बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

पराकाष्‍ठेचा संघर्ष, रक्‍ताचे पाणी करून, प्राणार्पण करून, कारागृहात मरणप्राय यातना सोसून, आपला भारत देश आपल्‍या पूर्वजांनी स्‍वतंत्र केला. देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे. याचा परिणाम म्‍हणजे आपल्‍या देशात घुसखोरांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तेवढाच देशाचा धोकाही वाढला आहे. असा हा ज्‍वलंत विषय हाताळून त्‍याविषयीची सविस्‍तर माहिती भारतियांना देण्‍याच्‍या हेतूने ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी ‘बांगलादेशी घुसखोरी भारताच्‍या सुरक्षेस सर्वांत मोठा धोका’, हे पुस्‍तक लिहिले आहे. हे पुस्‍तक एक अभ्‍यास पुस्‍तिका असून मराठी भाषेत अशा प्रकारचे लिहिलेले हे पहिलेच पुस्‍तक आहे. म्‍हणूनच या पुस्‍तकाला विशेष महत्त्व आहे. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी त्‍यांच्‍या आयुष्‍यातील सुमारे साडेतीन दशके सेनादलात राष्‍ट्ररक्षणार्थ वेचली आहेत. निवृत्तीनंतरही त्‍यांचा ईशान्‍य भारताशी संपर्क राहिला आहे. त्‍यांना तेथील संपूर्ण माहिती आहे.

पुस्‍तकाचे मुखपृष्‍ठ

१. घुसखोरांना बाहेर न काढण्‍यामागे काँग्रेसचे मतपेटीचे राजकारण

स्‍वतंत्र हिंदुस्‍थानच्‍या राजकीय नेतृत्‍वाने वेळोवेळी घेतलेले निर्णय आणि त्‍यामुळे निर्माण झालेली परिस्‍थिती याचे सविस्‍तर विवेचन आपल्‍याला या पुस्‍तकात वाचायला मिळते. राजकीय नेत्‍यांनी आपली सत्ता टिकवण्‍यासाठी घुसखोरी या गंभीर विषयाकडे नेहमीच कानाडोळा केला. त्‍यामुळे आज भयावह परिस्‍थिती निर्माण झाली आहे. ‘ही परिस्‍थिती का निर्माण झाली ?’, असा प्रश्‍न आपल्‍या मनात निर्माण होईल.

या प्रश्‍नाचे उत्तर पुढील अनुच्‍छेदात आपल्‍याला आढळते –

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

फक्रुद्दीनअली अहमद यांच्‍या नेतृत्‍वाखाली आमदारांच्‍या एका गटाने त्‍या वेळी असा प्रचार केला, ‘घुसखोर बाहेर काढल्‍यास काँग्रेस पक्ष आसाममध्‍ये आणि संपूर्ण भारतात मुसलमान मतापासून वंचित राहील.’ अखेरीस मतपेटीच्‍या राजकारणाचा आणि फक्रुद्दीनअली अहमद यांच्‍या नेतृत्‍वाखाली घुसखोरी समर्थकांचा विजय झाला.

इंदिरा गांधींच्‍या कार्यकाळात वर्ष १९८३ मध्‍ये आसामसाठी ‘आय.एम्.डी.टी.’ (बेकायदेशीर स्‍थलांतरित कायदा) हा घातक निर्बंध संमत करण्‍यात आला. या निर्बंधानुसार ‘एखादा घुसखोर बांगलादेशी आहे का ?’, हे सिद्ध करण्‍याचे दायित्‍व तक्रार करणार्‍याचे आहे. ‘हा कायदा रहित करण्‍यात यावा’, अशी मागणी या पुस्‍तकातून करण्‍यात आली आहे.

२. घुसखोरी रोखण्‍यासाठी सरकारची उदासीनता !

