सातारा, २ ऑक्टोबर (वार्ता.) – भीमनगर दरे येथील कोयना प्रकल्पग्रस्त गावाची शेत भूमी रेल्वे प्रशासनाने बळजोरीने विकासकामांसाठी स्वतःच्या कह्यात घेतली आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी भूमीहीन झाले आहेत. ही भूमी तात्काळ परत करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी शेतकर्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे. या वेळी जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पग्रस्तांच्या सूचीमध्ये अनुमाने ३५ हून अधिक शेतकरी आहेत. यांच्या भूमी रेल्वे प्रशासनाने कह्यात घेतल्या आहेत. रेल्वे अधिकारी स.स. टेंभेकर आणि प्रांताधिकारी कार्यालय, कोरेगाव यांच्या संगनमताने हे सर्व प्रकार घडत आहेत. या प्रकरणांमध्ये शेतकर्यांची कोणतीही नोंद घेतली जात नाही. त्यामुळे या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा. अन्यथा पुढे तीव्र आंदोलन केले जाईल.