ठाणे येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे शास्‍त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांना साधकांसमोर स्‍वरांचे गायन सादर करतांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्‍या अनुभूती !

ठाणे येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे शास्‍त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (संगीत अलंकार) यांनी गायलेल्‍या एकेका स्‍वराचा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी ५.४.२०२३ ते ८.४.२०२३ या कालावधीत प्रयोग करण्‍यात आले. या स्‍वरांचे गायन आध्‍यात्मिक त्रास असलेल्‍या आणि नसलेल्‍या साधकांच्‍या समोर सादर करतांना श्री. चिटणीस यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

श्री. प्रदीप चिटणीस

१. आध्‍यात्मिक त्रास असलेल्‍या साधकांसमोर स्‍वरांचे गायन करत असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

१ अ. ‘स्‍वरांचे गायन करतांना मला वातावरणात दाब जाणवला. ‘माझी अधिक ऊर्जा व्‍यय होत आहे’, असे मला जाणवले.

१ आ. स्‍वर संथ गतीने न म्‍हणता जलद गतीने म्‍हणण्‍याची माझी इच्‍छा होत होती. स्‍वर जलद गतीने म्‍हणतांनाही मला अधिक जोर देऊन म्‍हणावेसे वाटत होते.

१ इ. असे स्‍वर म्‍हणत असतांना ‘आपण स्‍वरांद्वारे कुणाशीतरी भांडत आहोत किंवा युद्ध करत आहोत’, असे मला जाणवत होते.

१ ई. माझ्‍याकडून स्‍वर मारक स्‍वरूपात म्‍हटले जात होते. त्‍या वेळी माझे ध्‍यान मुळीच लागत नव्‍हते.

१ उ. मला माझा गळा आणि छाती यांवर किंचित तणाव जाणवत होता.

१ ऊ. ‘सा’ हा स्‍वर गात असतांना मला श्री गणेशाचे दर्शन होत होते. इतर स्‍वर गात असतांना मला मारक तत्त्वच जाणवत होते.

१ ए. मानस स्‍वर गात असतांना साधकांनी अनावश्‍यक बडबड करून बाधा आणणे आणि संगीतातील सर्वच गुरु, परात्‍पर गुरु डॉ. आठवले अन् प.पू. देवबाबा यांना प्रार्थना केल्‍यावर स्‍थिर रहाता येणे : जेव्‍हा ‘मौनातून (मानस) कोमल ‘नी’ (टीप) म्‍हणणे’, हा प्रयोग चालू झाला, तेव्‍हा साधक अनावश्‍यक बडबड करून पुष्‍कळच बाधा आणत होते. त्‍यामुळे आरंभी मला पुष्‍कळ हसू येत होते; पण मी लगेचच ‘कोमल ‘नी’ या स्‍वरावर संत गजानन महाराज यांचे ‘गण गण गणांत बोते’, तसेच ‘श्रीराम जय राम ।’, हे मंत्र मौनातून चालू केले आणि ‘या कठीण परिस्‍थितीत मला स्‍थिर ठेवा’, अशी त्‍यांच्‍या चरणी प्रार्थना केली. तेव्‍हा मला संत गजानन महाराज आणि शेगाव येथील श्रीरामाची मूर्ती यांचे दर्शन झाले. त्‍या वेळी माझे मन एकाग्र होऊ लागले. माझ्‍यावर साधकांच्‍या अनावश्‍यक बडबडीमुळे होणार्‍या उपद्रवाचा परिणाम नाहीसा होऊ लागला. या वेळी मला माझे संगीतातील सर्वच गुरु, परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. देवबाबा यांचीही तीव्रतेने आठवण झाली अन् मी निर्धास्‍त झालो. आजपर्यंतचा माझा संगीतातील हा सर्वांत कठीण प्रयोग होता; कारण साधक पुष्‍कळच बाधा आणत होते आणि ‘अशा परिस्‍थितीत स्‍थिर रहाणे’, हे केवळ सर्व गुरुजनांच्‍या आशीर्वादामुळे मला शक्‍य झाले.

टीप – कोमल स्‍वर : जे स्‍वर आपली मूळ जागा सोडून अल्‍प उंचीवर येतात; परंतु मागील स्‍वरापेक्षा अधिक उंचीवर असतात, त्‍यांना ‘कोमल स्‍वर’, असे म्‍हणतात. ‘रे’, ‘ग’, ‘ध’ आणि ‘नी’ हे कोमल स्‍वर आहेत.

(‘मानस स्‍वर म्‍हटल्‍याने आणि मानस स्‍वर हा अधिक निर्गुण असल्‍याने आध्‍यात्मिक त्रास असलेल्‍या साधकांवर आध्‍यात्मिक स्‍तरावर अधिक उपाय होत होते. हे सहन न झाल्‍याने ते साधक अनावश्‍यक बडबडीच्‍या माध्‍यमातून श्री. चिटणीस यांचे ध्‍यान भंग करण्‍याचा प्रयत्न करत होते.’ – संकलक)

२. आध्‍यात्मिक त्रास नसलेल्‍या साधकांसमोर स्‍वरांचे गायन करत असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

२ अ. आध्‍यात्मिक त्रास नसलेल्‍या साधकांसमोर गात असतांना मला पुष्‍कळ शांत आणि उत्‍साही वाटले.

२ आ. पहिल्‍या क्षणापासूनच माझे ध्‍यान लागले.

२ इ. स्‍वर संथ लयीत म्‍हणत असतांना मला छान वाटत होते.

