अनोळखी संपर्क क्रमांकावरून कुणी संपर्क केल्‍यास किंवा लघुसंदेश पाठवल्‍यास आर्थिक हानी होऊ नये; म्‍हणून त्‍यापासून सावध रहा !

साधकांना सूचना आणि वाचकांना आवाहन !

प्रतीकात्मक छायाचित्र

सध्‍या अनोळखी व्‍यक्‍तींकडून काही साधक किंवा वाचक यांना भ्रमणभाषवरून संपर्क करून किंवा लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) पाठवून ‘तुम्‍ही … व्‍यक्‍तीला ओळखता का ?’, असे विचारून त्‍या व्‍यक्‍तीविषयी अनावश्‍यक माहिती जाणून घेण्‍याचा किंवा त्‍या व्‍यक्‍तीविषयी साधक किंवा वाचक यांच्‍या मनात संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. उदा. ‘… व्‍यक्‍तीने कर्ज काढले असून तुमचा संपर्क क्रमांक जामीनदार म्‍हणून दिला आहे. त्‍या कर्जदाराने आमचे कर्जाचे हफ्‍ते भरले नसल्‍याने त्‍यांच्‍यावर कारवाई करणार आहोत’, असे प्रभावीपणे बोलणे किंवा संदेश पाठवणे या माध्‍यमातून साधक किंवा वाचक यांच्‍या बँक खात्‍याविषयी माहिती मिळवण्‍याचा आणि त्‍यांची आर्थिक फसवणूक करण्‍याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो.

काही साधक किंवा वाचक यांना भ्रमणभाषवर संपर्क करून ‘तुमची माहिती (फाईल) अमुक जिल्‍ह्यातून आली असून ‘भविष्‍य निर्वाह निधी’ची (प्रोव्‍हिडंट फंडची) माहिती देऊन काही साहाय्‍य द्यायचे आहे’, अशी भलावण केली जाते. त्‍यामुळे अशा प्रकारे अनोळखी व्‍यक्‍तीचा भ्रमणभाष आल्‍यास ‘विनासायास आर्थिक लाभ होत नसतो’,  या तत्त्वानुसार वेळीच सावध होऊन अनोळखी व्‍यक्‍तीस कोणतीही माहिती न देता आपले संभाषण थांबवावे.