‘आधुनिक भारत-अमेरिका संबंधां’चे शिल्पकार आहेत डॉ. एस्. जयशंकर !

अमेरिकेने केली भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची प्रशंसा !

भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकी प्रशासकीय अधिकार्‍यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची प्रशंसा केली आहे. बायडेन प्रशासनाच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी त्यांना ‘आधुनिक अमेरिका-भारत संबंधांचे शिल्पकार’ म्हणून संबोधले आहे. उभय देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी विशेष भूमिका निभावल्याचे या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

डॉ. जयशंकर यांचा तब्बल ९ दिवसांचा अमेरिकी दौरा १ ऑक्टोबर या दिवशी आटोपला. शेवटच्या दिवशी अमेरिकेचे भारतातील राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी डॉ. जयशंकर यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी बायडेन प्रशासनातील उच्चाधिकारी सर्जन जनरल विवेक मूर्ती, उप सचिव रिचर्ड वर्मा, राष्ट्रपती बायडेन यांचे घरगुती धोरणांच्या सल्लागार नीरा टंडन, राष्ट्रीय औषधी नियंत्रण धोरणाचे निदेशक डॉ. राहुल गुप्ता आणि राष्ट्रीय विज्ञान फाऊंडेशनचे निदेशक डॉ. सेथुरमन पंचनाथन् सहभागी झाले होते. या वेळी या अधिकार्‍यांनी जयशंकर यांना ‘आधुनिक अमेरिका-भारत संबंधांचे शिल्पकार’ म्हणून संबोधले.

डॉ. जयशंकर यांनी त्यांच्या दौर्‍याची माहिती देणारा एक व्हिडिओ ‘एक्स’वरून प्रसारित केला आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकी दौर्‍यातील मुख्य अंशांचा समावेश केला आहे. या व्हिडिओला त्यांनी ‘भारत आणि अमेरिका : क्षितिजाचा विस्तार’ असे नाव दिले आहे.

विविध अमेरिकी अधिकार्‍यांची घेतली भेट !

या व्हिडिओमध्ये जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन, संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन, वाणिज्य सचिव जीना रायमोंडो आणि व्यापार प्रतिनिधी कैथरीन ताई यांच्यासह अन्य अधिकार्‍यांसोबत केलेल्या चर्चांच्या क्षणांचा समावेश केला आहे. जयशंकर यांनी ऑस्टिन यांच्यासमवेत ‘भारत-अमेरिका द्विपक्षीय संरक्षण सहकार्य’ आणि ‘वैश्‍विक संरक्षणातील आव्हाने’ यांवर चर्चा केली. या दौर्‍यात जयशंकर यांनी विविध व्यासपिठांवर कॅनडाच्या संदर्भात ‘कॅनडा त्याच्या भूमीचा वापर खलिस्तानी आतंकवादी यांना करू देत आहे’, असेे स्पष्ट कथन केले.

संपादकीय भूमिका 

गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका जवळ आले असले, तरी अमेरिकेची मूळ मनोवृत्ती भारत ओळखून आहे, हे विसरता कामा नये !