निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २३९
‘लवंग, लसूण, मोहरी यांसारखे मसाल्यांत वापरले जाणारे पदार्थ ही उत्तम घरगुती औषधे आहेत; परंतु यांतील बहुतेक पदार्थ उष्ण गुणधर्माचे असल्याने ते पुष्कळ जपून वापरायला हवेत. एका व्यक्तीने गळू झालेल्या भागावर पुस्तकात वाचून लसूण ठेचून लावली. लसुणीच्या उष्णतेने त्या भागावर पुष्कळ मोठा फोड आला आणि फोडात पाणी झाले. आणखी एका व्यक्तीने खोकल्यावर लवंग गुणकारी असते, म्हणून सतत लवंगा चघळल्या. त्या व्यक्तीला तोंड आले आणि काहीही खाल्ले तरी तिखट लागू लागले. कुणीतरी एकाला सांगितले की, दुखण्यावर मोहरी वाटून लावावी. त्याने तसे केल्यावर मोहरी वाटून लावलेल्या भागावर एवढी जळजळ होऊ लागली की, तो भाग सतत पाण्यात ठेवूनही जळजळ थांबेना.
कोरोनाच्या काळात मिरी, सुंठ यांचा एवढा अतीवापर झाला की, अनेक रुग्णांना मूळव्याधीचा त्रास चालू झाला. ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी स्थिती झाली. ‘कोणत्याही संदर्भात अतिरेक वाईट असतो’, हे ध्यानात घेऊन मसाल्याच्या पदार्थांचा औषधांत वापर करतांना तो काळजीपूर्वक करावा. असे उपचार वैद्यांच्या सल्ल्यानेच केलेले चांगले.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan