घटस्फोटांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केलेले लेखरूपी विचारमंथन !
गेल्या काही वर्षांमध्ये पती-पत्नीमध्ये वैवाहिक संबंधांत अडचणी निर्माण होणे, किरकोळ भांडणे होणे आणि मुलीने माहेरी निघून जाणे, अशा अनेक घटना घडत आहेत. प्रतिवर्षी साधारणतः शेकडोंच्या आसपास महाराष्ट्रात घटस्फोट होतात. प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह, विवाहबाह्य संबंध, पळून जाऊन लग्न करणे, मुलीच्या संसारात माहेरकडून अधिक हस्तक्षेप होणे, मुला-मुलींची चंगळवादी वृत्ती याला कारणीभूत आहे. घटस्फोटांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लेखाच्या माध्यमातून विचारमंथन केले आहे.
१. भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे मुलींच्या संसारात आईचा हस्तक्षेप होणे
दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर आणि अधिवक्त्या शुभांगी वक्ते यांचेही म्हणणे हेच आहे की, ज्या वेळी मुलीच्या आईचा तिच्या संसारातील हस्तक्षेप थांबेल, त्याच वेळी घटस्फोटांचे प्रमाण न्यून होईल. सध्याची परिस्थिती बघितली, तर भ्रमणभाष हे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच हा हस्तक्षेप वाढला आहे. पूर्वी मुली वर्षातून १-२ वेळाच माहेरी जात; पण आता या कालावधीत पुष्कळ वाढ झालेली आहे. त्यामुळे सासरी त्यांचे मन रमत नाही. दिवसभर भ्रमणभाषवर बोलणे चालू असते. सासरकडील घडामोडींचे माहेरी ‘रिपोर्टिंग’ (आढावा देणे) केले जाते. यामुळे सासरच्यांशी विशेष संवाद होत नाही. त्यांना तो करावासा वाटत नाही. भाजी करण्यापूर्वीही मुलगी आईला संपर्क करते; पण सासूबाईंना विचारत नाही. यात तिला न्यूनता वाटते.
२. सासरच्यांना पालटण्याऐवजी स्वतःत पालट करावा !
सासरच्या चालीरिती जाणून घेणे, त्यांच्याशी जुळवून घेणे महत्त्वाचे असते. सासरच्यांना पालटण्याऐवजी मुलीने स्वतःत पालट करावा, म्हणजे वाद टळतील. काही वेळा किरकोळ कारणांवरून वाद होतात. मग ‘मला कसा त्रास दिला जातो’, अशा स्वरूपाचा कांगावा केला जातो.
३. मुलींना सासू-सासर्यांचा आदर नसणे
लग्नाआधी आई मुलीला स्वयंपाक शिकून घेण्याविषयी बर्याचदा जाणीव करून देते; पण मुलीला आईचा राग येत नाही. सासरी थोडेसे जरी बोलले, तरी राग येतो. सासूशी तिरप्या पद्धतीने बोलणे चालू होते. नवर्याला सांगणे होते, ‘‘त्या मला सारख्या बोलतात. त्यांना सांगा, ‘मला असे बोललेले चालणार नाही.’’ बोलण्यात ‘आई’, ‘बाबा’ हे शब्द शक्यतो येतच नाही; पण ‘यांना’, ‘त्यांना’ अशा स्वरूपाचे बोलणे असते.
४. विवाहापूर्वी मुलींकडूनच मुलांना अधिक प्रश्न विचारले जाणे
एकत्र कुटुंबपद्धत आता हळूहळू नष्ट होत आहे; पण जेथे अस्तित्वात आहे, तेथेही विशेष चांगली परिस्थिती नाही. काही मुली लग्नाआधीच मुलांना अनेक प्रश्न विचारून त्यांची परीक्षा घेतात आणि ‘आपले विचार अन् वागणे यांच्याशी तो कितपत मिळताजुळता आहे ?’, याची पडताळणी करतात. मुलांपेक्षा मुलींचेच प्रश्न अधिक असतात. ‘घरात कोण कोण आहे ? आई-वडील आहेत का ? ते किती दिवस आपल्याकडे रहाणार कि त्यांना गावाला नेणार ? मांसाहार करणार कि ड्रिंक्स घेणार ? अमुक ड्रेस घातला, तर चालेल का ? सुट्टीचा दिवस आपल्यासाठी ठेवणार का ?’, असे अनेक प्रश्न असतात.
