सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणार्‍या नेत्‍यांवर कठोर कारवाई करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्‍वनिष्‍ठांचा आंदोलनाचा निर्धार !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे खासदार ए. राजा यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, या मागणीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी आंदोलन करण्‍याचा निश्‍चय नुकताच एका बैठकीमध्‍ये केला. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील कबीर चौराजवळ या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍या वेळी हिंदुत्‍वनिष्‍ठांनी हा निर्धार केला. ‘भारताची सुरक्षा आणि अखंडता यांच्‍या दृष्‍टीने केंद्र सरकारने खासगी इस्‍लामी संस्‍थांना हलाल (हलाल म्‍हणजे इस्‍लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणपत्र प्रदान करण्‍याची अनुमती देऊ नये, या मागणीसाठी सर्व संघटना केंद्र सरकारकडे मागणी करतील’, असेही या बैठकीमध्‍ये ठरले.

या बैठकीला वाराणसी व्‍यापारी मंडळाचे अध्‍यक्ष श्री. अजित सिंह बग्‍गा, विश्‍वेश्‍वरगंज व्‍यापारी मंडळाचे श्री. भगवानदास जयस्‍वाल, अखिल भारतीय सनातन समितीचे अध्‍यक्ष डॉ. अजय जयस्‍वाल, श्री. जी.डी. अग्रवाल, श्री. विमल जयस्‍वाल, श्री. अवधेश मिश्रा, ‘ज्ञानवापी’चा खटला लढणारे डॉ. सोहन लाल आर्य, ज्ञानवापी याचिकाकर्त्‍या सीता साहू, श्री. बाल गोपाल साहू, माजी ग्रामप्रमुख श्री. जय प्रकाश सिंह, सर्वश्री संजय महाराज, मन्‍नूलाल जयस्‍वाल, छेदी जयस्‍वाल, सत्‍यप्रकाश जयस्‍वाल, राजकुमार जयस्‍वाल आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री विश्‍वनाथ कुलकर्णी अन् राजन केसरी उपस्‍थित होते.