छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीला कुलूप; ठेवीदार हवालदिल !

अधिक व्याजाच्या आमिषाने ठेवल्या लाखो रुपयांच्या ठेवी !

छत्रपती संभाजीनगर – आदर्श सहकारी पतसंस्थेनंतर आता ज्ञानोबा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीत शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली आहे. सिडको एन्-२ येथील सोसायटीला कुलूप लावून संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी पसार झाले आहेत. ठेवीदारांनी ३ ऑक्टोबर या दिवशी मुकुंदवाडी पोलीस ठाणे आणि जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली आहे.

ज्ञानोबा सोसायटी स्थापन होऊन केवळ ९ मास झाल्यामुळे व्यवहाराचे लेखापरीक्षण आणि निवडणुकही झालेली नाही. सोसायटीने १० टक्क्यांवर व्याजाचे प्रलोभन दिल्याने अनेकांना भुरळ पडली. नवीनच सोसायटी तत्कालीन सहकारमंत्र्यांच्या हस्ते स्थापन झाली आहे. त्यामुळे फसवणूक होईल अशी ग्राहकांना पुसटशी कल्पना नव्हती. एका ग्राहकाने १० टक्के लाभ कमावण्यासाठी ६ टक्के व्याजाने २ लाख रुपये काढून आणि स्वत: जवळील दीड लाख रुपये असे एकूण ३ लाख ५० सहस्र रुपये ज्ञानोबा सोसायटीत ठेवले.

ज्ञानोबा सोसायटीत बी.एस्.एफ्.मधील अधिकारी आणि सैनिक यांनी २ कोटी रुपये गुंतवले आहेत. ‘नवीन आणि जुन्या नागरी अन् अर्बन बँका अधिकच्या व्याजाचे प्रलोभन देतात. मार्केटिंगसाठी प्रभावीपणे प्रचार करतात. त्याला भुलून आर्थिक फसगत करून घेऊ नका’, असे आवाहन तज्ञांनी केले आहे. अनेकांनी धनादेश आणि रोख पैसे भरले असून त्यांना पासबुक दिलेले नाही. पैसे गुंतवल्याच्या केवळ ठेव पावत्या आहेत. पंकज चंदनशिव, शिवाजी चंदनशिव, इंदुमती चंदनशिव, प्रियंका चंदनशिव, सोमनाथ नरोडे (शिवाई बँकेतही याच्या नावाचा समावेश आहे), गणेश आंग्रे, धनंजय सावंत आणि शिवाजी रोडे यांचा संचालक मंडळात समावेश आहे.