५. मुलीही व्यसनाधीन होणे
सध्या मुलीही मद्यपान करतात. मित्रांसमवेत धूम्रपान करतांना अनेक मुलींना मी स्वतः पाहिले आहे. स्वातंत्र्यांच्या नावाखाली हा स्वैराचार नव्हे का ? ‘मुलगा व्यसनी नको’, अशी अपेक्षा मुलींचे आई-वडील करतात; पण व्यसनी मुलींचे आई-वडील काय अपेक्षा करतील ? हातात मिळणारा पैसा आणि चंगळवादी वृत्ती अन् पालकाचे नियंत्रण नसणे याला कारणीभूत आहे.
६. सासरी सर्वांसमवेत एकत्रित न रहाणे
आमच्या मुलीला एकत्र रहायला आवडते’, असे सांगितले जाते; परंतु लग्नानंतर नवर्याला सांगितले जाते, ‘त्यांना’ गावाला पोचवा.’ जर अटीतटीवर आलेच, तर ‘ते इथे रहातील, नाही तर मी राहीन’, असे सांगितले जाते. ‘आम्हाला मुक्तपणे रहाता येत नाही’, असे कारण सांगितले जाते.
७. सध्याच्या काळातील संसार उद़्ध्वस्त झाल्याची दिसून येणारी उदाहरणे !
अ. मुलाला चांगल्या वेतनाची नोकरी आहे. आई-वडील सुशिक्षित ! मुंबईची मुलगी होती; परंतु एकमेकांशी न पटल्याने वर्षाच्या आतच त्यांचा घटस्फोट झाला.
आ. मुलाला चांगली नोकरी होती. स्वतःचे घर, चारचाकी गाडी, २ मुले, पत्नीही नोकरी करणारी होती. ७-८ वर्षांचा संसार; पण अचानक मुलीची आई तिला घेऊन गेली. किरकोळ कारणावरून म्हणे पती-पत्नीत वाद होऊन ते विकोपाला गेले.
इ. एका कुटुंबात मुलाची नोकरी चांगली. घरची श्रीमंती. लग्नानंतर मुलीच्या विक्षिप्त वागण्यामुळे दीड वर्षाच्या काळातच घटस्फोट झाला. मुलीने कारण सांगितले, ‘‘माझे दुसर्या मुलासमवेत प्रेम होते; परंतु बळजोरीने माझ्या मनाविरुद्ध हे लग्न केले.’’
ई. मुलगा डॉक्टर. घरात आई-वडील; पण सुनेचे कुणाशीच पटत नाही. घरी पाहुणे आले, तरी ती सासू-सासर्यांशी बोलत नसे. घरी आलेल्यांना नमस्कार करायची; पण सासू-सासर्यांना करत नव्हती. ती पाहुण्यांसमोर त्यांचा मुद्दामहून अपमान करायची.
उ. एका कुटुंबात सासू, मुलगा आणि सून. लग्नानंतर कुरबुरी चालू होतात. मजल इथपर्यंत जाते की, मुलाला सांगितले जाते, ‘यांना’ वेगळे करा. या असेपर्यंत संसार सुखाचा होणार नाही. सासूशी बोलणार नाही, तिने केलेले खाणार नाही.’
ऊ. काही ठिकाणी मुलगा, सून लग्नानंतर परदेशात जातात. तेथेच स्थायिक होतात. वादाचा प्रश्नच नाही. तुम्ही रहा तिथे आणि आम्ही रहातो इथे ! काही कुटुंबात धूसफूस असते; पण ती बाहेर जाऊ नये; म्हणून प्रयत्न चालू असतो. अर्थात् भिंतीला कान असतातच. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या प्रकारची तर्हेवाईक वागणूक बघायला मिळते.
