गोव्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

नदी-नाले तुडुंब भरले, पडझडही चालू , हवामान विभागाकडून अतीवृष्टीची चेतावणी

पणजी, ३० सप्टेंबर (वार्ता.) : देशभरात परतीच्या पावसाला प्रारंभ झाला आहे. गोव्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. कुशावती, म्हादई आदी नद्या दुथडी भरून वहात आहेत.

वास्को येथे दरड कोसळली !

२९ सप्टेंबरच्या रात्रीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे ३० सप्टेंबर या दिवशी पहाटे सुमारे ५.३० वाजता रुमडावाडा, जेटी, वास्को येथे डोंगराळ भागात एका मशिदीजवळ दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे एका घराचे शौचालय भूईसपाट होतांना दुसर्‍या घरावर कोसळले.

या घटनेविषयी माहिती मिळाल्यावर स्थानिक नगरसेवक दामोदर नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील घरांमधील लोकांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.

केपे-मडगाव मार्गावरील पारोडा पूल पाण्याखाली !

करासवाडा, म्हापसा येथेही एका ठिकाणी दरड कोसळली. केपे येथील कुशावती नदीला पूर आल्याने केपे-मडगाव मार्गावरील पारोडा पूल पाण्याखाली गेला आहे.

यामुळे या मार्गावरील वाहतूक चांदोरमार्गे वळवण्यात आली आहे. कालवी, मये येथील रेल्वे क्रॉसिंगचा रस्ता पाण्याखाली गेला आहे.

आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ ३० सप्टेंबर या दिवशी एक झाड कोसळले, तसेच मिरामार-दोनापावला रस्त्यावर एक झाड कोसळले.

‘अंजुना’ धरणाचे चारही दरवाजे उघडले

डिचोली – केरी येथील अंजुना धरण परिसरात दिवसभर १०७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पातळी ९३.१८ मीटरपर्यंत तुडुंब भरली आहे. त्यामुळे धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

आतापर्यंत धरण परिसरात ४ सहस्र १०८.४ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. आमठाणे धरणही तुडुंब भरले आहे. डिचोली तालुक्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस चालू असून अनेक ठिकाणी सखल भाग जलमय झाला आहे.

हवामान विभागाकडून पुढील ३ दिवस अतीवृष्टीची चेतावणी

गोव्याच्या किनारपट्टीपासून १३० कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि तो अधिकच तीव्र होत असल्याने याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यामुळे सखल भाग पाण्याखाली जाणे, झाडांची पडझड होणे, पुरसदृशस्थिती निर्माण होणे आदी घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही स्थिती उद्भवली आहे. अतीवृष्टी आणि सोसाट्याचे वारे वहात असल्याने ‘दृष्टी मरीन’ने नागरिकांना समुद्रकिनार्‍यावर न जाण्याची चेतावणी दिली आहे.

राज्यात हंगामी पाऊस १३२ इंचांहून अधिक झाला आहे. मागील २४ घंट्यांत ४ इंच पावसाची नोंद झाली आहे.