मुंबई – ‘एका वेबपोर्टल’ला चीनमधून पैसा पुरवला जात असल्याचे नुकतेच उघड झाले. यावरून ‘त्यांचा संबंध कुणाशी आहे ?’ असा प्रश्न निर्माण होत आहेत. आपली लढाई ‘इंडिया आघाडी’शी नाही. त्यांच्यामागे देशात अराजक माजवणार्या शक्ती कार्यरत आहेत, त्यांच्याशी आपली लढाई आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकार्यांच्या मुंबईतील बैठकीत केली. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अधिवक्ता आशिष शेलार आदी उपस्थित होते.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘इंडिया आघाडीमध्ये कुणीही राष्ट्रीय नेता नाही. या आघाडीमध्ये एकजूट नाही. वेगवेगळी शकले एकत्र आली आहेत. इंडिया आघाडीचा एकमेव अजेंडा पंतप्रधान मोदी यांना विरोध हाच आहे. देशाच्या हिताचा कोणताही कार्यक्रम यांच्याकडे नाही. नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले, तर घरगुती पक्षाची दुकाने बंद होतील; म्हणून हे सर्व एकत्र आले आहेत. वर्ष २०२४ ची निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान झाल्यावर देशाच्या विकासाला अधिक गती मिळेल. त्यामुळे आपल्यासाठी ही ऐतिहासिक निवडणूक आहे. या निवडणुकीचे आपण सैनिक आहोत, हे आपले भाग्य आहे.’’