देशाचे नाव ‘भारत’ हेच हवे ! – डॉ. मनमोहन वैद्य, सहसरसंघकार्यवाह

डॉ. मनमोहन वैद्य

पुणे – देशाचे नाव ‘भारत’ हेच राहिले पाहिजे. इतर कोणत्‍याही देशाला २ नावे नाहीत. ‘भारत’ नावाला एक सभ्‍यता मूल्‍य आहे. भारताला प्रेरणादायी इतिहास आहे. देशाला सामाजिक आणि राजकीय परंपरा आहे. त्‍यामुळे देशाचे नाव ‘भारत’ हेच हवे याविषयी ‘राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघा’च्‍या ‘अखिल भारतीय समन्‍वय समिती’मध्‍ये चर्चा झाली, अशी माहिती राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली. ते संघाच्‍या ३ दिवसांच्‍या बैठकीमध्‍ये काय चर्चा झाली ? याविषयी पत्रकार परिषदेमध्‍ये बोलत होते.

देशभरातील ३६ संघटनांच्‍या २६७ प्रतिनिधींनी यामध्‍ये सहभाग घेतला होता. महिला संपर्कांच्‍या माध्‍यमातून ऑगस्‍ट ते जानेवारी २०२४ पर्यंत देशात ४११ महिला संमेलनांचे आयोजन करण्‍यात येईल. संघ संपर्कात येणार्‍या नव्‍या लोकांना संघाचे काम समजण्‍यासाठी ‘संघ परिचय वर्ग’ घेतले जातील. देशविरोधी शक्‍ती न्‍यून होत असून देशाला पुढे नेणार्‍या शक्‍तींचे काम वाढत आहे. २ समाजांतील वाद मिटवण्‍यासाठी संघ कार्यकर्ते काम करत आहेत, याकडे डॉ. मनमोहन वैद्य यांनी लक्ष वेधले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना अनेक वर्षे समाजाने बाजूला ठेवले आहे. त्‍यांना आरक्षण देऊन समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणले जावे, ही संघाची भूमिका आहे. अयोध्‍या येथील श्रीराम मंदिरामध्‍ये प्राणप्रतिष्‍ठापना जानेवारी २०२४ च्‍या मकर संक्रांतीनंतर मुहूर्तावर करण्‍यात येणार असल्‍याची माहिती या वेळी देण्‍यात आली.