आसामचे राज्‍यपाल जनरल सिन्‍हा यांनी हिंदुस्‍थानच्‍या राष्‍ट्रपतींना आसाममधील अनधिकृत स्‍थलांतराविषयीचा अहवाल नोव्‍हेंबर १९९८ मध्‍ये सादर केला. त्‍यावर त्‍या वेळच्‍या राष्‍ट्रपतींनी किंवा तत्‍कालीन सरकारने कोणतीही कृती केली नाही. सरकारची ही उदासीन वृत्तीच आज राष्‍ट्राच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने मोठा धोक्‍यास कारणीभूत ठरली आहे. ‘बांगलादेशी घुसखोरांमुळेच आपल्‍या देशाची लोकसंख्‍या १०० कोटींपेक्षा अधिक झाली आहे’, असे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी या पुस्‍तकात स्‍पष्‍ट शब्‍दांत म्‍हटले आहे. ‘देशाच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने निर्माण झालेली समस्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली असलेले विद्यमान सरकार दूर करील’, अशी आशा व्‍यक्‍त केली आहे.

३. राष्‍ट्राच्‍या सुरक्षिततेसाठी सर्वसामान्‍य नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्‍यक !

सर्वसामान्‍य माणसांनी पोलिसांचे कान आणि डोळे म्‍हणून काम केले पाहिजे. नागरिकांना गुप्‍त माहिती देण्‍यासाठी एक ‘टोल फ्री दूरभाष क्रमांक’ दिला पाहिजे. त्‍यामुळे नागरिक त्‍यांच्‍याकडे असलेली बांगलादेशी घुसखोरांची माहिती पोलिसांपर्यंत तातडीने पोचवू शकतील. याविषयी त्‍यांच्‍या नावाची गुप्‍तता पाळली गेली पाहिजे. ‘केवळ सरकार आणि सुरक्षादल यांच्‍यावर सर्व दायित्‍व टाकून भागणार नाही. राष्‍ट्राच्‍या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे, चिनी कंपन्‍यांवर बहिष्‍कार टाकला पाहिजे; वृत्तपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी, सामाजिक माध्‍यमे या सर्वांनीच स्‍वतःचे राष्‍ट्रीय दायित्‍व म्‍हणून या गोष्‍टीकडे लक्ष दिले पाहिजे’, असे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी सुचवले आहे.

४. भारतियांची नियम न पाळण्‍याविषयीची मानसिकता

नागरिकांना मार्गदर्शन करतांना ब्रिगेडियर महाजन म्‍हणतात, ‘‘आपण देशातील साधे नियम पाळत नाही. नियम मोडणे, हे आपल्‍याला स्‍वातंत्र्य वाटते. इतर विकसित देशांशी तुलना करतांना त्‍यांचे लष्‍करी सामर्थ्‍य, पैसा, पायाभूत सुविधा यांचा आपण विचार करतो; पण त्‍या देशातील लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही. ते वाहतुकीचे नियम पाळतात. ते नियम मोडणार्‍याला, मग तो पुढारी असो अथवा सेलिब्रिटी (वलयांकित व्‍यक्‍ती) असो, त्‍याला शिक्षा होते. ते न चुकता कर भरतात. स्‍थानिक प्रशासनाने जी चौकट घातली आहे, ती त्‍यांना बंधन वाटत नाही. आपण मात्र अगदी त्‍याच्‍या उलट वागतो. ‘येथे शांतता राखा’, असे लिहिले असेल, तिथे हमखास आपण कलकलाट करतो. ‘येथे थुंकू नये’, असे लिहिलेल्‍या पाटीवर लाल पिचकार्‍यांनी (गुटखा / पान खाऊन थुंकणे) ती पाटी रंगवतो. ‘नो पार्किंग’ची (वाहने लावू नये) पाटी असते, तिथेच गाड्या आडव्‍या, तिरक्‍या लावलेल्‍या असतात. ‘कृपया रांगेची शिस्‍त पाळा’, असे लिहिलेल्‍या ठिकाणी झुंबड असते. ‘येथे स्‍वच्‍छता राखा’, असे लिहिलेल्‍या पाटीखालीच कचर्‍याचा ढिगारा असतो, म्‍हणजे नियम हे मोडण्‍यासाठी असतात, अशी आपली धारणा झाली आहे.’’

‘आपल्‍या बेशिस्‍तीचे आणि नियमबाह्य वर्तनाचे नेमक्‍या शब्‍दांत वर्णन करून आपल्‍या देशबांधवांनी उत्तरदायी नागरिक बनले पाहिजे’, अशी कळकळीची विनंती या पुस्‍तकातून ब्रिगेडियर महाजन यांनी सर्व भारतियांना केली आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

‘देशातील सर्व स्‍तरांतील नागरिकांना उत्तम मार्गदर्शन करणारे आणि राष्‍ट्रीय सुरक्षेचे शिक्षण देणारे ‘बांगलादेशी घुसखोरी : भारताच्‍या सुरक्षेस सर्वांत मोठा धोका’, हे पुस्‍तक प्रत्‍येकाच्‍या घरी असणे नितांत आवश्‍यक आहे. या हेतूनेच ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक, मुंबई’ यांनी हे पुस्‍तक प्रकाशित केले आहे. या पुस्‍तकाचे मूल्‍य १०० रुपये आहे. सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारकाशी संपर्क (दू.क्र. (०२२) २४४६५८७७) साधून हे पुस्‍तक बांधवांनी खरेदी करावे’, असे विनम्र आवाहन आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर (५.९.२०२३)

५. घुसखोरीसह व्‍यापारी हेतूने केली जाणारी घुसखोरी रोखणे भारतियांचे राष्‍ट्रीय कर्तव्‍य !

राष्‍ट्राच्‍या संरक्षणाचे दायित्‍व केवळ सरकार, प्रशासन, सैन्‍य आणि पोलीसदल यांच्‍यावर नसून ते नागरिकांचेही दायित्‍व आहे. नागरिकांनी सर्वत्र सजगतेने वावरावे आणि जर कुठे अयोग्‍य घडत असेल, तर त्‍याविषयीची माहिती प्रशासनाला द्यावी. प्रशासनाने सुद्धा नागरिकांनी राष्‍ट्रहिताच्‍या दृष्‍टीने केलेल्‍या तक्रारीची नोंद तातडीने घेतली पाहिजे. राष्‍ट्रहितापेक्षा अन्‍य कोणत्‍याही गोष्‍टीला महत्त्व देता कामा नये. त्‍यासाठी जनजागृती हा महत्त्वपूर्ण उपायही त्‍यांनी सुचवला आहे.

‘केवळ परकीय नागरिकांनी केलेली घुसखोरीच राष्‍ट्राच्‍या स्‍वातंत्र्याला बाधा निर्माण करते’, असे नाही, तर व्‍यापाराच्‍या हेतूने होणारी घुसखोरीही राष्‍ट्राच्‍या अर्थव्‍यवस्‍थेला धोका पोचवते’, याकडेही त्‍यांनी आपल्‍या देशबांधवांचे लक्ष वेधले आहे. म्‍हणून परदेशी मालावर बहिष्‍कार टाकणे, हे प्रत्‍येक भारतीय नागरिकाचे राष्‍ट्रीय कर्तव्‍य आहे. ‘पोलीसदलाचे दायित्‍व काय आहे ?’, याचीही चर्चा या पुस्‍तकात ब्रिगेडियर महाजन यांनी केली आहे.

थोडक्‍यात हे पुस्‍तक समस्‍या आणि त्‍यावरील उपाय सांगणारे आहे. तसेच शासनकर्त्‍यांनाही या पुस्‍तकाने सावध करून ‘राष्‍ट्रघातक कृत्‍यांना त्‍यांनी पाठीशी घालू नये’, अशी कळकळीची विनंती केली आहे. राष्‍ट्राच्‍या संरक्षणाचा विचार करता अत्‍यंत गंभीर असलेला हा विषय ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी या पुस्‍तकातून समजावून सांगण्‍याचा प्रयत्न केला आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (५.९.२०२३)

संपादकीय भूमिका

बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी न रोखण्‍याविषयी सरकारची उदासीन वृत्तीच राष्‍ट्राच्‍या सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने धोकादायक !