ए. बर्याचदा किरकोळ वादाला मोठे स्वरूप आणले जाते. मुलगी माहेरी निघून जाते. अर्थात् माहेरच्या सल्ल्याने. ‘तू इकडे येऊन जा. मग बघू’, असे सांगितले जाते. वर्ष-दोन वर्षे गेल्यावर मुलगी नवर्याला सांगते, ‘तुम्ही असे केले, तर मी येईन’, ‘तुम्ही तसे केले, तर येईन’, अशा अटीशर्ती ! ‘तुम्ही मला घ्यायला या’, असेही सांगितले जाते.
८. मुलामुलींमध्ये होणारे वाद आणि कायद्याची बाजू !
मुलाकडूनही मुलीला त्रास दिला जातो; पण एकंदरीत प्रमाण तुलनेत अल्प आहे. मुलींना वेतन पुष्कळ असते. एखाद्या वेळेस मुलीला मुलापेक्षा अधिक वेतन मिळत असल्याने तिचा अहंकार जागृत होतो किंवा मुलाला डिवचले जाते. काही वेळेला मुलेही व्यसनाधीन असतात. मुलगा मुलीला पैशासाठी त्रास देतो. काही ठिकाणी तर मुलीला घराबाहेर काढले जाते आणि पैशांची मागणी केली जाते. कधी कधी मुलाच्या वडिलांकडूनच प्रोत्साहन मिळत असते. अशा घटनांमध्ये नाईलाजाने मुलीच्या वडिलांना कायद्याकडे धाव घ्यावी लागते. मुलीच्या बाजूने कायद्याचे संरक्षण असल्याने बर्याच वेळा त्याचा दुरुपयोगच अधिक केला जातो, हेही योग्य नाही. मुलाच्या बाजूला कायद्याचा धाक असतो. त्यामुळे मुलाकडून त्रास देण्याच्या घटना घडतात; परंतु प्रमाण अल्प असते. मुलाला शिक्षाही होते; परंतु मुलीकडून जर मानसिक त्रास झाला, तर मुलगा काहीच करू शकत नाही.
९. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या विचारांचा आदर करणे आवश्यक !
नोकरी किंवा व्यवसाय यांमुळे विवाह विलंबाने होतात. वय वाढत जाते. आई-वडिलांनी योग्य वेळेतच याकडे लक्ष द्यायला हवे. लग्न म्हणजे केवळ दोन जिवांचे मीलन नाही, तर दोन वेगवेगळ्या कुटुंबांचे मीलन असते. त्यांच्यात नाते प्रस्थापित होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या विचारांचा आदर करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
१०. आईने सासरी जाणार्या मुलीला कसे समजवावे ?
पूर्वीच्या काळी आई मुलीला सासरी पाठवतांना सांगायची, ‘मुली, सासर हेच तुझे यापुढे स्वतःचे घर आहे. तू आमच्याकडे येशील, तरी पाहुणी म्हणूनच !’ आता वेळप्रसंगी मुलगीच आईला सांगते, ‘मी तुला जड झाले आहे का ?’ आईला सांगायचे असते, ‘तू आता सासरच्या माणसांत जाऊन तिथे तुझे मन रमव. त्यांच्या आनंदात तुझा आनंद मानायला शिक, तरच तू तुझ्या संसारात यशस्वी होशील. सासू-सासरे असतील, तर त्यांनाच स्वतःचे आई-वडील समज. त्यांचा योग्य तो आदर कर. मान ठेव. तू त्यांना प्रेम दिले, तर तुलाही त्यांच्याकडून भरभरून प्रेम मिळेल.’ आपल्या सुनेचे सासू-सासरे चारचौघात भरभरून कौतुक करतात. कुटुंबात सुसंवाद महत्त्वाचा आहे. त्यामुळेच एकोपा आणि प्रेम टिकून रहाते. या गोष्टी सध्या समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. मुलींनी हे सर्व लक्षात ठेवून त्यानुसार कृती केल्यास होणारे घटस्फोट थांबतील.
– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जळगाव.