बोंडारवाडी प्रकल्‍पासह कृष्‍णा प्रकल्‍पाच्‍या सुधारित जलनियोजनास शासकीय मान्‍यता !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ४ ऑक्‍टोबर (वार्ता.) – जावळी तालुक्‍यातील ५४ गावांचा शेती आणि पिण्‍याचे पाणी यांचा प्रश्‍न बोंडारवाडी धरण प्रकल्‍पामुळे मार्गी लागला आहे. १ टी.एम्.सी.चे बोंडारवाडी धरण बांधण्‍यासाठी कृष्‍णा प्रकल्‍पाच्‍या सुधारित जलनियोजनास जलसंपदा विभागाने मान्‍यता दिली आहे.

बोंडारवाडी धरण प्रकल्‍पाची जागा निश्‍चित करणे, प्राथमिक सर्वेक्षण करणे, भूस्‍तर वर्गीकरणाची विंधन विवरे घेणे ही कामे प्राधान्‍याने हाती घेण्‍यात येणार आहेत. या कामांसाठी कृष्‍णा खोरे विकास महामंडळाच्‍या सर्वेक्षण प्रावधानांमधून निधी उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे. मेढा येथील पश्‍चिम भाग आणि केळघर भागातील ५४ गावांना सिंचनासाठी अन् पिण्‍यासाठी १ टी.एम्.सी. एवढे मुबलक पाणी उपलब्‍ध होणार आहे.