कॅनडाच्या संसदेत नाझी सैनिकाचा सन्मान केल्याने अध्यक्षांचे त्यागपत्र

कॅनडाच्या संसदेचे अध्यक्ष अँथनी रोटा

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या संसदेत हिटलरच्या नाझी सैनिकाचा सन्मान केल्यावरून पंतप्रधान ट्रुडो यांनी सांगितल्यानंतर संसदेच्या अध्यक्षांनी त्यागपत्र दिले आहे. नाझी सैनिकाचा गौरव झाल्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका झाल्यानंतर संसदेचे अध्यक्ष अँथनी रोटा यांनी क्षमा मागितली होती; मात्र त्यानंतरही हे प्रकरण शांत न झाल्याने रोटा यांना त्यागपत्र द्यावे लागले.

अँथनी रोटा संसदेत त्यागपत्र देतांना म्हणाले की, माझ्याकडून घडलेल्या चुकीसाठी मला खेद आहे. त्यामुळे मी संसदेच्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र दिलेच पाहिजे. ९८ वर्षीय यारोस्लेव्ह हुंका यांचा नाझी सैन्याशी संबंध आहे, हे मला ठाऊक नव्हते. त्यामुळे मी चुकीने त्यांना संसदेतील कार्यक्रमाला आमंत्रित केले होते.