पुणे – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत होत असलेल्या विविध शैक्षणिक सुधारणा आणि बदल यांसंदर्भात जागृती करण्यासाठी विद्यार्थी स्वयंसेवकांचे साहाय्य घेतले जाणार असून त्यासाठी देशभरातील २६२ उच्चशिक्षण संस्थांमधील ७२१ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. निवडलेल्या विद्यार्थी स्वयंसेवकांची सूची विद्यापीठ अनुदान आयोगाने घोषित केली आहे. उच्चशिक्षण संस्थांनी उत्तम संवाद कौशल्य, व्यवस्थापन, सर्जनशील असे गुण असलेल्या विद्यार्थ्यांची नावे सुचवली होती. ‘सारथी’ योजनेअंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या तरतुदी प्रभावीपणे कृतीत आणण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी केले जाणार आहे. पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांसह अभियांत्रिकी, विधी, औषधनिर्माणशास्त्र, फिजिओथेरपी, आरोग्यशास्त्र, व्यवस्थापन, नर्सिंग, समाजकार्य अशा विद्याशाखांच्या ४५ उच्चशिक्षण संस्थांतील प्रत्येकी २ ते ३ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.