हडपसर (पुणे) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत मारहाण !

‘स्‍पीकर’चा आवाज न्‍यून करण्‍यास सांगितल्‍याने मारहाण !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – हडपसर येथील मांजरी भागात श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत ‘स्‍पीकर’चा (ध्‍वनीवर्धकाचा) आवाज मोठा असल्‍याने बाळासाहेब घुले आणि त्‍यांचे कुटुंबीय यांनी आवाज न्‍यून करण्‍यास सांगितले. त्‍यामुळे आरोपी हर्षल घुले, स्‍वप्‍नील कुचेकर आणि कैलास घुले यांनी चिडून बाळासाहेब घुले, त्‍यांचे कुटुंबीय अन् शेजारी यांना शिवीगाळ केली, तसेच स्‍पीकरचा आवाजही न्‍यून केला नाही. त्‍या वेळी बाळासाहेब घुले यांनी पोलीस नियंत्रण कक्षात तक्रार केली. पोलीस घटनास्‍थळी येऊन कार्यकर्त्‍यांना समज देऊन निघून गेले. यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत बाळासाहेब घुले यांना लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली आणि दांडके उगारून परिसरात दहशत माजवली. या प्रकरणी पोलिसांनी हर्षल घुले याला अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. साहाय्‍यक पोलीस निरीक्षक दाभाडे या प्रकरणाचे अन्‍वेषण करत आहेत. (यातून गणेशोत्‍सवात मंडळाच्‍या कार्यकर्त्‍यांनाही धर्मशिक्षण देण्‍यासह उत्‍सव धार्मिकदृष्‍ट्या कसा साजरा करावा ? याचे प्रबोधन करणे आवश्‍यक आहे, हे लक्षात येते. – संपादक)