१. १७.९.२०२२ या दिवशी पडलेलेले स्वप्न
१ अ. स्वप्नात ‘सनातनच्या देवद आश्रमात फिरत असतांना साधिका आणि तिच्या बहिणीच्या पायांजवळ मृत कावळा दिसणे’ आणि स्वप्नातच ते पाहून पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी ‘या माध्यमातून तुमचे पूर्वज मुक्त झाले’, असे सांगितल्याचे दृश्य दिसणे : ‘१७.९.२०२२ या दिवशी सकाळी मला स्वप्न पडले. त्यात मला पुढील दृश्य दिसले – ‘मी, माझी मोठी बहीण कु. शुभांगी आचार्य आणि पू. (सौ.) अश्विनीताई पवार (सनातन संस्थेच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार) देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाच्या बाहेरील आवारात बोलत बोलत फिरत होतो. नेमका त्याच वेळी एक कावळा मी आणि माझी बहीण कु. शुभांगी हिच्या, म्हणजे आम्हा दोघींच्या पायाजवळ मृत पडला होता. तो कावळा डोळे उघडे ठेवून मृत पडला होता. मृत कावळ्याकडे पाहून मला आनंद जाणवला. तो मृत कावळा बघितल्यावर पू. (सौ.) अश्विनीताई म्हणाल्या, ‘त्याच्या माध्यमातून तुमचे पूर्वज मुक्त झाले.’
१ आ. या स्वप्नानंतर सकाळी उठल्यावर झालेले त्रास : मी सकाळी उठल्यानंतर माझे डोके तीव्रतेने दुखत होते. माझे डोळे आणि कान यांच्यामधील भाग जड झाला होता. मला काही सुचत नव्हते, तरीही त्या दिवशी देवानेच माझ्याकडून श्री गुरुदेव दत्ताचा नामजप पूर्ण करून घेतला.
२. १९.९.२०२२ या दिवशी पडलेले स्वप्न
२ अ. स्वप्नात पूर्वजांना अन्नाचा नैवेद्य दाखवणे : ‘१९.९.२०२२ च्या पहाटे ४ ते ४.३० च्या कालावधीत मला स्वप्न पडले. त्यात पुढील दृश्य दिसले.
१. मी आणि माझी बहीण कु. शुभांगी आचार्य सनातनच्या देवद येथील आश्रमात आहोत. आम्ही महाप्रसादासाठी भोजनकक्षात आलो.
२. त्या वेळी देवद आश्रमातील संत पू. उमेशअण्णा (सनातन संस्थेचे १७ वे (व्यष्टी) संत पू. उमेश शेणै) आणि सद़्गुरु राजेंद्रदादा (सनातन संस्थेचे सद़्गुरु राजेंद्र शिंदे) आम्हाला म्हणाले, ‘ताई, आपण आज तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध करणार आहोत.’
३. आश्रमात एके ठिकाणी आमच्या पूर्वजांचे छायाचित्र ठेवले होते. सद़्गुरु राजेंद्रदादा आणि पू. उमेशअण्णा आमच्याकडून श्राद्ध करून घेत होते.
४. पू. उमेशअण्णा आणि सद़्गुरु राजेंद्रदादा आम्हा दोघींना पितरांसाठी जेवणाचे ताट भरून ठेवण्यासाठी सांगत होते.
५. पितरांसाठी भरलेल्या नैवेद्याच्या ताटामध्ये पुरणपोळी, भात, आमटी, लाडू अशी पक्वान्ने होती.
६. त्यानंतर पू. उमेशअण्णा आणि सद़्गुरु राजेंद्रदादा आम्हाला म्हणाले, ‘तुमचे पूर्वज जेवले. आता तुम्ही जेवू शकता.’
२ आ. स्वप्नाविषयी देवद आश्रमात सेवा करण्यार्या बहिणीला सांगितल्यावर तिने ‘पितृपंधरवड्यात आश्रमातील साधकांच्या पितरांसाठी काकबली ठेवला जातो’, असे सांगणे : मी देवद आश्रमात सेवा करणारी माझी बहीण कु. शुभांगी हिला दूरभाष करून मला पडलेले हे स्वप्न सांगितले. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘पितृपंधरवड्यात आश्रमातील साधकांच्या पितरांसाठी अन्नाचे ताट काकबली म्हणून ठेवले जाते.’’ या आधी मला याची काहीच कल्पना नव्हती.
३. कृतज्ञता
३ अ. ‘श्री गुरुदेव दत्ताचा जप करण्यास सांगितल्याने सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या चरणी कृतज्ञ असणे : मी रामनाथी आश्रमातील सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांच्या चरणी कृतज्ञ आहे. त्यांनी सांगितल्यानुसार पितृपंधरवड्यात दत्ताचा जप करण्याचा त्यांचा संकल्प आणि देवाने माझ्याकडून करून घेतलेला दत्ताचा नामजप यांमुळे मला या अनुभूती आल्या.
३ आ. तीव्र शारीरिक त्रासातही सतत जप करून घेतल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ असणे : मला तीव्र शारीरिक त्रास होत असूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्याकडून पितृपंधरवड्यात श्री गुरुदेव दत्ताचा जप सातत्याने करून घेतला. यासाठी मी गुरुदेवांच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. शुभदा आचार्य, सेलू, नांदेड. (१९.९.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |