आत्म्याशी संवाद साधतांना मृत्यूसमयीच्या वेदना मला होतात ! – अभिनेत्री स्मिता जयकर

आत्म्यांशी संवाद साधतांनाचे अनुभव अभिनेत्री स्मिता जयकर यांनी केले उघड !

अभिनेत्री स्मिता जयकर

मुंबई – आत्म्यांशी संवाद साधतांना त्या व्यक्तीला मृत्यूच्या वेळी झालेल्या वेदना मला होतात, अशी माहिती मराठी अभिनेत्री स्मिता जयकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी दिली. या मुलाखतीमध्ये याविषयी त्यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केले.

याविषयी स्मिता जयकर म्हणाल्या, ‘‘मला आत्मे दिसतात आणि त्यांच्या वेदनाही  जाणवतात. एका कुटुंबाला एका आत्म्याशी संवाद साधायचा होता. ज्या व्यक्तीच्या आत्म्याशी मला संपर्क करायचा होता, त्या व्यक्तीविषयी मला काही कल्पना नव्हती. त्या कुटुंबातील सदस्य माझ्याकडे आले, तेव्हा मला गुदमरल्यासारखे वाटत होते. सगळीकडे धुराचा वास येत होता. मला श्‍वास घ्यायला त्रास होत होता. त्यातच मी खोकत होते. त्या वेळी ज्या आत्म्याशी मी संपर्क साधत होते, त्या वेळी ‘त्या व्यक्तीचा मृत्यू धुरात गुदमरून किंवा आगीमुळे झाला होता’, असे मला कळले. त्या कुटुंबियांनी सांगितले, ‘मृत व्यक्ती ज्या ठिकाणी काम करत होती, त्या कारखान्याला आग लागली होती. त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अन्य एका प्रसंगात एक महिला तिच्या मृत पतीच्या आत्म्याशी संपर्क साधण्यासाठी आली असतांना माझे सांधे दुखायला लागले. नंतर त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचा पती अभियंता होता. इमारतीवरून पडून त्याचा मृत्यू झाला होता.’’

संपादकीय भूमिका 

सूक्ष्मजगताचे काडीचेही ज्ञान नसलेले अंनिसवाले याला अंधश्रद्धा म्हणतात. खरे जिज्ञासू मात्र याचे संशोधन करतात. त्यामुळे ‘खरे अंधश्रद्ध कोण ?’, हे जनतेनेच ओळखावे !