|
गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये बालविवाहाच्या विरोधातील मोहिमेच्या दुसर्या टप्प्यात १ सहस्र ३९ लोकांना अटक करण्यात आली आहे. ही मोहीम ३ ऑक्टोबर या दिवशी राज्यभरात राबवण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये १४ मौलवींचा समावेशही आहे. त्यांनी अनेक बालविवाह करवले असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ३ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या कारवाई तब्बल ७४१ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होऊ शकते, असे म्हटले आहे.
More than 1,000 people were arrested in the second phase of a state-wide crackdown against child marriage in #Assam, Chief Minister #HimantaBiswaSarma said.https://t.co/dbZRTdDKcJ
— The Hindu (@the_hindu) October 3, 2023
आता राबवण्यात आलेल्या मोहिमेच्या अंतर्गत ३५ जिल्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली. यामध्ये कामरूप (मेट्रो) च्या अंतर्गत येणार्या गौहत्ती शहरात सर्वाधिक अटक झाल्या आहेत. यानंतर धुबरीमध्ये १९२ अटक झाल्या असून, बारपेटा १४२, हैलाकांडी ५९, कामरूप ५० आणि करीमगंजमध्ये ४७ लोकांना अटक करण्यात आली. बारपेटा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमिताव सिन्हा म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व १४२ लोकांना रात्रीच अटक करण्यात आली.
या वर्षीच्या फेब्रुवारी मासामध्येही सरकारने राज्यात बालविवाहाच्या विरोधात कठोर दंडात्मक कारवाई केली होती. यामध्ये ३ सहस्र १४१ जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये ६२.२४ टक्के मुसलमान होते, तर उर्वरित लोक हे हिंदू किंवा इतर समुदायांचे असल्याची माहिती सरकारने दिली होती.
सामाजिक दुष्कृत्यांविषयी तडजोड नाही ! – मुख्यमंत्री सरमा
मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी कोणत्याही सामाजिक दुष्कृत्याविषयी तडजोड केली जाणार नसल्याचे घोषित केल्यानंतर आसाम सरकारने बालविवाहाविरुद्ध कारवाई चालू केली. ‘प्रजनन आणि बाल आरोग्य (‘आर्.सी.एच्.’च्या) संकेतस्थळानुसार गेल्या वर्षी आसाममधील ६ लाख २० सहस्रांहून अधिक गर्भवती महिलांपैकी अनुमाने १७ टक्के किशोरवयीन मुली होत्या.
संपादकीय भूमिकाबालविवाहासारख्या सामाजिक अपप्रकारांच्या विरोधात आसाम शासनाप्रमाणेच अन्य सरकारांनीही प्रयत्न केले पाहिजेत ! |