स्‍वीकारण्‍याची आणि शिकण्‍याची वृत्ती असलेल्‍या अन् इतरांना साधनेत साहाय्‍य करणार्‍या सांगली येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (वय ७४ वर्षे) !

भाद्रपद शुक्‍ल चतुर्दशी (२८.९.२०२३) या दिवशी सांगली येथील सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के) यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांचे यजमान श्री. दत्तात्रय कुलकर्णी (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ७९ वर्षे) यांच्‍या लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सौ. सुलभा कुलकर्णी यांना ७४ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने नमस्‍कार !

सौ. सुलभा कुलकर्णी

१. कौटुंबिक दायित्‍व निभावणे

‘सौ. सुलभामध्‍ये लहानपणापासूनच स्‍वीकारण्‍याची वृत्ती आहे. लहान वयातच तिच्‍यावरचे पित्‍याचे छत्र हरवले. तिची आई संधीवाताने रुग्‍णाईत होती. तिचा भाऊ शिक्षणासाठी दुसर्‍या शहरात रहात असे. तिच्‍या बहिणींची लग्‍ने होऊन त्‍या सासरी गेल्‍या होत्‍या. अशा स्‍थितीत तिने घरातील आणि शेतीचे दायित्‍व आनंदाने पार पाडले. तिने बहिणींची बाळंतपणे आणि त्‍यांच्‍या लहान मुलांना सांभाळणे, हेही प्रेमाने केले.

२. स्‍वीकारण्‍याची वृत्ती

आमचे लग्‍न झाल्‍यावर तिने परिस्‍थिती स्‍वीकारून आनंदाने आणि उत्‍साहाने संसार केला. आरंभी आम्‍ही एकाच खोलीत रहात होतो. मी दिवसभर बाहेर असे. त्‍याही स्‍थितीत घराचे सर्व व्‍यवहार पहात मुलांना सांभाळणे, त्‍यांचा अभ्‍यास घेणे, हे सर्व ती एकटीच करत होती. नंतर आम्‍ही शहरात आल्‍यावरही २ खोल्‍यांत ती समाधानाने रहात आहे. ‘परिस्‍थिती स्‍वीकारून स्‍थिर कसे रहायचे’, हे तिच्‍याकडून शिकण्‍यासारखे आहे.

३. संयमी, सहनशील आणि शांत स्‍वभाव

श्री. दत्तात्रेय कुलकर्णी

‘ती कधी रागाने बोलली, कुठल्‍या घटनेने अस्‍थिर झाली’, असे मी पाहिले नाही. आधी माझा स्‍वभाव रागीट होता; पण त्‍याविषयी तिने कधीही गार्‍हाणे केले नाही. माझ्‍यातील स्‍वभावदोष आणि अयोग्‍य सवयी यांमुळे घडलेल्‍या अनेक प्रसंगांमध्‍ये तिने संयमाने सर्व सहन करत यशस्‍वी संसार केला. तिने प्रतिकूल परिस्‍थितीत मुलींना उच्‍चशिक्षण दिले. (आमच्‍या सर्व मुली अभियंत्‍या आहेत.) याचे श्रेय केवळ तिलाच आहे.

४. कलागुण

ती रांगोळी काढणे, विणकाम आणि शिवणकाम करणे, चित्रे रेखाटणे, यांत पारंगत आहे. ती पाककलेत निपुण आहे. तिला वाचन आणि लेखन यांची आवड आहे. ती धार्मिक विधी आणि सण भावपूर्ण साजरे करते. ‘तिच्‍यातील कलागुणांना प्रोत्‍साहन देण्‍यात मी अल्‍प पडलो’, याची मला मनापासून खंत वाटते, त्‍याबद्दल मी तिची क्षमायाचना करतो.

५. शिकण्‍याची वृत्ती

एखाद्या विषयात नवीन सूत्रे समजल्‍यास ती त्‍याची नोंद करते. साधनेसाठी ‘सोशल मिडिया’ आणि भ्रमणभाष यांच्‍या संदर्भातील गोष्‍टी शिकण्‍याचा तिचा सतत प्रयत्न असतो. साधक आणि संत यांच्‍याकडून, तसेच दूरदर्शनवरील कार्यक्रम, ग्रंथ, कीर्तन-प्रवचन या माध्‍यमांतून शिकायला मिळालेली सूत्रे ती लिहून ठेवते.

६. कुटुंबियांना आधार देणे

मला तिचा नेहमी आधार असतो. ती मला प्रत्‍येक प्रसंगात ‘सकारात्‍मक कसे रहायचे ?’, याविषयी सांगते. त्‍यामुळे मी स्‍थिर राहू शकतो. मुलींनाही तिचा आधार वाटतो. ती मुली, जावई आणि नातवंडे यांना वेळोवेळी विविध प्रसंगांत योग्‍य दृष्‍टीकोन देऊन समन्‍वय साधण्‍याचा प्रयत्न करते. ती काही प्रसंगांत नातेवाइकांनाही योग्‍य दृष्‍टीकोन देते. माझ्‍या रुग्‍णाईत स्‍थितीत तिने खंबीर राहून मला आधार दिला. त्‍याबद्दल तिच्‍याप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करावी, तेवढी अल्‍पच आहे.

७. इतरांना साधनेत साहाय्‍य करणे

तिच्‍यामुळेच मी साधनेत आलो. ती मला साधनेत प्रत्‍येक ठिकाणी साहाय्‍य करते. मला एखादे सूत्र समजले नसल्‍यास ती मला समजावून सांगते. ती मुलींनाही साधनेसंबंधी आणि तिला शिकायला मिळालेली सूत्रे वेळोवेळी सांगते. ‘सहसाधक आणि ती घेत असलेल्‍या व्‍यष्‍टी साधनेच्‍या आढाव्‍यातील साधक यांची साधनेत प्रगती व्‍हावी’, या तळमळीने ती त्‍यांना सूत्रे सांगते.

अशा अनेक गुणांनी युक्‍त असलेल्‍या सौ. सुलभाला समजून घेण्‍यात आणि प्रेम देण्‍यात मी अल्‍प पडलो, त्‍याबद्दल मला खंत वाटते. मी तिची मनापासून क्षमायाचना करतो.

सौ. सुलभासारखी जीवनसाथी दिल्‍याबद्दल मी भगवान श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो अन् ‘सौ. सुलभाची उत्तरोत्तर जलद आध्‍यात्मिक प्रगती व्‍हावी’, अशी श्री गुरुचरणी शरणागतीने विनम्र प्रार्थना करतो.

प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने सुचलेली ही सूत्रे मी कृतज्ञताभावाने त्‍यांच्‍या चरणी अर्पण करत आहे.’

– श्री. दत्तात्रय बाळकृष्‍ण कुलकर्णी (सौ. सुलभा यांचे यजमान, आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ७९ वर्षे), सांगली (६.८.२०२३)