२ ई. ‘स्‍वरांची लय जरी वाढवली, तरी त्‍यात कुठेही जोर देऊ नये’, असे मला वाटत होते; कारण गायनात सहजता जाणवत होती.

२ उ. स्‍वर अतिद्रुत (अतिजलद) लयीत गायले, तरी मला मुळीच थकवा वाटत नव्‍हता.

२ ऊ. ‘स्‍वर आणि लय यांची सुंदर गुंफण होऊन स्‍वर गळ्‍यातून निघत आहेत’, असे मला जाणवत होते.

२ ए. ‘प्रत्‍यक्ष ईश्‍वरच आपल्‍या गळ्‍यातून गात आहे’, अशी जाणीव होणे : ‘ही अनुभूती अद़्‍भुत आहे आणि प्रत्‍यक्ष ईश्‍वरच आपल्‍या गळ्‍यातून गात आहे’, अशी मला तीव्र जाणीव झाली; कारण केवळ एकाच स्‍वरावर एवढा वेळ इतके सुरेल आणि सहजतेने गायन मी आजतागायत केलेले नाही.

२ ऐ. ‘सा’ हा स्‍वर लावत असतांना बराच काळ श्री गणेशाचे दर्शन होऊन माझे ध्‍यान लागणे : ‘सा’ हा स्‍वर लावत असतांना मला श्री गणेशाचे दर्शन झाले. आध्‍यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर प्रयोग करतांनाही मला श्री गणेशाचे दर्शन झाले; पण ते अल्‍प काळ होते. या वेळी मात्र हे दर्शन अधिक स्‍पष्‍ट आणि बराच वेळ झाले. त्‍या वेळी माझे ध्‍यान लागले होते.

२ ओ. ‘पंचम (प)’ हा स्‍वर गात असतांना ध्‍यान लागणे, अवर्णनीय स्‍वर्गीय आनंदाची प्राप्‍ती होणे आणि समाधी अवस्‍था अनुभवता येणे : ‘पंचम (प)’ हा स्‍वर गात असतांना माझे पुष्‍कळच सुंदर ध्‍यान लागले होते. अतिद्रुत (जलद) लयीत गातांना ‘ज्‍या स्‍वरलहरी गळ्‍यातून गायल्‍या जात होत्‍या, त्‍या केवळ दैवी आहेत आणि त्‍या गातच रहाव्‍यात, थांबवूच नयेत’, असे मला वाटत होते; कारण त्‍यातून मला अवर्णनीय स्‍वर्गीय आनंदाची प्राप्‍ती होत होती. केवळ वेळेचे बंधन असल्‍याने मला नाईलाजाने थांबावे लागले. तेव्‍हा ‘हे परमेश्‍वरा, मला सतत याच समाधी अवस्‍थेत ठेव’, अशी मी त्‍या विधात्‍याकडे मनोमन प्रार्थना केली.

२ औ. ‘कोमल ‘नी’ या स्‍वराचे मानस गायन करतांना सूक्ष्मातून महड येथील वरदविनायकाचे मंदिर दिसणे आणि त्‍या मंदिराशी निगडित जुन्‍या आठवणी जागृत होणे : मी मनातल्‍या मनात (मानस) जेव्‍हा ‘कोमल ‘नी’ हा स्‍वर गायला, तेव्‍हा मला अप्रतिम दैवी अनुभूती आली. ‘कोमल नी’ या स्‍वराचे मानस गायन चालू केल्‍यावर मला माझ्‍या डोळ्‍यांसमोर एक जुने देऊळ दिसू लागले. तेव्‍हा ‘हे अष्‍टविनायकांतील महड येथील वरदविनायकाचे मंदिर आहे’, असे माझ्‍या लक्षात आले. मी माझ्‍या बालपणी, म्‍हणजे ४५ ते ५० वर्षांपूर्वी महडच्‍या गणपतीच्‍या दर्शनाला माझ्‍या वडिलांच्‍या समवेत त्‍यांच्‍या मनात येईल, तेव्‍हा जात असे. आम्‍ही अनेकदा रात्री त्‍या देवळात झोपायचो. देऊळ अगदी जुनाट अवस्‍थेत होते. त्‍या देवळाचा कानाकोपरा मला आणि माझ्‍या भावाला पाठ होता; कारण आम्‍ही तिथे पुष्‍कळदा लपंडाव खेळायचो. आमच्‍या मुंजी आणि माझ्‍या आईने केलेल्‍या सोळा सोमवारच्‍या व्रताचे उद्यापन महाडच्‍या मंदिरातच झाले होते. त्‍या ठिकाणच्‍या अशा अनेक आठवणी आहेत. हे मानस गायन करत असतांना मला त्‍या सर्व आठवणी येत होत्‍या. मला श्री गणेशाची मूर्ती अगदी स्‍पष्‍ट दिसत होती. तो गाभारा, त्‍या मोठ्या पितळी समया, देवळातले गुरुजी, हे सगळे मला अगदी आहेत, तसेच आठवत होते.

२ अं. थोड्या वेळाने मला ‘पुष्‍कळ हत्ती नृत्‍य करत ‘नी, नी’, असे आनंदाने ओरडत आहेत’, असे दृश्‍य दिसले आणि मला लगेच उमगले, ‘निषाद’ (‘नी’) या स्‍वराची निर्मिती हत्तीच्‍या चित्‍कारातून झाली आहे.’

– श्री. प्रदीप चिटणीस (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के), ठाणे (२.५.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक