण सांगितले जाते. इराण आणि सौदी अरेबिया यांच्‍यात ३६चा आकडा आहे. इराणकडून हमासला रॉकेटचा पुरवठा करण्‍यात आल्‍याचे म्‍हटले जाते, तसेच कतारकडूनही काही प्रमाणात साहाय्‍य मिळते. इराणच्‍या अण्‍वस्‍त्र कार्यक्रमामुळे इस्रायलला भीती आहे; कारण ही अण्‍वस्‍त्रे कधीही तो हमासला आतंकवादी आक्रमणांसाठी देऊ शकतो. सौदी आणि इस्रायल यांच्‍यात फार काही आपुलकीचे संबंध नसले, तरी त्‍यांनी एकमेकांच्‍या विरोधात उभे न रहाण्‍याचे ठरवले आहे. हमासकडून झालेल्‍या या मोठ्या आतंकवादी आक्रमणाचे प्रत्‍युत्तर इस्रायल नक्‍की देणारच, याची निश्‍चिती आहे. यातून जगापुढे हमासच्‍या आतंकवादी आक्रमणात मारल्‍या गेलेल्‍या लोकांपेक्षा इस्रायलकडून मारल्‍या गेलेल्‍या लोकांच्‍या संख्‍येचे आकडे जगापुढे अधिक प्रमाणात येतील. मरणारे मुसलमानच असल्‍याने सौदीही अधिक काळ इस्रायलशी संधी करू शकेल का ? यातूनच सौदीशी असलेली शस्‍त्रसंधी संपुष्‍टात येऊ शकेल, अशी भीती व्‍यक्‍त केली जात आहे. ‘इस्रायल इस्‍लामविरोधी देश आहे’, ही इस्रायलची ओळख आहेच, तरी ती आणखी चांगल्‍या प्रकारे जगासमोर येऊ शकेल. इराणलाही सौदीला धडा शिकवायचा आहे, त्‍याच वेळी इस्रायललाही एकटे पाडायचे आहे. यामुळे इराण हमासकरवी ही आक्रमणे करत आहे, असे म्‍हटले जाते. आतंकवादी आक्रमणाचा प्रारंभ हमासने केला असला, तरी त्‍याचा अंत इस्रायल विजिगीषू वृत्तीने करणार हेही निश्‍चित !

हमासच्‍या आतंकवादी आक्रमणातून भारताने शिकून पाकच्‍या आतंकवादाचा त्‍याच्‍या भूमीत शिरून अंत करावा, ही अपेक्षा !